ह.म.बने तु.म.बने – मनाचा वेध घेणारी एक मालिका

यातील सगळ्या भूमिका दूरदर्शनच्या पडद्यावर न राहता आपल्याला आपल्या घरातच दिसायला लागतात. Source: TOI

आज बुद्धीजीवी वर्गाला दूरदर्शनवरच्या निर्बुद्ध मालिका बघण्यापेक्षा काहीतरी चांगलं वाचायला आवडतं. याचं कारण म्हणजे पूर्वीच्या तुलनेत मालिकांचा घसरत गेलेला दर्जा. एकेकाळी दूरदर्शनवर दर्जेदार मालिका बघितलेल्यांनी दूरदर्शनकडे चक्क पाठ फिरवली आणि फक्त बातम्यांपुरतंच दुरुन दर्शन घेणं पसंत केलं.  

मात्र, या अभिरुचीहीन मालिकांच्या जंजाळात एखादी मालिका सहज कधीतरी बघितली जाते आणि ती चक्क आपल्या मनाचा ठाव घेते. वाळवंटात ओऍसिस  सापडावं तशी ही मालिका मनाला गारवा देते. आपल्याही नकळत आपल्याला स्वतःकडे खेचून आणते. अशीच एक मालिका सोनी मराठी टीव्हीवर बघण्यात आली आणि एक दोन भागांनंतरच मला त्यात गुंतवून ठेवायला लागली. ती मालिका म्हणजे ह.म. बने तु.म. बने.

एक साधी, सोज्वळ आणि कौटुंबिक मालिका पण प्रत्येकवेळी जीवनाचं सार सांगते. आपल्या नकळत आपल्याला मधुर वेष्टणात गुंडाळलेली गोळी देऊन जाते. तीन पिढ्या आणि त्यांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध याभोवतीच मालिका फिरत रहाते.  

यातील नातवंडांचे वेगवेगळे हट्ट असोत किंवा आईवडील रागावतील म्हणून त्यांनी त्यांच्या नकळत केलेले काही उपद्व्याप असोत, ते सर्व सावरायला खंबीरपणे पुढे येते ती त्या घरातली आजी. अत्यंत प्रेमळ, लाघवी असलेलं हे पात्र साकारलय ते उज्वला जोग यांनी.  

नातवंडांची आजी, दोन सुनांची सासू, दोन मुलांची आई आणि अत्यंत चिकित्सक आणि थोड्या चिडक्या नवऱ्याची बायको अशा विविधांगी भूमिका अत्यंत सहजपणे साकारताना त्यांच्या अभिनयाचा कस लागतो. यातील सगळ्या भूमिका दूरदर्शनच्या पडद्यावर न राहता आपल्याला आपल्या घरातच दिसायला लागतात. मग काही गोष्टी त्यांना न सांगता केल्यामुळे चिडलेले सासरे असोत किंवा घरातल्या कुठल्याही मुलांनी घातलेले घोळ स्वतःच्या पोटच्याच मुलांनी घातल्याप्रमाणे ते पोटतिडकीनं सोडवणारे दीर असोत.

जेव्हा जेव्हा मालिकेतल्या सुना आपल्या मुलांचे प्रश्न आपणच नको का सोडवायला असं म्हणतात, तेव्हा घरातले सर्वजण त्यांना ताबडतोब सुनावतात की, “तुमची मुलं आमची कुणीच नाहीत का?” आणि लगेच कंबर कसून पुढे होतात. हे प्रसंग आपल्याला आतून कुठेतरी हलवून सोडतात.  

लालबाग भागातून आलेली धिटुकली सुन सासू-सासऱ्यांना पथ्य पाळण्यासाठी प्रेमळपणे दटावते आणि त्याचवेळी त्यांच्याबरोबर कॅरम खेळतांना निःसंकोचपणे सासऱ्यांना टाळी देते, आनंदाने शिट्टी वाजवते. तेव्हा आपल्याला तिच्या मोकळ्या वागण्याचं कौतुकही वाटतं आणि हेवाही. मोठ्या दिरांना हक्काने शिस्त लावणारी हीच भावजय त्यांना एका अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या समस्येच्या बाबतीत सजग करते आणि तोडगा सुचवते.  

तमाम पुरुषांच्या भोळ्या मनात आपल्या वयात येणाऱ्या मुलीविषयी किंवा तिच्या मित्रांविषयी फारसे संशय येत नाहीत. पण बायकांच्या मनात मात्र ताबडतोब येतात. याच स्त्रीसुलभ शहाणपणाने मालिकेतली ही तुलिका आपल्या दीरांना वेळीच जागं करते. तिची जाऊ नोकरी करत असल्यामुळे तिचे हे मोठे दीर तिला हक्कानी वेळीअवेळी चहा करायला सांगतात आणि तीही तत्परतेने त्यांना तो देत असते. त्यांच्या नात्यातला मोकळेपणा एखाद्या दीर-भावजयीसारखा न वाटता अगदी मोठा प्रेमळ भाऊ आणि धाकटी बहीण यांच्यासारखा वाटतो.

मालिकेतली आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे कुणालाही काहीही अडचण आली किंवा समस्या भेडसावायला लागली, तर ते ती स्वतःकडे न ठेवता अक्षरशः वेशीवर टांगतात आणि जेवणाच्या टेबलवर सर्वांसमोर मांडतात. तेव्हा मला माझ्या आजीचा सल्ला आठवतो. ती म्हणायची, “कधीही आपली दुखणीखुपणी, अडचणी वेशीवर टांगाव्यात. आपोआप तोडगा मिळतो.”  

आज असं करतांना कुणी आढळत नाही. जो तो आपले प्रश्न मोकळेपणाने कुणासमोर मांडू इच्छित नाही. मी मात्र आजीचा हा सल्ला आवर्जून मानते.

ज्यावेळी धाकटी सुन नवऱ्याच्या वाढत्या व्यवसायामध्ये खर्च होणारी आमदनी, न होणारी बचत आणि मुलांच्या भवितव्यासाठी करावी लागणारी तरतूद यामुळे चिंतीत होते, तेव्हा तिच्या नवऱ्याच्या नकळत चर्चा करुन घरातले सगळे हा प्रश्न सोडवतात. त्यातही पुढाकार असतो तो तिच्या मोठ्या दीरांचा.  

तिच्या नवऱ्याने मित्राला उदारपणे दिलेली रक्कम स्वतःलाच हवी आहे, असं खोटंच सांगून तो ती रक्कम आपल्या भावाला आणायला लावतो. नंतर त्याच रकमेची पॉलिसी आपल्या या धाकट्या भावजयीच्या नावाने काढतो.  

असे अनेक प्रसंग मालिकेत आहेत की जे कुटुंबातील सर्वांमधील नात्यांची वीण किती घट्ट आहे हे दाखवतात. ही नाती नेहमीच गोड गोड, आळणी न दाखवता रुसव्याफुगव्यांनी चटकदारही केलेली दिसतात.  

मुलांवरुन जावांमध्ये कधीतरी होणारी भांडणं, रुसवे घरातल्या इतरांच्या आणि प्रामुख्याने आजीच्या पुढाकारामुळे फुग्यासारखी चटकन फुटून जातात आणि पुन्हा एकदा सर्वांना आपुलकीच्या धाग्याने बांधून ठेवतात.

मालिकेचा केंद्रबिंदू म्हणजे कुटुंबातील मुलं आणि या मुलांनी केलेल्या अनेक उचापती. प्रत्येकवेळी त्यामुळे घाबरलेल्या त्यांच्या आईवडीलांना धीर देऊन युक्तीने ते ते प्रश्न सोडवते ती त्या कुटुंबातील आजी. आजीच्या कल्पकतेला अगदी दाद द्यावीशी वाटते.  

कधीतरी आजीसारखीच भूमिका कुटुंबातील एखाद्या पात्रालाही निभावावी लागते. याचा प्रत्यय येतो तो मालिकेत एका अत्यंत कठीण प्रसंगाला कुटुंबातील मोठा मुलगा कसा सामोरा जातो हे बघताना. त्याच्या जिवंत अभिनयामुळे ही मालिका नसून आपल्याच घरात घडणारा प्रसंग आहे, असंच आपल्याला वाटत रहातं.  

हा प्रसंग म्हणजे घरात एकही स्त्री नसतांना घरातील मोठी नात ऋतुमती होण्याचा. शाळेतून घाबऱ्याघुबऱ्या अवस्थेत आलेल्या या रेहाची गाठ पडते ती तिच्या बाबांशी. त्यांच्यापासून आपल्या भीतीचं कारण लपवताना तिला ज्या बिकट अवस्थेमधून जावं लागतं, त्याचं चित्रण अत्यंत संयमाने केलेलं आढळतं.  

एक पुरुष म्हणून आपल्या लेकीची त्यावेळची स्थिती समजायला बाबाला जरी थोडा वेळ लागलेला दाखवला असला, तरी नंतर सगळं लक्षात आल्यावर त्याची होणारी घालमेल अतिशय प्रभावीपणे रंगवली आहे सचिन देशपांडे या अभिनेत्याने. आपल्यात आणि मुलीच्या नात्यात प्रथमच निर्माण झालेल्या संकोचाच्या पटलाचा भेद करुन, तो आपल्या मुलीला इंटरनेटवरुन मिळवलेल्या माहितीच्या आधारे कशी मदत करतो, हे सगळं बघतांना आपल्याला दिसतो तो फक्त त्याच्यातला बाप.  

मुलीच्या काळजीपोटी व्याकूळ होणारा, घरातील इतर पुरुषांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देणारा आणि त्याचवेळी मुलीला त्या वेदनादायी अवस्थेत सर्वतोपरी मदत करणारा अशा वडीलांच्या भूमिकेच्या असंख्य छटा रंगवतांना अभिनेत्याच्या अभिनयाचा कस लागलेला दिसतो.  

मालिका केवळ घरातल्या लहान मुलांभोवतीचं फिरते, असं प्रेक्षकांचं मत होऊ नये म्हणून मालिकेतल्या तरुण तसंच वयाने जेष्ठ असलेल्या जोडप्यांमधले काही भावनोत्कट प्रसंगही दिग्दर्शकाने हळूवारपणे हाताळले आहेत.

मालिकेतले सर्व प्रसंग पडद्यावरचे न वाटता आपल्या घरातल्याच रंगमंचावर घडत आहेत, असा आभास निर्माण करण्याची प्रचंड ताकद या मालिकेत आहे. मालिकांकडे बघण्याचा आपला दूषित दृष्टिकोन बाजूला ठेवून जर आपण या मालिकेकडे निकोप मनाने

पाहिलं, तर आपल्याला यातून मानवी नातेसंबंधांची, कौटुंबिक मूल्यांची आणि व्यक्तीच्या वैयक्तिक प्रतिष्ठेची जपणूक कशी करायची याचा वस्तूपाठच मिळेल. सहजसुंदर अभिनय कसा असतो यासाठी तर ही मालिका पहावीच पहावी.

डॉ नंदिनी वेल्हणकर

डॉ नंदिनी वेल्हणकर ह्या अर्थशास्त्र विषयात PhD असून मुंबई विश्वविद्यालयाशी संलग्न एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *