लोकमान्य, बॅ. जिना, एम.सी. छागला व मुंबई उच्च न्यायालय

लोकमान्य टिळकांवर सरकारबद्दल अप्रीती निर्माण करणे व देशद्रोह ह्या कारणास्तव तीन खटले भरण्यात आले. १८९७ साली पुण्यात प्लेगची साथ सुरु होती. लष्कराचे जवान प्लेगचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघर जात होते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकांमध्ये असंतोष पसरला होता. त्याचसुमारास लोकमान्यांनीकेसरीमध्ये शिवराज्याभिषेक सोहोळ्यावर एक अहवालस्वरूप लेख प्रसिद्ध केला. त्यात महाराजांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाचे समर्थन करणारा एकलेख लिहिला होता. कोणी फळाची अपेक्षा न ठेवता कोणेतेही कृत्य करत असेल तर त्या कृत्याबद्दल त्याला दोषी धरता कामा नये,महाराजानी आपले पोटभरण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अफझलखानाचा वध केला, आपल्या घरात चोर शिरला व त्याला हाकलवुन देण्याची आपल्यात ताकदनसेल तर आपण त्याला कोंडून जिवंत मारून टाकले पाहिजे,हिंदुस्थानवर राज्य करण्याचे ताम्रपत्र परमेश्वराने कोण्या परकीयांना बहाल केलेले नाही असे त्यालेखात म्हटले होते.

त्यानंतर एक आठवड्याने कलेक्टर रँड व लष्करी आधिकारी आयर्स्ट ह्यांचा पुण्यात खून झाला. सरकार व गोऱ्या साहेबांचे असे मत झाले की टिळकांचीचिथावणीखोर भाषणे व लेख ह्यामुळेच हे खून झाले व म्हणुन सरकार बद्दल लोकांच्या मनात अप्रीती निर्माण केली ह्या कारणास्तव भारतीत दंड संहितेच्याकलम १२४ अ नुसार सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला. टिळकांचा जामीन अर्ज दोनदा नाकारण्यात आला परंतु तिसऱ्यांदा उच्च न्यायालयाने त्यांना रुपयेपन्नास हजार ह्या भरभक्कम रक्कमेचा जामीन मंजुर केला व ती रक्कम चोवीस तासात जमा  करण्यास सांगितले. तोपर्यंत लोकमान्यांना न्यायालयाच्याप्रशासकीय आधिकाऱ्याच्या कार्यालयात बसवुन बसवून ठेवण्यात आले होते.द्वारकादास धरमसी ह्या प्रतिष्ठीत व्यापाऱ्याने (जे पुढे मुंबईचे शेरीफ झाले) चारतासात ही रक्कम जमा केली. पुढे खटला चालुन ज्युरीने त्यांना दोषी ठरवले व लोकमान्यांना  अठरा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. उच्च न्यायालय व प्रिव्हीकौंसिलनेही लोकमान्यांचे अपील फेटाळले.

त्यानंतर मुझप्परपुर इथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दोन युरोपियन महिलांच्या हत्येबाबत केसरीत लिहिलेल्या लेखांसंबंधात त्यांच्यावर १९०९मध्ये पुन्हा खटला भरण्यात आला.“अशा मार्गाने इंग्रजांचे राज्य घालवता येणार नाही पण जे राज्यकर्ते सत्तेचा जुलुमी वापर करतात त्यांनी हे लक्षात ठेवावे कीमनुष्यमात्राच्या सहनशीलतेला सीमा असते, सरकारने जर आपल्या कर्तव्यात कसुर केली तर मुझप्परपुरसारख्या घटनांची पुनरावृत्ती अटळ ठरेल” असेलोकमान्यांनी त्या लेखात म्हटले होते.”विनाशकाले विपरीत बुद्धी” ह्या नावाचा आणखी एक लेख लिहुन लोकमान्यांनी सरकार पक्षावर कडक टीका केलीहोती. त्यात त्यांनी बंगालमध्ये होणाऱ्या बॉम्ब हल्ल्याच्या मुळाशी असणाऱ्या कारणांची मीमांसा केली होती. त्याच्या मुळाशी देशभक्ती आहे व बॉम्बचा उपयोगथांबवायचा असेल तर सरकारने असे वर्तन केले पाहीजे की कोणाही गरम डोक्याच्या व्यक्तीला बॉम्ब फेकावासाच वाटणार नाही. हे प्रकार टाळावयाचे असतीलतर लोकांना स्वराज्यासारखे महत्वाचे आधिकार बहाल करावयास हवेत असेही त्यांनी ठणकावले होते.  

लोकमान्यांनी आपला बचाव स्वतःच केला.माझ्यावर केलेले आरोप हे लेखातील मूळ शब्दानुसार केलेले नसुन ते भाषांतरीत आहेत, ज्युरी हे मराठी भाषिकनाहीत, त्यांना केसरी वाचणाऱ्या वाचकांची काही माहीती नाही त्यामुळे ते लेखांचा वाचकांच्या मनावर काय परिणाम झाला ते कसे काय ठरवणार असा अत्यंतमहत्वाचा युक्तिवाद त्यांनी केला. लेखाचे उद्देश हे लोकांना समजावणे व सुधारणा करणे हे आहेत. वास्तवातील परिस्थितीचे वार्तांकन करणे व भावनाभडकावणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत, तो देशद्रोह होत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. अर्थातच त्यांचा युक्तिवाद अमान्य करून ज्युरीने सात विरुद्ध दोनमतानी त्यांना दोषी ठरवले व सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली.

शिक्षा ऐकल्यावर टिळकांनी “ज्युरींचा निकाल काहीही असला तरी मी निर्दोषआहे असे मला ठामपणे वाटते.मी ज्या उदिष्टांसाठी लढत आहे ती उद्दिष्टे माझी वाणी व कलम ह्यापेक्षा मला होणाऱ्या त्रासामुळे आधिक सफल होतीलअशीच ह्या जगाचे रहाटगाडगे चालवणारी जी शक्ती आहे तीची इच्छा असावी असे दिसते” असे तेजःपुंज उदगार काढले.

कायदेशीर दृष्ट्या खटला भरणे योग्य असले तरी ती राजकीय दृष्ट्या घोडचूक होती व त्यात शिक्षा देताना न्यायाधीशांनी वापरेल्या अतिरेकी शब्दांमुळे भरचपडली अशी सर्वत्र टीका झाली. न. चि. केळकर ह्यांनी “लाल झग्याचा वैदु” अशी न्यायमूर्तीची संभावना केली. तत्कालीन सेक्रेटरी ऑफ स्टेट मोर्ले ह्यांनी खटलाव दिलेली शिक्षा ह्याबाबत नाराजी प्रगट केली व ह्यापुढे कोणताही राजकीय खटला भरण्यापूर्वी स्थानिक सरकारने भारत सरकारकडे हा विषय मांडावयास हवाअसा नियम केला. परंतु शोकांतिका ही की भारतीय देशभक्तांवर खटले भरल्यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये आपले महत्व वाढते व आपण लोकप्रिय होतोअसा इंग्रज नोकरशहांचा समज कायम राहीला व देशभक्तांवर खटले भरण्याचे अंध धोरण त्यांनी चालुच ठेवले.

ही शिक्षा भोगुन झाली नाही तो लगेचच त्यांच्यावर त्यांनी दिलेल्या तीन भाषणांवरून देशद्रोहाचा तिसरा खटला भरण्यात आला. घटनात्मक मार्गाने स्वराज्यमिळवणे हा त्यांच्या भाषणाचा गाभा होता. इंग्रज राज्यकर्ते शहाणे व शिकलेले असतील पण ते जनतेने निवडून दिलेले नाहीत व म्हणुन भारतीयांना कसे खुशकरायचे हे त्यांना ठाऊक नाही, मनुष्य जसा मोठा झाला की त्याला स्वातंत्र्य देतात तेच तत्व राष्ट्राच्या जीवनातही अमलात आणावयास हवे असे लोकमान्यांनीआपल्या भाषणात म्हटले होते. दंडाधिकाऱ्यानी अपेक्षेप्रमाणे त्यांना दोषी ठरवले परंतु संदर्भित भाषणांचे साकल्याने वाचन केले असता ह्या भाषणांमुळेसरकारबद्दल अप्रीती निर्माण होत नाही असे म्हणत उच्च न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा निर्णय रद्दबादल ठरवला.  

वर उल्लेख केलेल्या दुसऱ्या खटल्याच्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेला त्या खटल्यातील न्यायमूर्ती दावर ह्यांच्या सन्मानार्थ भोजनसमारंभ आयोजित करावयाचा होता. तसे परिपत्रक काढुन ज्यांना ह्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी सही करून आपला होकार कळवावा ह्यासाठी तेवकीलांकडे पाठवण्यात आले. 

हे पत्रक बॅ.महंमद अली जीनांकडे आले असता त्यांनी त्यावर सरकारला जे हवे ते केल्याबद्दल व एका महान देशभक्ताला क्रूरशिक्षा देऊन तुरुंगात धाडल्याबद्दल अशा न्यायमूर्तीच्या सन्मानार्थ भोजन समारंभ आयोजित करताना तुम्हाला शरमकशी वाटत नाही असा खरमरीत शेरा मारला.

ह्यावर न्या दावर ह्यांनी विचारणा केली असता “मी जे खरे आहे ते लिहीले आहे व आपण ज्या पद्धतीने हाखटला चालवला त्याबद्दलच्या आपल्या तीव्र भावना आपण दाबुन ठेऊ शकलो नाही” असे उत्तर जीनांनी दिले. जीनांना लोकमान्यांबद्दल अपार आदर होता. पुढेपुढे त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली तरी टिळकांबद्दल एक अपशब्दही त्यांनी कधी काढला नाही. सार्वजनिक जीवनातील ज्या दोन व्यक्तींबद्दल त्यांनासर्वाधिक आदर होता त्या दोन व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक व नामदार गोपाळ कृष्ण गोखले.

पुढे १९५६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या दालनात खटला चालुन टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती त्या दालनाबाहेर टिळकांचे वरील तेजःपुंजउदगार कोरलेला एक स्मृतीफलक लावण्यात आला. त्याचे अनावरण करताना मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती एम. सी. छागला ह्यांनी हेअनावरण करण्याची संधी मिळणे हा आपला फार मोठा सन्मान आहे उदगार काढले. ह्या अनावरणाने देशाच्या थोर सुपुत्राला दोषी ठरवुन जो त्रास  सहन करावालागला त्याचे प्रायश्चित्त घ्यायची संधी मिळाली व आज स्वतंत्र भारतात उच्च न्यायालय कार्य करत आहे व त्या न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी एक भारतीयविराजमान आहे ह्याचे बरेचसे श्रेय हे लोकमान्यांनी भोगलेल्या हालपेष्टांना व केलेल्या त्यागाला आहे असेही भावनोत्कट उद्गार न्या. छागला ह्यांनी त्या प्रसंगीकाढले. ह्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली पण ते आपल्या भूमिकेवर व विचारांवर ठाम राहिले व त्याचे त्यांनी जोरदार समर्थनही केले.

विजय त्र्यंबक गोखले

विजय त्र्यंबक गोखले अधिवक्ता असुन आर्थिक व कायदेविषयक साक्षरतेसाठी कार्य करतात.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *