वासू बलात्कार कर, असं वासूला प्रत्यक्षपणे कोणी  सांगत नाही. परंतू तरीही तो बलात्कार करतोच. आपल्या सभोवताली असे शिक्षित, अशिक्षित, प्रौढ, अल्पवयीन, विवाहित, अविवाहित, फेसबुकवर असणारे किंवा नसणारे अनेक वासू आढळतात. इतकंच नव्हे तर वासूला आपण भाऊ, मामा, आजोबा, शिक्षक या रुपात सुद्धा बघितलेलं आहे.

कधीकधी तो एवढा लिंगपिसाट झालेला असतो की, आपली वासना शमविण्यासाठी तो संधीच्या शोधात असतो. शेवटी त्याची नजर कमल या आपल्याच थोरल्या मुलीवर येऊन थांबते.  

कमल हा सगळा प्रकार गेले चार महिने सहन करत असते. तिची शारिरीक विकलांग आई हा सगळा प्रकार माहीत असूनही कमलची मदत करू शकत नाही. पोलिसात तक्रार करावी तर तिथेही हाती निराशाच लागते.  

वासूसारख्या धनाढ्य व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली जात नाही. याउलट कमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला माघारी पाठवले जाते.  वासू कमलवर पाशवी अत्याचार करतच असतो. सरतेशेवटी कमल परिस्थितीपुढे हतबल होत गळफास घेऊन आपलं अंधारमय जीवन कायमचं  संपविते.

प्रशासन आणि कुटुंब या दोन्ही व्यवस्थांचा बळी कमल ठरते. आतापर्यंत या देशात अशा कित्येक कमलचा आवाज कायमस्वरूपी दाबून टाकण्यात आला, ज्याचा मागमुसही तुम्हाला लागला नसेल .

अशीच  घटना हैद्राबादची. वासनेच्या नशेत धुंद असणाऱ्या  या नराधमांनी डॉ. प्रियंका रेड्डीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा बळी घेतला. अगदी रानटी पद्धतीने तिच्या अब्रूचे लचके  घेत राहिले. तिच्या शरीराचा मनमुराद भोग घेऊन तिला निर्दयीरित्या पेटवत तिची हत्या केली. अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे. कारण या घटना आज नाही थांबल्या तर उद्याही थांबणार नाहीत.  

मूळात न्यायपालिकेचे काम गुन्हेगाराला दंड ठोठावण्यापुरते मर्यादित नाही. यातून समाजाला संदेश देणे हेदेखील न्यायपालिकेचे कर्तव्य आहे. 

अशा बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन समाजामध्ये प्रखर संदेश देण्यास मदत होईल. परिणामी, पुरुषसत्ताक लिंगपिसाट वृतीला आळा बसण्यास मदत होईल.

आज प्रियंका आहे. उद्या तिच्या जागी तुमच्या  घरातली स्त्री असू शकते. हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई…ही यादी आणखी पुढे जाऊ नये म्हणून अशा नराधमांना फक्त नि फक्त फाशीच झाली पाहिजे.  

लैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडल्यानंतर न्यायपालिका  दंडात्मक कार्यवाही करतेच. परंतू असे बलात्कार घडू नयेत, याची प्राथमिक जबाबदारी आपण कितपत घेतो? अशा घटना घडल्या की आपण प्रशासनव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभारून मोकळे होतो.  

मान्य की प्रशासनात काही चुका आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटक म्हणून आपण तरी आपली जबाबदारी किती नेटाने पार पाडतो? कोणताही पुरुष जन्मतः बलात्कारी नसतो. मग असे नराधम पुरुष घडतात तरी कसे? एक समाजशील पुरुष घडवण्यात आपण सपशेल अपयशी तर ठरत नाही ना?

पुरुषसत्ताक वृत्तीची पाळंमुळं आपल्या समाजात आढळतात. अनेक कुटुंबाचा समाज बनतो. परिणामी, एक समाजशील  पुरुष घडविण्याचे प्रत्यक्ष काम कुटुंब व्यवस्था करत असते.

ज्याप्रकारे समाजात ‘स्त्री’ जन्माला येत नाही तर ती घडवली जाते; त्याचप्रमाणे ‘पुरुष’ हा जन्माला येत नाही तर तो सुद्धा घडविण्यात येतो. स्त्री आणि  पुरुष घडविण्याचे बाळकडू हे आपल्या ‘संस्कारी’ कुटुंबांमधूनच दिले जाते.  

प्रत्येक पुरुषाच्या जीवनात सगळ्यात मोठा अध्याय शिकविला जातो तो म्हणजे पुरुषसत्ताकतेचा.

“तू मुलगा आहेस. मुलींसारखा रडतोस काय?”

“तू मुलांसोबत खेळ बघू. मुलींबरोबर कसला खेळतोस?”

“तू स्वयंपाक नाही करायचास. जा, जाऊन खेळ बघू. जा, जाऊन क्रिकेट खेळ .”

“बायकांना डोक जरा कमीच असतं; तू मर्द आहेस; बाईला जिंकण्यात मर्दानगी असते.”

थोडक्यात, तू मर्द आहेस, हेच त्या पुरुषाच्या मनावर बिंबवलं जातं.

आपली संस्कृती फार महान आहे. तिचा कायम उद्धार होत राहो. आपल्या समाजात मुलगा- मुलगी भेटणे म्हणजे असंस्कृतपणा. आपल्या संस्कृतीनं शिकवलं आहे की, लग्नाआधी संभोग वाईट. म्हणून लग्नापर्यंत थांबून सगळी कसर काढली तरी चालेल. मग  पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तरी चालेल. ती विरोध तरी कसा दर्शवणार, कारण नवऱ्याची मर्जी राखण्याचं शिक्षण तिला आधीच देण्यात आलं आहे.  

एक स्त्री आणि पुरुष घडविण्याचा  पद्धतशीर कार्यक्रम कित्येक  वर्षांपासून चालू राहिला आहे आणि पुढेही राहील. उदाहरणार्थ, तिला मासिकपाळी आली की स्वयंपाकावर बंदी, मंदिर प्रवेशावर बंदी. पाळी येणे हा काय आजार आहे ?

मुलामुलींनी एकमेकांना आलिंगन देण्याला आपला विरोध असतो. पण पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी शिश्न काढून मुत्रविसर्जन केलेली चालते. होय ना?  

स्त्री व्यभिचारी आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते. थोरामोठ्यांनी ठरवलेला विवाह म्हणजे ‘अरेंज्ड मॅरेज’ करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही चाचणी दयावी लागते. कित्येक वर्षापासून ही  परंपरा चालत आली आहे.

लग्न झाल्यानंतर त्याच मंडपात लगेचच पंचायत भरवली जाते. तिथे नवविवाहित जोडप्याला मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं. जोडप्याला एखाद्या खोलीत घेऊन जातात. यावेळी त्यांच्यासोबत दोन्हीकडेचे नातेवाईक उपस्थित असतात. मग खरा खेळ सुरू होतो. पांढऱ्या चादरीवर रक्ताच्या डागांचा तमाशा पाहणारा खेळ.  

दुसऱ्या दिवशी नवऱ्यामुलाला प्रश्न विचारतात ‘तुझा माल कसा होता? खरा की खोटा?’ कधीकधी त्याहूनही अतिशय घृणास्पद भाषेत विचारलं जातं, ‘तुला जी गोण दिली होती, ती तू फाडलीस की आधीच फाटलेली होती?’

आजही या समाजाची खोटी इभ्रत स्त्रीच्या योनीभोवती फिरत आहे. कौमार्य शाबूत राहणे म्हणजे आपल्या खानदनाची अब्रू राखणे होय.  

व्वा!!! बघितलंत लैंगिकतेची वैचारिक दिवाळखोरी.  

या सगळ्या घडामोडींवरुन आपण स्त्रियांना किती हीन दर्जाची वागणूक देतो हे स्पष्ट होते. पुरूषसत्ताक वृत्ती आणि आपलं लैंगिक अज्ञान या दोन्हीच्या भागीदारीमुळे अशा घटनांना खतपाणी मिळत आहे.  

संभोग आणि बलात्कारामध्ये फरक असेल तर तो म्हणजे स्त्रीची संमती. भारतीय दंड संहिता, १८६०  कलम क्र. ३७५ मध्ये हीच गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित केली आहे.  

पुरुषी समाजव्यवसथेत  तिच्या संमतीचा आदर करायला आपण खरंच शिकवतो का? ती काही शारीरिक वस्तू नाही. वाटलं तेव्हा उपभोग घेतला आणि गरज संपली की कस्पटासमान पेटवून दिलं.  

महिला घराबाहेर तर सुरक्षित नाहीच नाही. ती कोणाच्या वासनेचा शिकार होईल याचा काही नेम नाही.  म्हणून आपण तिच्यावर नानातऱ्हेची बंधनं लादतो. तिने काय नेसावं, नेसू नये, कुठे जावं, जाऊ नये ही सगळी संहिता रूढ आहे.

पण मग घरात तरी स्त्री कुठे सुरक्षित आहे?  घराबाहेर अशी घटना झाली की आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतो. पण जेव्हा कुंपणच शेत खात असेल, तेव्हा दोष कुणाला देणार?  

‘पुरुष’ हा वासनेने एवढा पिसाटला आहे की, त्याला आता नात्यागोत्यांचा विसर पडला आहे. म्हणूनच तर मुलींवर घरातील भाऊ, मामा, काका, आजोबा आणि इतर नातेवाईकांनीही  अतिप्रसंग केल्याची उदाहरणे आहेत. इतकंच नव्हे तर जन्मदात्या बापानेच मुलींवर बलात्कार करून मानवतेला काळिमा फासल्याचेही आपण ऐकले आहे.

वासनेने पेटून उठलेल्या मानवरूपी सैतानाला फक्त आपली वासना शमवायची आहे. यासाठी हवी आहे फक्त नि फक्त स्त्रीची योनी. मग ती आपल्या मुलीची का असेना. यासाठी तो वाट्टेल ते करू शकतो आणि क्रूरतेचा  कुठलाही थर गाठायला तयार आहे.  

समाजातील हे भीषण आणि भयावह वास्तव आपण नाकारू शकत नाही. मानवी क्रुरतेचं हे विदारक चित्र पाहून पुरूष म्हणून आमच्याच माना आज झुकल्या आहेत.

स्त्री म्हणजे फक्त नि फक्त उपभोगाची वस्तू, अशा कस्पटासमान विचाराला तिलांजली द्यायला हवी. तिचा आदर – सन्मान करण्याचं प्रबोधन जर आपण केलं नाही तर ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भीषण होत जाईल. अब्रूची लक्तरं वेशीवर टाकून आपल्या विकृत विचारांनी हे सैतान समाजावर कलंक लावत राहतील.  

नाव आणि शहरं मात्र बदलतील. कारण असे नराधम माणसाच्या वेषात दबा  धरून बसतील आणि उद्या आपल्याच माता, भगिनींची शिकार करतील याचा काही नेम नाही.

एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांमुलींमध्ये निर्माण होणाऱ्या शारीरिक, भावनिक बदलांना कसं हाताळायचं, याचं प्राथमिक लैंगिक शिक्षण घरातूनच मिळावं. 

उद्या आपलाच मुलगा वाममार्गाला जाणार नाही ना, याची खबरदारी आपणच घ्यायला हवी. या जडणघडणीमध्ये शिक्षणसंस्थाचीही  प्रमुख  भूमिका असायला हवी.  

आगामी काळात  भेडसावणाऱ्या आव्हानांची कल्पना येण्यासाठी लैगिंक बाबींविषयी जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं आत्मभान यावं त्यासाठीचा हा लेखनप्रपंच.

(टीप: गुन्हेगाराला फाशीच व्हावी. त्याच्याबद्दल कुठलीही सहानुभूती नाही. फाशी देऊन गुन्हेगाराचा वध होईल परंतू त्याची मानसिकता हद्दपार होणार नाही, म्हणून अशा गुन्हेगारांच्या मानसिक पार्श्वभूमीचा घेतलेला हा आढावा.)

हार्दिक डबले

हार्दिक डबले हे समाजशास्त्राचे पदवीधर असून सध्या कायद्याचा अभ्यास करत आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *