कोरोना विषाणूमुळे जगभरातील व्यवहार मंदावले अन् जगाची गतीच संथ झाली. सध्या जीवित असलेल्या मानवाकरिता ही ‘न भूतो न भविष्यती’ अशी अवस्था आहे. मग मानवी वर्तनावर त्याचा मोठा परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? हे परिणाम आर्थिक, राजकीय, सामाजिक, मानसिक असे विविध स्वरूपातील आहेत.

मार्चमध्ये टाळेबंदीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया भीती, कुतूहल अशी संमिश्र होती. अनेकांना रोमांचकदेखील वाटले असणार. मुख्य म्हणजे, हा कालावधी लवकरच संपून आयुष्य पूर्ववत सुरू होईल, अशी बहुतेकांची कल्पना होती. मग इटली, स्पेनच्या बातम्या आल्या. युरोप, अमेरिकेत किती वेगाने विषाणू पसरतोय ते कळले. भीती वाढली परंतु आपल्याकडे कमी प्रकरणे आहेत; कडक उन्हाळा, पाश्चात्यांपेक्षा वेगळी जीवनशैली इत्यादीमुळे आपण सुरक्षित आहोत, अशी भावना होती.

या काळात पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर देशातील जनतेने थाळीनाद करून मोठा प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका तसेच पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपण सर्व एकत्र येऊन हा लढा देतोय अशी जनमानसाचे मनोबल उंचावणारी ती घटना होती. पण काहींचा प्रतिसाद इतका उत्सवी होता की, त्यामुळे एकमेकांपासून दूर राहून कृती हा मुख्य हेतूच दूर राहिला.

त्यानंतर उन्हाला न जुमानता भारतातही कोरोना विषाणू झपाट्याने पसरला. यावेळी लोकांच्या मनातील पूर्वग्रह फार दिसले. सरकारचे कसे चुकले किंवा काही समाजगटांमुळे कसा पसरला, यावरून आरोप- प्रत्यारोप वाढले.

पुन्हा ऐक्यभावना वाढावी म्हणून पंतप्रधानांनी एका रात्री घरात अंधार करून दिवे उजळवण्याचे आवाहन केले. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. पण हळूहळू जनमानसातील साशंकता, असुरक्षितता, चिंता, ताण वाढत असल्याचे जाणवले. याचदरम्यान कोरोनावरील विनोद समाजमाध्यमातून पसरणे सुरू झाले. अनेक पाककृती प्रसृत होऊ लागल्या. यामुळे असुरक्षितता, ताण कमी होण्यास मदत झाली.

त्यानंतर अचानक आपापल्या मूळगावी किंवा प्रांतात परतणारे, पायी किंवा मिळेल त्या वाहनांनी कुटुंबांसकट गर्दीने निघालेले लोक आढळू लागले. जवळचे पैसे संपले, उपासमार अशी महत्त्वाची कारणे होतीच. मात्र, अनेकांबाबत मानसशास्त्रीय परिभाषा वापरायची तर बँडवॅगन परिणामही जाणवला. म्हणजे, काहीजण एखादी कृती करतात कारण इतर अनेकजण ती करतात, त्याचा मुळीच साधकबाधक विचार होत नाही. हे ठळकपणे दिसले.

टाळेबंदीदरम्यान दोन प्रवृत्ती प्रामुख्याने आढळल्या. खूप ताण घेणारे. यामुळे आहार,ऍक्युप्रेशर, घरगुती औषधांबाबत जे उपाय सुचवले जातील, ते सर्व अंमलात आणणारे. तर दुसरी बेदरकार प्रवृत्ती. कुठलीही दुर्घटना स्वतः सोडून इतरांबरोबर घडू शकेल असे मानणारे. यामुळे कुठलीही दक्षता न घेता बिनधास्त वावरणारे. सहसा तरूणांमध्ये आढळून येणाऱ्या या वर्तनाला मानसशास्त्रात ‘पर्सनल फेबल इफेक्ट’ असे नाव आहे. हा परिणाम सर्व वयोगटात दिसला.

तिसरी गमतीदार परंतु सर्वाधिक आढळून आलेली प्रवृत्ती म्हणजे, सोयीनुसार टाळेबंदीचे नियम पाळणे किंवा मोडणे. अशा वागण्यामुळे आपण स्वतःचा जीव धोक्यात घालतोच, पण आपल्या  सहवासात येणाऱ्या इतरांनाही त्रास होऊ शकतो, हे त्यांच्या गावीही नसल्याचे दिसले. वृथा समर्थनासारख्या स्व- संरक्षक यंत्रणा वापरून स्वत:च्या वागण्याचे समर्थनही केले जाते. समाजात अंतर राखून कसे वावरावे, हे अनेकांना लक्षात येत नाही असेही दिसले.

टाळेबंदी अपेक्षेपेक्षा दीर्घकाळ लांबल्याने अनेकांची जणू सहनशीलता संपली. पूर्वी घेतलेली दक्षता झुगारत विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाही ते मोकळेपणाने हिंडू लागल्याचेही पाहण्यात आले. एकंदरीत मानवी स्वभावाच्या सर्व मर्यादा व शक्यता वर्तनांतून आढळल्या.

टाळेबंदीचे आर्थिक तोटे जरी बरेच असले, तरी काही फायदे नजरेआड करण्यासारखे नाहीत. स्पर्श नको म्हणून ऑनलाइन व्यवहार खूप वाढले. कामवाल्या बायका येणे बंद झाल्याने घरकामाची वाटणी सुरू झाली, स्वावलंबनही वाढले. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाऊ लागले. किराणा, भाजीसारख्या विविध सेवा घरपोच उपलब्ध झाल्या. शेतकरी ते ग्राहक चळवळीलाही चालना मिळाली.

वेबिनार, ऑनलाइन वर्तमानपत्रे वाचणे, ऑनलाइन व्यायाम, शिक्षण, कलाकौशल्ये इत्यादी शिकणे जमू लागले. स्वतःसाठी तसेच आप्तस्वकीयांसाठी वेळ मिळाला. छंद जोपासण्यासाठी वेळ मिळाला. आत्मपरीक्षण करून स्वतःला बदलण्याची संधी मिळाली. घरचे अन्न मिळाल्याने तब्येती सुधारल्या. प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून योग्य आहार, पुरेशा व्यायामाचे महत्त्व पटले.

जगभर पसरलेल्या या साथीमुळे घडून येणाऱ्या सर्व परिणामांचे परस्परसंलग्न स्वरूप लक्षात घेऊन जगातील मानसशास्त्रज्ञांनी मानसिक परिणामांचा अभ्यास सुरू केलाय का, याचा कुतूहलाने शोध घेतला. त्याचा थोडक्यात आढावा.

यामध्ये भारतातील एक, जेथे या विषाणूचा उगम झाला त्या चीनमधील एक, आपला शेजारी व समान संस्कृती असलेल्या पाकिस्तानातील एक व स्पेनमध्ये मोठी जीवितहानी झाली म्हणून तेथील एक अशा एकूण चार अभ्यासांचा थोडक्यात आढावा मांडला आहे. दिलेल्या संदर्भांच्या मदतीने जिज्ञासूंना सविस्तर वाचन करता येईल. या अभ्यासांत केवळ मानसिक परिणामांचाच विचार केला आहे, हे नमूद करणे आवश्यक वाटते.

भारतीय अभ्यासात असे दिसते की, या आजाराच्या अनिश्चित स्वरूपामुळे वाटणारी भीती, चिंता व टाळेबंदी आणि विलगीकरणासारख्या आवश्यक पण व्यक्तीला समाजापासून दूर ठेवणाऱ्या कृतींमधून आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, तीव्र भीतीजन्य विकार इत्यादींमध्ये वाढ होते.

विशेषतः एकाकी, कुटुंबापासून दूर रहाणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित व्यक्तींमध्ये समाजमाध्यमातील चुकीच्या माहितीमुळे अशी संभाव्यता वाढते. याच्या निवारणासाठी काही उपाय सुचवले आहेत. फोनवरून समुपदेशन, आवश्यक ती प्रत्यक्ष मदत, मदत-गट, ध्यानध्यारणेद्वारा मन शांत ठेवण्यासाठी प्रशिक्षण वगैरे.

पाकिस्तानातील अभ्यासातही नमूद केले आहे की, आपल्या संस्कृतीमध्ये समाज व सामाजिक संबंध फार महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे सामाजिक अंतर, विलगीकरणासारख्या कृती कराव्या लागण्याचा मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे तणावजन्य वर्तन घडू नये, यादृष्टीने काही प्रशिक्षण व्यक्तीला असावे. अशा कृतींचे थोडे पूर्वनियोजन (Psychological crisis interventional program) करता येईल.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, निद्रा व ध्यान या कृतींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. वर्तमानात राहता येणे- क्षणस्थ होणे शिकायला हवे, असे प्रतिपादन केले आहे. नैराश्य किंवा चिंतेपासून स्वतःला वाचविण्यासाठी वादन, गायन, चित्रकला, नवीन भाषा आत्मसात करणे, विणकाम, बागकाम, पाककला इत्यादीमध्ये गुंतवून घेणे; वाचन, सिनेमा किंवा मालिका पाहणे, बैठे खेळ खेळणे असे अनेक उपाय सुचवले आहेत.

शिवाय, आवश्यकता भासल्यास ऑनलाईन समुपदेशन, मानसोपचार उपलब्ध असणे हेही उपयोगी असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे सर्वच उपाय आपल्याकरताही योग्य आहेतच. 

चीनमधील अभ्यास वुहान शहरातील असून विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या रूग्णांमधील उभारी धरण्याच्या क्षमतेचे त्यात मापन केले आहे. पूर्ण शहर टाळेबंदी अनुभवत असल्याने आणि स्वतः, कुटुंबातील सदस्य किंवा परिचितास झालेल्या संसर्गामुळे नागरिक तीव्र दहशतीखाली होते. त्यांच्यात पुन्हा उभारी येण्यासाठी मानसोपचार अत्यंत उपयोगी ठरतील, असे यात नमूद आहे. विशेषतः, विवेकनिष्ठ मानसोपचारांचा उपयोग होईल, असे अभ्यासकांना वाटते. मात्र, मानसोपचार औषधोपचारांच्या साथीने असावेत, हेही त्यांनी सांगितले आहे.

शेवटी स्पेनमधील अभ्यास पाहिला. कोरोना विषाणूने बाधित किंवा रूग्णसंपर्कामुळे तीन आठवडे एकटे राहावे लागलेल्या व्यक्तींच्या आरोग्यबाधक वर्तनाचा हा अभ्यास होता. जसे मोबाईल-टीव्ही बघत राहणे, मद्यपान, धूम्रपान, अपुरी झोप इत्यादी.  

त्यांना आढळले की, एकटे रहाण्याच्या सुरूवातीच्या काळात प्रस्तुत कृती वाढल्या. परंतु मोबाईल, टीव्ही बघण्याचा कालावधी सोडल्यास जसजसा काळ जाईल तसतशा इतर वाईट सवयी खूपच कमी झाल्या. यावरून अभ्यासकांनी निष्कर्ष काढला की, घरून काम, ऑनलाईन शिक्षण यांचे प्रमाण वाढविल्यास लोकांच्या आरोग्यावर अनुकूल प्रभाव पडू शकतो.

वरील अभ्यासांशिवाय अनेक देशांत अनेक मानसशास्त्रीय अभ्यास सुरू आहेत असे दिसले. त्यांचे निष्कर्ष यथावकाश मिळतीलच. उपलब्ध माहितीवरुनही सूज्ञांस योग्य बोध व उपयोग होईल, असे वाटते. जागतिक इतिहास पाहता स्पॅनिश फ्लू, प्लेग अशा महामारीच्या विनाशकारी साथी येऊन गेल्या, तरी मानवाने योग्य समायोजन करून, स्वतःला बदलून पुन्हा उभारी धरली. यावेळीही तसेच घडत आहे.

अरूंधती मुंजे

अरूंधती मुंजे या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, डोंबिवली येथील मानसशास्त्र मानसशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका, विभागप्रमुख व समुपदेशक म्हणून कार्यरत होत्या.

 

 

 

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *