हेचि फळ काय मम तपाला – भाग १
गांधी, आज एक मित्र म्हणून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण आदरयुक्त आपुलकीनं ज्या गोष्टी सहज लपवल्या जातात त्या मित्रत्वाच्या नात्यानंलपविल्या जात नाहीत. कोणतीही शंका मनात राहू न देता बोलण्याचीच माझी आज इच्छा आहे. जगभरात तुझ्या जयंतीच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तुझ्या विचारांना आज नव्यानं अभ्यासलं जात आहे. २ ऑक्टोबर म्हणजे तुझ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तुझ्या नावाने विविध ठिकाणी निरनिराळे सोहळे साजरे होत असले, तरी त्या २ ऑक्टोबरनंतर तुलाआणि तुझ्या विचारांना आम्ही कितपत लक्षात ठेवतो हीच तुझ्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी कसोटी ठरणार आहे. कारण महापुरुषांना विसरण्याची आम्हाला सवयच लागली आहे. ही सवय मोडून तुला समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही आज करायला हवा. लहानपणापासूनच तुला राष्ट्रपिता म्हणत असलो, तरीही तुला देवत्व बहाल करून मंदिराच्या गाभाऱ्यात बसवत, त्याला केवळ स्वतःच्या सोयीसाठी प्रदक्षिणाघालण्याचं कर्मकांड मला जमणार नाही. तुला समजून घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्याचा शहाणपणा मला करावाच लागेल. अर्थात, मी राहतअसलेल्या वातावरणातील विचारांच्या विसंगतीमुळे मला कितपत तुझ्यापर्यंत पोहचता येईल हा एक प्रश्नच आहे. पण अशा अनेक प्रश्नांमध्येच मी गुंतून पडलोतर मीही त्या वैचारिक विसंगतीचाच भाग होऊन जाईल, असं वाटतं. मला तुझ्या विचारांपर्यंत पोहचण्याची गरज वाटते पण दुसऱ्या विचारांचा तिरस्कार करण्यासाठी मला ते नको आहे. तुझ्या विचारांचा नवीन वैचारिक “वाद” निर्माण करून तो केवळ समाजातल्या विशिष्ट “वादी” वर्गासाठीच आहे, असंही मला वाटत नाही. यामुळं तुझ्या शुद्ध विचारांपर्यंत पोहचण्याची आज मला जास्तआवश्यकता वाटते. कारण ते संपूर्ण समाजाला सोबत घेऊन चालणारे आहेत, अखंड मानवजातीला खऱ्या विकासाकडे नेणारे आहेत आणि प्रत्येक माणसालास्वतःच्या जीवनावरच नियंत्रण अधिकाकाधिक वाढवण्याचं नैतिक बळ देणारे आहेत, असं मला वाटतं. प्राचीन भारतीय संस्कृतीत बुद्ध – महावीरांनी अहिंसेच्या ज्या नवीन विचाराला जन्म दिला, त्याचा व्यावहारिक जीवनातील वापर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचंमहानपण तुलाच द्यावं लागतं. तुझी अहिंसा ही केवळ पशुहत्येला प्रतिबंध घालण्यापुरती मर्यादित नव्हती, तर शक्तीचा सर्वोच्च विकास साधत निर्माणझालेल्या संयमातून नि:शस्त्र प्रतिकार करण्याचा तो एक नैतिक मार्ग होता. यामुळं विसाव्या शतकातल्या भारतीय संस्कृतीचं सर्वश्रेष्ठ रूपच मला तुझ्यामध्येदिसतं. पण आजच्या काळात तुझ्या अहिंसा तत्वाला दुर्बलतेचं प्रतीक मानलं जातं. अर्थात त्याला कारणीभूत अहिंसेचा खरा अर्थ समजून न घेता स्वतःला अहिंसावादीम्हणवून घेणारे आहेत. कारण ते दुसऱ्याचा प्रतिकार करू शकत नाहीत म्हणून अहिंसेच्या तत्वाचा बुरखा चढवतात. ते स्वतःच्याच न्युनतम शक्तीपुढे अगतिकझाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग अशा घाबरट अहिंसेचा पुरस्कार तरी आम्ही का करावा? अहिंसा म्हणजे दुसऱ्याविषयी मनातूनही तिरस्कार करू नका तर त्याच्यावर प्रेमच करा, अशी मूळ भावना या तुझ्या तत्वामागे होती हे आम्ही कधी समजून घेणार? हा अर्थ घेतला तर, दुसऱ्याबद्दल मनातही वाईट चिंतन करणारा अहिंसेचा पुजारी होऊ शकणार नाही. माणसाचं एकमेकांबद्दल असणारं प्रेम हेच मानवी सुखाचंअधिष्ठान असू शकतं, या विचाराने तू सांगितलेल्या अहिंसा तत्वाची महती मला समजून येते. लहानपणापासुन आम्हाला राजा हरिश्चंद्राच्या सत्यवादी गोष्टी सांगितल्या असल्या तरीही तो राजा हरिश्चंद्र केवळ गोष्टींपुरताच मर्यादित राहतो. तो जसं सत्यवादीजीवन जगला तसं जीवन जगण्याची अभिलाषा आमच्या मनात निर्माण केली जात नाही. आपला फायदा करून घेण्यासाठी प्रसंगी खोटं बोलण्याचं तत्वज्ञानचआमच्या पथ्यावर पाडलं जातं. वास्तविक जीवनात जगताना खरं बोलल्यामुळं होणारं नुकसानही आम्हाला नकोच असतं. मी खरं बोललो तरीही समोरचा त्याप्रमाणे वागणार नाही, असं म्हणूनआमच्या खोटेपणालाच अधिक उत्तेजन देण्याचं काम आम्ही करत आलो आहोत. निदान आमच्या पिढीला खोट बोलणं हे चुकीचं आहे एवढी तरी जाण आहे. येणाऱ्या पिढीच्या सवयीचाच भाग तर तो होणार नाही ना, याचीच अधिक काळजी वाटते. आमच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये सत्याचा अंश फार कमी टिकला आहे. यामुळं तुझी सत्याग्रहाची कृती आम्हाला कितपत पटणार? सत्यजीवनात आणल्याशिवाय त्याचा आग्रह धरण्याची इच्छाशक्ती आमच्यात कशी निर्माण होणार? मी मान्य करतो, की तुझा सत्याप्रतीचा आग्रह हा मुख्यतःवैयक्तिक नसून सामाजिक होता. तरीही जे स्वआचरणात नाही त्याला सामाजिक शक्तीच्या रुपानं कस उभं करता येणार? सत्याग्रहामधून जी आत्मिक शक्ती तू स्वातंत्र्यलढ्यासाठी निर्माण केलीस ती खरोखरच असामान्य होती. मी चुकीचा नाही, तर मी बरोबरच आहे हाआत्मविश्वासच त्या सामान्य माणसाला साम्राज्यशाही शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी प्रभावित करीत होता. सत्याग्रहाच्या मार्गाने लाखो सामान्य भारतीयांनाएकत्र जोडण्याचा आणि त्यांचं एका अर्थाने अध्यात्मिक परिवर्तन करण्याचं कार्य जगाच्या इतिहासात दुसरीकडं झालेलं नाही. आत्मिक शुद्धीसाठी तू उपोषणाचा मार्ग वापरलास. अर्थात प्रत्येक उपोषणामागे तुझा काहीतरी आग्रह होताच. अनेकदा याच उपोषणाच्या मार्गाने तू इंग्रजांचंअन्याय करणारं धोरण बदलण्यास त्यांना भाग पाडलंस. उपोषणाचा मार्ग त्यांच्याचविरुद्ध उपयोगी पडतो ज्यांना तुमची काळजी वाटत असते. उपोषणाद्वारे सुद्धाशत्रूशी प्रतिकारच करायचा असतो. मात्र, यामध्ये शत्रूबद्दल कोणतीही वाईट इच्छा मनात ठेवून तो प्रतिकार करायचा नसतो तर शत्रूपक्षाचं मन वळवण्याचामुख्य प्रयत्न यामधून केला जातो. तुझा उपोषणाचा मार्ग यशस्वी होऊ शकला कारण लाखो सामान्य भारतीयांचा तुला पाठिंबा होता. त्यांनी तुझं नेतृत्वही मान्य केलं होतं. यामुळंच तू उपोषणसुरू केलं की त्यांना तुझी जास्त काळजी वाटत असे. उपोषणाचे दिवस जसजसे वाढत जात तसतसे लोकांमधील चिंता वाढत होती, या चिंतेमधूनच मग असंतोषनिर्माण होत होता. हाच लोकांचा असंतोष तीव्र होऊन त्याचं रूपांतर क्रांतिकारी चळवळीत होऊ नये, याची इंग्रजांना भीती वाटत असल्यामुळं त्यांना तुझ्यामागण्या मान्यच कराव्या लागत.