संवादासाठी आवश्यक कौशल्ये: ऐकणे आणि ऐकून घेणे

Art of Speaking & Listening. Source: www.vectorstock.com

पुणे आकाशवाणी सुरु होऊन नुकतीच ६५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने वाचलेल्या एका लेखात आकाशवाणीचा गौरव करणारे माजी राष्ट्रपती स्वर्गवासी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे एक वाक्य लक्षवेधक वाटले. त्यांनी लिहीले होते की, ‘लहानपणापासून आपले पालक, शिक्षक, आदी अनेकजण आपल्याला लिहायला वाचायला, बोलायला, शिकवतात. पण लक्षपुर्वक कसे ऐकायला हवे, हे मात्र कुणीच शिकवत नाही. हे नेमके काम आकाशवाणी करते.’ 

हे वाक्य वाचताच डोळ्यासमोर अनेक उदाहरणे दिसू लागली. दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णाची अवस्था कशी आहे, त्याच्या प्रकृतीविषयी कोणती काळजी घ्यावी; वैद्यकीय उपचार कशा पद्धतीने चालू आहेत इत्यादी माहिती डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना जवळ बोलावून वेळोवेळी सांगत असतात. पण ते नीट ऐकून न घेता नातेवाईक डॉक्टरांना त्याच संदर्भात पुन:पुन: प्रश्न विचारतात, त्यांचा वेळ घेतात. शिवाय उगाचच गोंधळून पण जातात. 

पालकसभेला शाळेत आलेले पालक शिक्षकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, त्यांनी जे वर्गात सर्वांसाठी सांगितलेले असते तेच पुन:पुन: आपल्या मुलाबाबत विचारतात. तसेच, घरातसुद्धा आईवडील मुलांना चांगल्या सवयी, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती किंवा व्यायाम आणि अभ्यास याविषयी जे जे सांगतात ते ऐकून न घेता मुले फक्त ऐकल्यासारखे करतात आणि तो विषय कानाबाहेर टाकतात. 

यामुळे सांगणारा जे सांगत असतो ते ऐकणा-याला मुळीच समजत नाही. यामुळे समज वाढण्याऐवजी अशा प्रसंगी गैरसमजच निर्माण होतात. म्हणून, ‘लक्षपुर्वक ऐकणे’ ही बाब अतिशय महत्वाची म्हणावी लागेल. अशा परिस्थितीत आकाशवाणीने केलेले काम किती मोलाचे आहे आणि आपली पिढी त्याबाबतीत किती भाग्यवान आहे, याची मला जाणीव झाली. 

खरे म्हणजे, ऐकणे आणि ऐकून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काहीही ऐकताना आपले त्याकडे शंभर टक्के लक्ष असेलच असे नाही. पण ऐकून घेताना मात्र आपण त्याकडे काळजीपुर्वक लक्ष देतो. 

उदाहरणार्थ, आपण एखादे काम करत असताना रेडिओ, मोबाईल किंवा टीव्हीवर गाणे ऐकतो. पण त्यातले शब्द, त्यांचा अर्थ त्यावेळी आपल्या मनापर्यंत पोहोचेल असे नाही. कारण, आपण फक्त एक विरंगुळा म्हणून गाणी ऐकत असतो. 

याऊलट, गाणी किंवा कविता सादरीकरणाच्या एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा आवर्जून जातो, तेव्हा मात्र ऐकत असलेल्या कवितेचे किंवा गाण्याचे शब्द, त्यांच्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा, गाण्यातले संगीत आपल्याला भावते. या प्रक्रियेला ऐकून घेणे असे म्हणता येईल. 

काही माणसांना कुणाचे ऐकून घेण्याची अजिबात सवय नसते. आपण त्यांना काही सांगायला गेलो की, ते स्वत:चेच काहीतरी सांगायला सुरुवात करतात. मग आपल्याला आपले बोलणे मध्येच सोडून देऊन त्यांचे ऐकावे लागते. त्यांचे संपल्यावर आपण पुन्हा बोलायला लागलो की ते आपले बोलणे ऐकत आहेत, असे आपल्याला वाटते. 

परंतू, आपले बोलणे संपल्यावर ते असे काही बोलतात किंवा विचारतात, की त्याचा आपण ज्याविषयी त्यांना काही सांगत असतो, त्याच्याशी काहीही संबंध नसतो. काही वेळा आपण त्यांना जे काही सांगत असतो ते नीट ऐकून न घेता ते आपल्याला पुन्हा त्याच गोष्टीविषयी विचारतात. अशावेळी ही व्यक्ती आपले बोलणे ऐकून घेत नाही, हे आपल्या लगेच लक्षात येते आणि आपण आपले बोलणे बंद करतो. अशा लोकांशी कोणत्याही बाबतीत संवाद साधणे अवघड असते.

बऱ्याचदा आपण सहजपणे एखाद्या विषयावरचे आपले मत सांगू लागलो की, काही लोक ते पूर्ण ऐकून न घेता, त्याविषयी इतके सविस्तर बोलतात आणि त्याविषयावर त्यांचे मत, अनुभव याचे पाल्हाळ लावतात. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या उत्साहावर पाणी पडते. 

संवाद साधण्यासाठी समोरच्या माणसाचे ऐकून घेणे हे गरजेचे असते. ज्याच्याजवळ ही कला असते, अशी माणसे लोकांना आवडतात. त्यांच्याजवळ आपले मन मोकळे करायला लोकांना आवडते. त्यामुळे अशी माणसे कुटुंबात, समाजात अधिक लोकप्रिय असतात.

काही काही लोक ऐकताना मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीचा भूतकाळ आठवत असतात. म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, कोणत्या विषयावर तिची प्रतिक्रिया कोणत्या प्रकारची असते आदी गोष्टींवरुन तो काय म्हणत असेल याचा ते अंदाज लावतात. यामुळे प्रत्यक्षात ती व्यक्ती काय सांगत आहे हे ते ऐकून घेत नसतात.  

याऊलट, लहान मुले मोठ्या माणसांनी सांगितलेल्या कथा किंवा गोष्टी जेव्हा ऐकतात, तेव्हा त्यांच्या मनात कथेविषयी कुतूहल, ऐकण्याची उत्सुकता, नवीन शिकण्याची तयारी असते. अतिशय निरागसतेने ती ऐकतात व त्यावर विचारही करतात. केव्हातरी त्यासंबंधी प्रश्न विचारतात. 

अशीच उत्सुकता मोठ्या माणसाला असेल तरच त्याला सांगणारा नक्की काय सांगत आहे हे समजते. नाहीतर तो त्याचा वेगळा अर्थ काढतो आणि सांगणा-या व्यक्तीविषयी गैरसमज करुन घेतो. टीव्हीवर लागणा-या आणि महिनोमहिने चालणाऱ्या मालिकांमध्ये याच सूत्राचा प्रामुख्याने उपयोग केलेला आढळतो.

ऐकणे या माणसाच्या साध्यासुध्या नैसर्गिक क्रियेची आज ही अवस्था का झाली असावी? 

याचे एक कारण असे की, आजकाल माणसे एकावेळी अनेक गोष्टी करायला बघतात. उदाहरणार्थ, टीव्ही बघताना माणूस मोबाईलवर आलेले मेसेज वाचत असतो. कुणाशीतरी फोनवर बोलत असतो. एखादी गृहिणी गॅसवर ठेवलेल्या कुकरच्या होणा-या शिट्ट्या मोजत असते. 

दुसरे कारण म्हणजे, सर्वसाधारणपणे माणसाला कुणाचे ऐकण्यात विशेष रस नसतो. समोरच्या माणसाला ज्या विषयावर बोलायचे आहे, त्या विषयाची माहिती त्याच्यापेक्षा मला जास्त आहे, अशी त्याची कल्पना असते. म्हणून, समोरच्या माणसाने मला काही ऐकवण्यापेक्षा मला काय म्हणायचे आहे, मी काय सांगतोय त्याकडे आधी लक्ष द्यावे अशी त्याची अपेक्षा असते. 

यामुळे कुणीही काहीही सांगायला लागला की अशी माणसे स्वत:च बोलायला लागतात. याचा परिणाम असा होतो की, अशी माणसे नुसती ऐकतात, ऐकून घेत नाहीत. 

मग, ज्याठिकाणी ऐकून घेण्याच्या सहज क्रियेवाचून चालतच नसेल, तिथे काय होईल? 

उदाहरणार्थ, शाळा, कॉलेजात शिक्षक किंवा प्राध्यापक विषय समजावून देताना काहीतरी सांगत असतात; आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकून त्यावर विचार करावा अशी साधारण अपेक्षा असते. पण ही क्रिया मुलांना जमत नसेल तर शिक्षक काय शिकवीत आहे हे त्यांना समजणार नाही. शेवटी शिक्षकांना नीट शिकवता येत नाही, असा सार्वत्रिक समज निर्माण व्हायला मदत होते.        

म्हणूनच आजकाल सर्वच क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि सामान्य लोकांना ‘संवाद कौशल्ये’शिकवावी लागतात. त्याच्या वेगवेगळ्या शिकवण्या असतात. 

खरे पहाता ही कौशल्ये म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ऐकणे आणि ऐकून घेणे म्हणजे काय, हे प्रात्यक्षिकासह दाखवणे असते. ही कौशल्ये माणसाला अवगत झाली तरच तो विचारांची देवाणघेवाण करू शकतो. समाजातल्या सर्व लोकांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवू शकतो. 

व्यवस्थापकीय पदावर काम करणा-या लोकांना ही संवाद कौशल्ये अंगिभूत असल्याशिवाय त्यांच्या हाताखालच्या लोकांवर नियंत्रण आणि सुयोग्य व्यावसायिक संबंध ठेवता येत नाहीत. विशेषत: विपणन क्षेत्रातील लोकांसाठी तर हे फारच महत्त्वाचे कौशल्य मानले जाते. 

थोडक्यात, ऐकणे आणि ऐकून घेणे या दोन्ही गोष्टी माणसाची समज वाढवणा-या आणि समाधान देणा-या असतात.

सुहास परळे

सुहास परळे हे केंद्र शासनात ऑडिट ऑफिसर म्हणून २०१४ पर्यंत कार्यरत होते. ते सध्या विविध मासिकांमधे कविता, गोष्टी आणि लेख लिहितात.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *