हेचि फळ काय मम तपाला – भाग २

माणसाच्या पोटात काहीच नसल्यावर त्याला ईश्वराची आठवण होते. यावेळी होणाऱ्या त्रासामुळे त्याची ईश्वरावरची श्रद्धा अधिक दृढ होते. यातूनच आपल्या तत्वाला धरून राहण्याचं सामर्थ्य माणसात निर्माण होतं, अशीही उपोषणामागील तुझी भूमिका असावी असं मला वाटतं, गांधी. 

आज आमच्यामध्येही उपोषण करणारे काही अण्णा हजारे निर्माण होत असले, तरी त्यांना दीर्घकाळ आपला मार्ग पकडून ठेवणं जमलेलं नाही. आम्हीही अनेकदा उपवास करतो, मात्र त्यादिवशी आम्ही फक्त जरा वेगळं अन्न ग्रहण करत असतो. बहुधा इतर दिवसांपेक्षा त्याचं प्रमाण जास्तच असतं. आमच्यातल्या आत्मिक शक्तीचा त्यानं काहीच विकास होत नाही. 

गांधी, आजच्या काळात तुला समजून घेण्याची जास्त आवश्यकता वाटते. मानवी जीवनामध्ये परिवर्तन आवश्यक असलं, तरी ते तलवारीच्या जोरावर होण्यापेक्षा तत्वांच्या जोरावर झालं तर अधिक यथार्थ ठरेल. 

दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चाललेल्या समाजाला अहिंसेचा मार्ग दिशादर्शक ठरू शकतो. कारण, आक्रमकतेमधून उद्भवणारा विध्वंस माणसाच्या समस्या अजूनच वाढवून ठेवतो. याउलट, अहिंसेच्या मार्गाने मानवी समस्या हळूहळू कमीच होणार आहेत आणि यामुळे परस्पर प्रेमभाव वाढण्यासाठी मदतच होईल. 

सत्याग्रहामधून सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच पातळ्यांवर पारदर्शकता निर्माण होईल. तुझ्या सत्याग्रहाची राजकीय जीवनात आज फार आवश्यकता वाटते. जरी आज सार्वजनिक उपोषणाची गरज भासत नसली, तरी वैयक्तिक जीवनात उपवासाने निर्माण होणारी आंतरिक शक्ती उपयोगी पडू शकेल. 

गांधी, तू शस्त्रविरहित प्रतिकार करण्यासाठी आणि आपला विरोध दर्शवण्यासाठी असहकार आणि सविनय कायदेभंगासारखं विधायक शस्त्र जगाला दिलंस. या चळवळींमधून प्रत्येक सामान्य माणसालाही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं शक्य झालं. 

आजच्या काळात मात्र कोणत्या गोष्टीला सहकार करावा आणि कोणत्या गोष्टीला असहकार करावा हेच बऱ्याचदा कळत नाही. असं असलं तरीही मानवी हक्क टिकवण्यासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकानेच विचार आणि कृतीतून आपला सहकार दाखवण्याची गरज आहे. 

ज्यावेळी एखादी सोळा वर्षाची ग्रिटा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागतिक व्यासपीठावरून आम्हाला आवाहन करते, तेव्हा आम्ही तिच्यासोबत ठामपणे उभं राहून तिला सहकार करायलाच हवा. मात्र, प्रत्येक गोष्टीला आमचा असा सहकार योग्य ठरणार नाही. 

समाजात घडणाऱ्या असंख्य चुकीच्या गोष्टीला आमचा असहकार आळा घालू शकेल. अशावेळी केवळ घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन न करणं, ही असहकाराची भूमिका न ठरता त्या गोष्टीला ठामपणे विरोध करून, ती संपवण्यासाठी प्रयत्न करणं हाच खरा असहकार ठरणार आहे. 

आज राजकीय क्षेत्रातसुद्धा जेव्हा काश्मिरमध्ये उद्भवलेली परिस्थिती पाहून आमचा केरळमधील सर्वोच्च अधिकारी कन्नन गोपीनाथन सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आपला राजीनामा देतो, त्यावेळी तुझ्या असहकार चळवळीत अनेकांनी आपला वकिली व्यवसाय सोडल्याची सहजच आठवण होते. यावरून तुझ्याकडून काहीतरी आम्ही नक्कीच शिकलो आहोत या गोष्टीबद्दल समाधान वाटत राहतं.

गांधी, तुझा सविनय कायदेभंगाचा मार्गही आजच्या परिस्थितीत लाभदायक ठरू शकतो. आज समाजात लोकांना कायदापालन शिकवण्याची जास्त आवश्यकता असली तरीही प्रत्येकवेळीच ते योग्य ठरणारं नाही. आज अनेकदा कायद्याचा गैरवापर करून काळ्या गोष्टी पांढऱ्या करून घेतल्या जातात. याच कायद्याने वैचारिक आणि राजकीय विरोधकांना संपवण्याचं काम केलं जातं. 

सत्ताधारी स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तसे कायदे करून समाजातील एकता तोडणार असतील किंवा अश्या कायद्यांनी समाजात विषमता निर्माण होणार असेल तर ते कायदे पाळण्याचं आमच्यावर बंधन असणार नाही. अशावेळी मग सविनय कायदेभंगाचा मार्ग आम्ही स्वीकारायला हवा.

तुझ्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेकजण होते. काही सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाणारे होते तर काहींना समाजवादाचा मार्ग अधिक योग्य वाटत होता. तुझ्या विचारांहून त्यांचे विचार भिन्न असले तरीही तू कधी त्यांचा तिरस्कार केला नाहीस. कारण तेही देशासाठीच लढत आहेत याची जाणीव तुला होती. 

खरं तर तू म्हणजे या सगळ्या भिन्न विचारांना एका जागी पकडून ठेवणारा केंद्रबिंदूच होतास. कारण, तुझ्या मृत्यूनंतर ते एकत्र राहू शकलेले नाहीत. या तुझ्या भूमिकेतला गांधी आम्ही आमच्यात रुजवण्याची आज सर्वाधिक जास्त गरज आहे.

कदाचित, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा गांधी आमच्यामध्ये थोडा जरी रुजला तरी केवळ वैचारिक मतभिन्नता आहे म्हणून अनेक दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांना आपला जीव गमवावा लागणार नाही. 

या जागतिकीकरणाच्या काळात मानवाने विज्ञानाच्या मदतीने बरीच प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाचा विकास साधत त्याने स्वतःचे कष्ट अजूनच कमी केले आहेत. मात्र, दिवसेंदिवस यांत्रिकीकरण होत चाललेल्या या जगात माणसाच्या भावना मारल्या जात आहेत. भौतिक गोष्टी जरी त्याने मिळवल्या असल्या तरी मानसिक शांतता तो गमावून बसला आहे. अशावेळी, कदाचित तुझी प्रार्थना त्याला शांतता प्रदान करू शकेल. 

शहरीकरणाच्या विकासाबरोबर तुझी ग्रामोद्योगाची संकल्पनाही आम्ही लक्षात घ्यायला हवी. तुझ्या चरखा – खादीसारख्या उद्योगातून स्वावलंबनाचे धडे आम्ही घ्यायला हवेत. समाजामधील उपेक्षित व शोषित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुझा सर्वोदयाचा मार्ग समजून घेणं गरजेचं आहे. या तुझ्या अनेक गोष्टींमधूनच जगात आर्थिक – सामाजिक संतूलन साधलं जाऊ शकेल. आज आम्ही पूर्णपणे चुकीचे नसू कदाचित, पण आम्हाला अधिक बरोबर होण्यासाठी तुझा विचार करायलाच हवा. 

तुझ्यासारखा दुसरा गांधी जन्माला यावा, अशी इच्छा मी करणार नाही. कारण, आजच्या काळात तो कितपत योग्य ठरु शकेल, हे मला माहीत नाही. पण आम्ही आमच्या प्रत्येकामध्ये आजच्या काळाला अनुसरून खऱ्या गांधीला नव्याने जन्म देऊ शकलो तर आमचंच भविष्य अधिक प्रकाशमय होईल यात शंका नाही. यामुळे कदाचित भविष्यातल्या पिढीला गांधी कोण होता असा प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही.

अनिकेत लखपती

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *