‘स्मार्ट’ वर्क फ्रॉम होम

घरातून काम करताना आपल्या घरात एकांत (प्रायव्हसी) अत्यावश्यक आहे. PC: bloomberg.com

पूर्वी घरातच रमणाऱ्या व्यक्तीला घरकोंबडा म्हणून हिणवलं जात असे. मात्र, आता घरात बसून आपलं व्यावसायिक कामकाज करणं हा कार्यसंस्कृतीचा एक भाग बनला आहे. पूर्वी फक्त माहिती तंत्रज्ञान उद्योगात ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरुन काम  हे सर्रास अंगभूत सवय म्हणून चालत होते.  

आता मात्र सर्व  क्षेत्रातील लोकांना आवडो अथवा ना आवडो, पण कोरोनामुळे या कार्यपध्दतीचे महत्व पटलं आहे. घर,  कार्यालय, शाळा, महाविद्यालय या सर्वांचं महत्व आहेच पण सतत एका जागी बसून दीर्घ कालावधीसाठी ही कार्यपद्धती नक्कीच उत्पादक वृद्धी (प्रॉडक्टिव्हिटी) देऊ शकत नाही.

प्रत्येक कार्यपद्धतीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत.  घरातून काम करण्याचे पण तसेच आहे. कार्यालयात जाऊन काम करण्यात अनेक प्रकार अंतर्भूत असतात. मिटिंग (बैठक), संवाद, संघ भावनेची वृद्धी, भावनिक नाते संबंध या सर्वांचा त्यात समावेश असतो.  

घरातून काम केल्याने येण्याजाण्यात होणारा वेळेचा अपव्यय टाळला जातो. यामुळे जास्त काळ काम करता येते हा या कार्यपद्धतीचा उघड फायदा आहे. उद्योग जगताला घरून काम करण्याच्या वातावरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने आता ‘होममेकर्स’ अर्थात गृहिणींनाही करिअरच्या नव्या संधी मिळतील.  

घरातून काम करताना आपल्या घरात एकांत (प्रायव्हसी) अत्यावश्यक आहे. घराचा एखादा भाग ऑफिस म्हणून मानणं जमलं तर फारच छान. ऑफिसमध्ये असते तशी टेबल, खुर्चीची व्यवस्था तिथे करा. 

तुम्ही घरी असलात तरी ऑफिसचं काम करताय, याची कल्पना घरातल्या सर्व सदस्यांना द्या. तुम्ही कोणत्या वेळेत काम करणार आहात याचं वेळापत्रक करून सांगा. जर एखादा फलक करून त्यावर हे दर्शवता आलं तर अजून उत्तम .

घरुन काम करण्याच्या कार्यपद्धतीत व्हिडिओ कॉलिंग हा एक महत्वाचा भाग आहे. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हिडिओ कॉलिंगसाठी चांगलं इंटरनेट कनेक्शन (वाय-फाय), स्पीकर्स, इअरफोन व अधिकृत सॉफ्टवेअर यासारख्या गोष्टी संगणकावर असणं अपेक्षित आहे.  

ऑफिसचा फोन कॉल सुरू असताना मुलांनी कसं वागणं अपेक्षित आहे, हेदेखील त्यांना समजवा. कॉल सुरु असताना तुमच्या चेहऱ्यावर प्रकाश येईल अशी जागा शक्यतो निवडा. अनेक व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअरमध्ये मागे अर्थात बॅकग्राऊंड चित्रांचा पर्याय उपलब्ध असतो. यासाठी चांगले प्रसन्न चित्र निवडा.  

शक्यतो आपल्या खोलीतील टीव्ही, रेडिओ इत्यादी आवाज करणारी उपकरणे बंद करा. कॉल चालू असताना व्हिडिओचा पर्याय सुरू ठेवावा व ऑडिओ माईक म्हणजे ज्याद्वारे आपला आवाज समोरच्याला ऐकू जातो तो पर्याय बंद ठेवावा. तसेच याबाबत मिटिंग होस्ट म्हणजे ज्या व्यक्तीने ही बैठक आयोजित केली आहे, तिने दिलेल्या सूचना पाळाव्यात.  

आपल्याला एखादा मुद्दा मांडायचा असल्यास बोट वर करा अथवा चिन्हाचा वापर करा. म्हणजे तुम्हाला बोलायचे आहे हे इतरांना कळेल. सर्व डिजिटल उपकरणांच्या बॅटरी रात्रीच पुर्ण चार्ज करून ठेवा.

या संस्कृतीत काही स्मार्ट सवयी पण अंगीकारणे गरजेचे आहे. या सवयी कोणत्या हे आता आपण पाहू.

स्मार्ट कपडे :  घरून काम करायचं आहे, म्हणजे आता घरच्या कपड्यांवर राहिलं तरी चालेल, हा मोह टाळा. घरून काम करायचं असलं तरी नीटनेटके कपडे घातल्याने मन तर प्रफुल्लित होतंच, शिवाय ऑफिसचं काम सुरू करण्यासाठी तुमची मानसिकरीत्या तयारी होते.  

आपल्या कंपनीच्या संस्कृतीप्रमाणे औपचारिक (फॉर्मल्स) किंवा स्मार्ट पद्धतीचे अनौपचारिक (कॅझ्युअल) कपडे घालणं संयुक्तिक ठरेल. नीटनेटके कपडे घातल्याने घरातून बाहेर पडायचंय, अशी जाणीव मेंदूला होते. त्याचप्रमाणे काम संपल्यानंतर कपडे बदलले की आजचं काम संपलं, ही भावना जाणवते.

शिस्त : घरून काम करत असलात तरीसुद्धा तुम्ही ऑफिसला ज्यावेळी पोहोचता, त्याचवेळी कामाला सुरुवात करा आणि ऑफिसची वेळ संपते तेव्हा काम थांबवा. रात्री फारवेळ जागरण करू नका आणि झोपेच्या वेळी झोपा. म्हणजे दुसऱ्या दिवशी कामासाठी तुमच्या मेंदूला पुरेसा आराम मिळालेला असेल. कामाचे तास संपले की तुमचा कॉम्प्युटर लॉग आउट करा आणि काम बंद करा. घरी संगणकावर काम करत असाल तर, कीपॅड नीट हाताळता येईल एवढी खुर्चीची उंची असायला हवी. नाहीतर सांधेदुखी, पाठदुखी असे त्रास होऊ शकतात

मोकळ्या हवेत फेरफटका मारा : घरून काम करण्याचा अर्थ तुम्ही स्वतःला घरात कोंडून घ्या असा होत नाही. कामातून आणि स्क्रीनमधून ब्रेक घेण्यासाठी ताठ उभं राहणं, शरीराला थोडा ताण देणारे व्यायाम करणं, इतकंच नाही तर एखादी फेरी मारून येणंही महत्वाचं आहे.  हा फेरफटका तुम्ही स्वतःसाठी मारता. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो. शिवाय मन प्रफुल्लित होतं. काही लोकं भेटतात. तुमची उत्पादकता वाढायला हे उपयोगी पडतं.

गप्पाटप्पा : ऑफिसमध्ये तुम्ही सहकाऱ्यांशी गप्पा मारता. थोडंफार हसणं खिदळणं होतं. मात्र, घरून काम करताना तुम्ही एकटे असता. संपूर्ण दिवस कुणाशीही न बोलता काम म्हणजे एकप्रकारचा तुरुंगवासच. या एकाकीपणातून बाहेर पडायचा एक मार्ग म्हणजे थेट कॉल करून गप्पा मारा. आपल्या घरातील इतर कुटुंबियांशी पण बोला (त्यांना ऑफिसमधील गमती जमती सांगा).

छोटे-छोटे ब्रेक घ्या : घरून काम करताना नित्यक्रम ठरलेला असावा. पण घरून काम करणं कंटाळवाणं होता कामा नये. यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे कामाच्या मधे छोटे-छोटे ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये जसा थोडा फेरफटका मारता, तसा घरी मारावा.  घरून काम करणारे अनेकजण ‘पोमोडोरो तंत्राचा’ प्रभावी वापर करतात. पोमोडोरो हे वेळेचं व्यवस्थापन करण्याचं एक तंत्र आहे. यामध्ये कामाच्या तासांची 25-25 मिनिटांच्या भागात विभागणी केली जाते. आणि प्रत्येक 25 मिनिटांनंतर पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायला सांगितलं आहे.  

वर्क फ्रॉम होम नी त्रासून न जाता आपल्या कार्यपद्धतीमध्ये झालेलया ह्या बदलाकडे सकारात्मक दृष्टितीने पाहिलं पाहिजे. 

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *