स्मार्टफोन: तुमचा जिवलग सवंगडी

इलेक्ट्रॉनिक युगाची सुरुवात झाल्यापासून गेल्या ४७ वर्षांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे भ्रमणध्वनी होय. संगणकाला त्याने केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना, या छोट्याश्या उपकरणामध्येच एक परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. 

आता भ्रमणध्वनी हवा असण्याच्या गरजेचे रुपांतर व्यसनात होत चालले आहे. इतके की, लोक आता अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजांमध्ये कळत नकळतपणे भ्रमणध्वनीचाही समावेश करु लागले आहेत.

गेल्या दशकभरात भ्रमणध्वनीचे अंतर्बाह्य रुप किती पालटले आहे हे सांगायला नकोच. त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांमध्ये आश्चर्यकारक वेगाने वाढ झाली असून हे उपकरण अधिकाधिक लहान आणि वजनाने हलके झाले आहे. संगणकाचा अवतार ज्या गतीने बदलत गेला आहे त्याहीपेक्षा वेगाने भ्रमणध्वनीचे अंतरंग आणि बाह्यरुप बदलले आहे हे निश्चित. भ्रमणध्वनीचे अधिकाधिक संगणकीकरण झाल्यामुळे हा बदल झाला आहे असे म्हणता येईल. 

ट्रांझिस्टर्स, मायक्रोचिप्स यांसारख्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा कमी होणारा आकार आणि त्यांच्या जुळणीमध्ये यांत्रिक हातांच्या वापरामुळे आलेली विलक्षण सफाई यामुळे कमी जागेत जास्तीतजास्त सुविधा पुरवणे शक्य होत आहे.

साधारण २००५ नंतर इंटरनेटचा प्रसार शहरी-निमशहरी भागांमध्ये वेगाने झाला. माहिती तंत्रज्ञानासारखे शब्द सर्वसामान्यांना माहीत झाले. मात्र, स्मार्टफोन आणि त्यामध्ये जाऊन बसलेल्या इंटरनेटमुळे खर्‍या अर्थाने माहिती तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेच्या हातात आले.

बहुतेकांना संगणकापेक्षा भ्रमणध्वनी हाताळणे अधिक लवकर जमले. 

“मला मेलीला काय समजतंय त्यातलं!”, असे म्हणणार्‍या वाड्या-वस्त्यांवरच्या नऊवारीतल्या आज्यादेखील आधुनिक भ्रमणध्वनी म्हणजेच स्मार्टफोन वापरताना आपण पाहतो.

स्मार्टफोन अधिकाधिक हुशार होत असतानाच माहिती तंत्रज्ञानातही नवनवीन संकल्पना येत गेल्या. आता त्याची लोकप्रियता वाढत असून किंमतीही आटोक्यात येऊ लागल्या आहेत. 

स्मार्टफोनवरील चित्र आणि आवाज अतिशय सुस्पष्ट असतात. येत्या दहा वर्षांमध्ये स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाशी संवाद साधणे अतिशय सुलभ होणार आहे. ‘टचस्क्रीन’ तंत्रज्ञानतर बहुतेक ठिकाणी आत्ताच पोचले आहे, परंतू इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी थेट संवाद साधण्याचे (व्हॉइस कमांड) तंत्रज्ञानदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे विविध मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून असंख्य कामे सटासट हातावेगळी करता येतील. मग तेअगदी रस्ता चुकलेल्या वाहनचालकाला योग्य नकाशा पुरवणं असो किंवा संगीताच्या मैफिलीत तानपुऱ्याची साथ करण्यापर्यंत असो, की सर्वप्रकारचे फोटो काढून तत्काळ पाठवण्यापासून वापरकर्त्याला इंटरनेट टीव्ही दाखवण्यापर्यंत…

मोठमोठ्या शहरांमध्ये काय आता लहान गावांमधूनही डेस्कटॉप संगणक वेगाने दिसेनासा होत आहे. संगणक आणि इंटरनेट यांचा संयोग असलेल्या स्मार्टफोन (आणि त्याचेच प्रगत रूप असलेला टॅबलेट पीसी) द्वारे माणसाला मिळू शकणाऱ्या सुविधांची अक्षरशः मोजदादच राहणार नाही! 

यामुळे सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात सर्व बाबी बसल्याजागी, तेही २४ x ७ – हाताळता येतील. अर्थात, या सोयीसुविधा मिळवून देण्यामागे विविध ऍप्लिकेशन्सचा फार मोठा वाटा असेल. ऍप्सचा हा उद्योग अतिशय वेगाने वाढेल आणि त्यामुळे विपणन-वितरण, विक्री, विक्रीपश्चात सेवा, जाहिरात, देखभाल यासंदर्भातील सध्याची गणिते पूर्णपणे बदलतील.   

परंतू, गेल्या दोन-तीन वर्षांत, स्मार्टफोनच्या सर्वसामान्य वापरकर्त्यांप्रमाणेच संशोधकांनाही, असे जाणवू लागले आहे की स्मार्टफोन्सचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांची आणि त्यांनी बाजारात आणलेल्या मॉडेल्सची संख्या वाढत असली तरी त्यांमधून खरोखरीच नवी, अभूतपूर्व सेवा-सुविधा पुरवली जात नाहीये! म्हणजे असे की, सर्वच स्मार्टफोन्समध्ये कॅमेरा, वेब, जीपीएस, संगीत, खेळ आणि विविध ऍप्स असतात.

एखाद्या उपकरणाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने होऊ लागल्यावर त्याच्याशी संबंधित विविध छुपे धोके देखील समोर येऊ लागले आहेत. उदा. मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारण्यासाठी आपल्या घराची गच्ची भाडेकरारावर दिल्यास बक्कळ पैसे मिळतात हे खरे असले, तरी टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या विविध लहरींमुळे कायमचे आणि कधीही बरे न होणारे शारीरिक नुकसान होऊ शकते हेदेखील ध्यानात ठेवायला हवे! तसेच दीर्घकाळ फोनवर बोलणार्‍यांनाही विविध प्रकारची दुखणी लागू शकतात.

पूर्वी शाळकरी मुलांना अभ्यासाला बसताना खेळणी दूर ठेवण्यास सांगितले जाई. नंतर, वर्ग चालू असताना हेडफोन्सवर रेडिओ किंवा कॅसेट टेप तल्लीनपणे ऐकणार्‍या कॉलेज विद्यार्थ्यांना बाहेर घालवण्याचे दिवस आले. आता या वस्तूंची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. हे प्रमाण इतके वाढले आहे की विद्यार्थ्यांपासून कामगारापर्यंत आणि वाहनचालकापासून उच्चाधिकार्‍यापर्यंत, प्रत्येक फोनधारकाला बाजूला काढायचे म्हटले तर तेथे बहुधा हा हुकूम देणारी व्यक्तीच फक्त शिल्लक राहील! 

प्रत्येक कार्यालयात, उद्योग-व्यवसायाच्या ठिकाणी, अगदी कारखान्यांमध्येदेखील हल्ली स्मार्टफोन शिरला आहे आहे हे आपण पाहतोच. अर्थात, कार्यालयांमध्ये बहुसंख्य कामेदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने ती मोबाईल उपकरणांच्या सहाय्याने पार पाडणे कर्मचार्‍यांना तर सोपे जाते आणि त्यांचा मागोवा ठेवणे प्रशासनालाही. उदा., इमेल्स तपासणे, महत्त्वाच्या मेसेजची देवघेव, प्रत्यक्षात समोर नसलेल्या सहकार्‍यांसोबत चर्चा करून कामाची पुढील दिशा ठरवणे. 

तरीही या उपकरणांच्या सतत आणि सार्वत्रिक वापरामुळे कार्यालयांची अंतर्गत सुरक्षादेखील अनेक प्रकारांनी धोक्यात येत असते हे लक्षात घेणेही तितकेच अपरिहार्य आहे. कारण, अनेकदा वापरकर्त्याबरोबरच खुद्द स्मार्टफोन किंवा कोणतीही तत्सम यंत्रणा अनपेक्षितपणे इलेक्ट्रॉनिक हल्ल्याची शिकार ठरु शकते. यामुळे आता उद्योगविश्वातील माहिती-तंत्रज्ञान विभागांपुढे नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

कार्यालयांतील स्मार्टफोन्सच्या वापरामुळे एकंदर कार्यक्षमता तसेच कार्यपद्धतींची लवचिकता वाढली आहे, यात शंकाच नाही. ग्राहक व पुरवठादारांशी संवाद साधण्याचे नवे मार्गही उपलब्ध झाले आहेत. यामुळे हे दृश्य आणि थेट फायदे मिळवण्यासाठी कंपन्यांना कर्मचार्‍यांना स्मार्टफोन वापरण्याचे स्वातंत्र्य देणे आवश्यकच बनले आहे.परंतू, उद्योग-व्यवहारांची अंतर्गत माहिती संबंधितांना देण्याबरोबरच ती पुरेशी गुप्त राखण्याचीही कसरत एकाच वेळी कंपन्यांना पार पाडावी लागत आहे.  

सुरक्षिततेचे धोरण

स्मार्टफोन वापराबाबतचे एकच धोरण सर्व पातळ्यांवर सरसकट जसेच्या तसे लागू करणे शक्यच नाही. याऊलट, संबंधित कार्यालय वा उद्योगाच्या याबाबतच्या गरजा आणि मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. माहिती सुरक्षित ठेवणे गरजेचे असले तरी तिच्याभोवती जास्तीत जास्त भिंती (फायरवॉल्स) उभारले तर त्या पार करण्यातच अधिक श्रम आणि वेळ खर्च होतो आणि कामकाजाचा वेग मंदावतोच! 

स्मार्टफोन वापरणाऱ्या कर्मचार्‍यापेक्षा त्या यंत्रातील ‘मालवेअर’चा म्हणजे सदोष वा घातपाती स्वरूपाच्या सॉफ्टवेअरचा प्रवेश कार्यालयाच्या संगणकीय यंत्रणेत होणे जास्त धोकादायक ठरते. हा मुद्दा योग्य असला, तरी त्याचा फुगा जरा जास्तच फुगवला जातो. प्रत्येक बाह्य इलेक्ट्रॉनिक उपकरणातून आपल्या यंत्रणेत मालवेअर घुसवले जात आहे असे दरवेळी मानण्याचीही गरज नाही, असाही एक मतप्रवाह आहे. 

उदा. आपल्या हँडसेटमध्ये अनेक ऍप्स असतात. त्यापैकी थेट उपयुक्त नसलेली ऍप्स धोकादायक असतात असेही नाही. मालवेअरबाबत भीतीमागे अज्ञान असण्याची शक्यता जास्त असते. आणि पारंपारिक स्वरूपाची बांधणी असलेली सुरक्षा यंत्रणा मालवेअरना तोंड देऊ शकेल वा नाही अशी भीतीही! 

कारण नव्या धोक्यांचा सामना करण्यासाटी नेहमीची अँटिव्हायरस सॉफ्टवेअर आणि अँटिमालवेअर सोल्युशन्स पुरेशी ठरतीलच असे नाही. शिवाय आयओएस, अँड्रॉइड, विंडोज अशा अनेक ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरात असल्यामुळे सुरक्षा प्रणालीदेखील तितकी सर्वव्यापी आणि लवचिक असणे गरजेचे असते.

सर्वांत धोकादायक बाबी

इ-हल्लेखोर किंवा सायबर अतिरेक्यांना दुसर्‍याच्या स्मार्टफोनमध्ये घुसण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हॉटेल्स, मॉल्स, वाहतूक स्थानकांच्या ठिकाणी मोफत उपलब्ध असलेले खुले वायफाय नेटवर्क! या ठिकाणांहून केलेली घुसखोरी यशस्वी होण्याची (म्हणजेच महत्त्वाची व्यावसायिक माहिती मिळण्याची) खूपच शक्यता असते. 

वैयक्तिक अथवा व्यावसायिक माहितीसंदर्भात दुसरे असे की, सध्या उपकरणांचे उत्पादक, बॅँडविड्थ आणि इतर सेवा पुरवणार्‍या कंपन्या, ऍप आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यासारख्या संबंधितांमध्ये गळेकापू स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी, प्रत्येकजणच ग्राहकाची माहिती जास्तीत जास्त पसरवून, वापरून वा विकून अधिकाधिक पैसे मिळवण्याच्या मागे लागलेला दिसतो. एखादी माहिती कोणाच्या हाती जाते आहे आणि तिचा कशाप्रकारे वापर केला जाणार आहे, हे सांगणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. परवाच बातमी वाचली की, स्मार्टफोन उपकरणाचा बनावट ओळख-क्रमांक तयार करणारी सॉफ्टवेअर्स मिळतात आणि गुन्हेगार ती सर्रास वापरीत आहेत! म्हणूनच वापरकर्त्यांनीही स्वतःची किंवा व्यावसायिक माहिती पुरवताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. 

“जरूर तेवढीच माहिती द्या, भरमसाट माहिती बाहेर जाऊ देऊ नका” हे कर्मचार्‍यांना समजावून सांगणे व त्यांच्यात यासंदर्भात जागृती निर्माण करणे कंपन्यांच्या दृष्टीने गरजेचे ठरते आहे.

कार्यालयीन कामकाज आणि स्मार्टफोन…

स्मार्टफोनच्या धोक्यापासून स्वतःला अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न कंपन्या करीत असतातच. तरीदेखील अधिकाऱ्यांच्या हाती असलेल्या स्मार्टफोनचे फायदे नजरेआड करणेही शक्य (आणि योग्यही) नाही. बरे या दर्जाच्या अधिकार्‍यांकडे त्यांच्या स्थानाला साजेलशी ‘भारी’ म्हणजेच कार्यक्षम उपकरणे असतात. या उपकरणांच्या अंगी असलेल्या नाना कळांचा योग्य वापर व्यवसायवृद्धीसाठी केल्यास त्यातून कंपनीचा खूपच फायदा होऊ शकतो. 

मोठ्या हुद्द्यांवर तुलनेने कमी वयाच्या व्यक्ती बसलेल्या असण्याचे प्रमाणही हल्ली खूप आढळते व असे अधिकारी साहजिकच नवनवी इलेक्ट्रॉनिक माध्यमे वापरत असतात! येत्या काळात कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक साधनांबाबतचे सुरक्षा धोरण ठरवणार्‍यांना हे नवे पैलू तर विचारांत घ्यावे लागतील. शिवाय, इलेक्ट्रॉनिक धोके व हल्ल्यांचे स्वरूप सतत बदलणार आहे, हेदेखील ध्यानात ठेवून अनपेक्षित ठिकाणांहून होणार्‍या आक्रमणांना तोंड देण्याची तयारीही ठेवावी लागेल. स्मार्टफोनच्या वाढत्या वापराने आवाक्यात येणार्‍या संधी आणि उद्भवणारे नवनवे धोके या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे गृहीत धरून रणनीती आखावी लागेल.स्मार्टफोन आणि इंटरनेट ही फार प्रभावी साधने आहेत. त्यांच्यातील छुपे सामर्थ्य ओळखून त्याचा डोळसपणे उपयोग केला तर बरीच कामे सहजपणे होतात, खर्च आणि वेळ वाचतो आणि वापरकर्त्याच्या ज्ञानातही भर पडते.

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *