रॅचेल कार्सननी दिला होता पर्यावरणासाठी धोक्याचा इशारा

अमेरिकन संशोधक आणि लेखिका रॅचेल कार्सन. Source: Smithsonian Mag

“माणसाचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सतत तपासून बघितला पाहिजे, कारण बुद्धी आणि औद्योगिक प्रगतीमुळे माणसाला निसर्गात ढवळाढवळ करण्याची, त्याचा नाश करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. परंतु माणूस देखील निसर्गाचाच एक भाग आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. 

माणसाची निसर्गावर जय मिळवण्याची लढाई खरंतर स्वतःविरुद्धची लढाई आहे आणि निसर्गाबरोबरच्या आपल्या नात्याचा विसर पडला तर अंत ठरलेला आहे”, असा धोक्याचा इशारा रॅचेल कार्सन ह्या अमेरिकन संशोधक आणि लेखिकेनं मानवजातील १९६४ सालीच दिला होता.  

तिच्या सायलेंट स्प्रिंग ह्या १९६२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाने जगभरात खळबळ माजवली होती. औद्योगिक क्रांतीमुळे माणसाचं भलं होतंय आणि ह्या प्रगतीमुळे तसेच तंत्रज्ञानामुळे आता मानवजातीपुढचा कोणताही प्रश्न सोडवता येईल, हा जगभरात फोफावत असणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थांचा विश्वास, सायलेंट स्प्रिंगमुळे डळमळीत होण्यास सुरवात झाली. 

अर्थात, ही बाब असत्य आहे, असं त्यांनी आजही मान्य केलेलं नाही. म्हणून रॅचेल कार्सनच्या पुस्तकामुळे सुरु झालेला पर्यावरणवाद राजकीय मुख्य प्रवाहात येणं कधी नव्हे ते एवढं गरजेचं झालं आहे.

रॅचेल कार्सन स्वतः उत्तम सागरी जीवशास्त्रज्ञ तर होतीच पण सिद्धहस्त लेखिकादेखील होती. तिचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला असतो, याची स्पष्ट जाणीव तिला होती. म्हणूनच DDTच्या अतिवापरामुळे फक्त शेतीला-पिकांना हानिकारक असणारे कीटक किंवा डासच नाही तर इतर निरुपद्रवी किडे आणि कीटकांवर जगणारे पक्षीदेखील मरत आहेत, हे तिच्या लक्षात आलं. 

ह्याबद्दल भरपूर अभ्यास करून, माहिती जमवून आणि स्थानिक शेतकऱ्यांशी बोलून अथक परिश्रमानंतर तिने सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक लिहिलं.  

रॅचेलला निसर्गाची ओढ होती, कुतुहल होतं. आपल्या भोवतालच्या अद्भुत गोष्टी बघणं, त्याबद्दल लिहिणं हे सगळं स्वाभाविक होतं तिच्यासाठी. काव्यमय भाषेतून व्यक्त झालेलं निसर्गप्रेम तिच्या लिखाणातून सतत दिसतं. अटलांटिक मंथली या नियतकालीकासाठी लिहिलेला लेख आणि नंतर त्याविषयीचं सविस्तर पुस्तक Under the Sea Wind (१९४१) मध्येच तिच्या वेगळेपणाची झलक दिसली होती. 

त्यानंतरच The Sea Around Us आणि The Edge of The Sea ह्या पुस्तकांनी तिला निसर्गतज्ज्ञ आणि सिद्धहस्त लेखिका म्हणून मान्यता मिळवून दिली. पुढे १९५२ सालापासून नोकरी सोडून तिनं पूर्ण वेळ लिखाणाचा निर्णय घेतला. निसर्गाबद्दलचं आश्चर्य, त्यातलं सौंदर्य लोकांना समजावं, आपल्या पुढच्या पिढ्यांना याबद्दल विश्वासात घ्यावं म्हणून तिने शेकडो लेख लिहिले. 

माणूस हाही निसर्गाचाच एक भाग आहे, हे ती सतत सांगत राहिली, हाच तिच्या लिखाणाचा विचारांचा गाभा होता.  

DDT या अत्यंत विषारी आणि माणसावर दूरगामी परिणाम करणाऱ्या कीटकनाशकांवर आता बहुतांश देशांमध्ये बंदी आहे. कार्सनच्या पुस्तकामुळे जेव्हा त्यावर पहिल्यांदा बंदी आली, तेव्हा कीटनाशक तयार करणारे कारखाने आणि विक्रेते यांच्या लॉबीने अशी आवई उठवली की, रॅचेल ही नाझींपेक्षा भयंकर नरसंहाराला जबाबदार आहे. 

कारण DDTचा वापर थांबविल्यामुळे आफ्रिकेत डासांचे प्रमाण वाढले आणि लाखो लोक मलेरियाला बळी पडले. अर्थातच हे धादांत असत्य होतं. अमेरिकेने ह्या कीटकनाशकाचा वापर आणि उत्पादन बंद करायचं ठरवलं, त्याचं कारण ते माणसाच्या शरीरात साचून बसतं आणि नंतर कर्करोगासारखे दुर्धर आजार होण्यासही कारणीभूत ठरतं हे नसून, डासांमध्ये या कीटकनाशाकाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण झाली आणि डासांच्या नव्या पिढ्या त्याला दाद देईनाश्या झाल्या होत्या हे होतं.  

वर्ष १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांना मलेरियापासून वाचविण्यासाठी DDTचा शोध लागला आणि १९४५ च्या सुमारास ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलबध व्हायला लागलं. पण ह्या अद्भुत वाटणाऱ्या रसायनाच्या आणि निसर्गचक्रावर खोलवर परिणाम करणाऱ्या वाईट गुणधर्माबद्दल विचार करणारे आणि बोलणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच होते. 

रॅचेल कार्सन त्यातलीच एक. DDT चे परिणाम आणि त्याची व्याप्ती यावर एक लेखमाला लिहिण्यासाठी तिने रीडर्स डायजेस्ट या नियतकालिकात विचारलं, पण त्यांनी अर्थातच नकार दिला, रॅचेल कार्सन पंधरा वर्षे अमेरिकेच्या फिश अँड वाईल्ड लाईफ विभागाची प्रमुख संपादक असूनही!!

रॅचेलने स्वतः बघितलं की DDTच्या वापरामुळे फक्त कीटकच नाही तर त्यांच्यावर जगणारे पक्षी, सफरचंदाची झाडं आणि बालकेसुद्धा कायमची शांत होत आहेत. सायलेंट स्प्रिंगचं नाव आधी ‘निसर्ग विरुद्ध माणूस’ असं ठरलं होत. यामुळे वाचकाचा पूर्वग्रह दूषित होईल, म्हणून त्याऐवजी सायलेंट स्प्रिंग हे नाव देण्यात आलं.  

न्यूयॉर्कर नियतकालिकातून आधी लेखमालेच्या स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या सायलेंट स्प्रिंगने धोक्याचा इशारा दिला होता. मात्र, रसायन उद्योगाने त्याविरुद्ध खुप आरडाओरडा केला. अमेरिकन सायनाईड कंपनीच्या एका अधिकाऱ्याने तर या पुस्तकाविरोधात मोहीमच उघडली. त्याने सांगितलं की, जर ह्या बाईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर मानवजात पुन्हा एकदा भयंकर अंधारयुगात जाईल. 

कीटक रोगराई, पिकांचा नाश करणाऱ्या किड्यांचं पृथ्वीवर साम्राज्य पसरेल. त्याने ‘विनाशाचे- वाळवंटाकडे नेणारे वर्ष’ या नावाने एक पत्रक काढून त्याचा ५००० प्रती वाटल्या. जर रासायनिक कीडनाशकांचा वापर थांबविला तर सगळं जग भूक, उपासमार, दुष्काळ आणि रोगराई यांच्या दरीत ढकललं जाऊन मानवजातीचा नाश होईल, असं ठाम प्रतिपादन त्या पत्रकात करण्यात आलं होतं. 

रॅचेलच्या व्यक्तिगत आयुष्याचीही निंदानालस्ती त्यात केली होती. CBS वाहिनीवर सायलेंट स्प्रिंग पुस्तकावर कार्यक्रम होणार आहे कळाल्यावर अनेक प्रायोजकांनी आपल्या जाहिराती काढून घेतल्या. पण तरीही जवळपास दीड कोटी लोकांनी तो कार्यक्रम बघितला. 

अखेर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्या विज्ञान सल्लागार समितीने याची दाखल घेतली आणि रॅचेलचं प्रतिपादन बरोबर आहे हे मान्य केलं. तेव्हापासून रासायनिक कीटकनाशक हा सार्वजनिक जीवनात महत्वाचा प्रश्न म्हणून पुढे आला. अमेरिकन सरकारला पर्यावरण संरक्षण समितीची स्थापना करावी लागली.    

रसायनाच्या मानवी शरीरावरच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल लिहिणाऱ्या रॅचेललाही कर्करोगाने ग्रासलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. कार्सनने जवळजवळ साठ वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं होतं की, कीटकनाशक शेतातून आपल्या अन्नसाखळीत शिरणार, त्यातून कर्करोगासारख्या समस्या सार्वत्रिक होणार, काही प्रजाती संपूर्ण नष्ट होणार.  

हे सगळं चित्र फार भीतीदायक होतं आणि दुर्दैवाने साठ वर्षांनंतर ते आता प्रत्यक्षात आलं आहे. सायलेंट स्प्रिंग मधला इशारा आज आणखी जोराने आपल्यावर आदळतो आहे. पण आजही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत की शाश्वत विकासाच्या, सावकाश प्रगतीच्या मार्गावर विश्वासाने पावले टाकणार आहोत, हे ठरवायला हवं. अन्यथा रॅचेलचे मानवजातीबद्दलचे भाकीत खरं ठरायला फार वेळ लागणार नाही.

अर्चना गोडबोले

अर्चना गोडबोले ह्या AERF च्या संचालिका आहेत व पर्यावरण विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *