राजकीय क्षेत्रातल्या ‘अराजकीय’ संधी

PC: Nick Youngson Source: Alpha Stock Images

लेखाचा मथळा वाचून गोंधळून गेला असाल ना? स्वाभाविक आहे कारण राजकारण विषय तसा आपल्या नावडीचा असतो, त्यातही त्यातल्या ‘अराजकीयसंधी’ हे वाचून अजूनच भांबावून गेल्यासारखे होते. राजकारण म्हटले की पांढरे कपडे घातलेले लोकप्रतिनिधी असेच आपल्या डोळ्यासमोर येते, जे काहीप्रमाणात खरे देखील आहे. परंतु निवडणुकीला उभे राहणे हे सोडूनही मोठया प्रमाणात कामाच्या संधी उपलब्ध असतात.

२१ व्या शकतात संपूर्ण जगभरात अनेक गोष्टींमध्ये बदल होत गेले, त्यातलाच मोठा एक बदल म्हणजे राजकारणाचे बदलते स्वरूप. राजकारणव्यावसायिकतेकडे झुकत आहे आणि त्याला बदललेला काळ, तंत्रज्ञान, तरुण मतदार, आणि मतदारांच्या बदललेल्या अपेक्षा अशा अनेक गोष्टी कारणीभूतआहेत. 

गेल्या काही दशकात भारतातील सुशिक्षित वर्ग हा राजकारणापासून अलिप्त झाला आहे. परंतु २०११/१२ सालातल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानेसुशिक्षित/ ‘पांढरी कॉलर’ असलेला वर्ग परत समाजकारण आणि राजकारणाकडे वळू लागला. २०१४ ची निवडणूक त्या अर्थाने क्रांतिकारकच म्हणावी लागेलकारण तरुणाईमुळे सामाजिक प्रसार माध्यमांवर राजकीय घोषवाक्य, विनोद आणि व्हिडीओंनी अक्षरशः धुमाकूळ घातला. 

परंतु ह्यातूनच नवीन सेवा व्यवसायाला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. विविध प्रकारच्या सेवा राजकीय नेत्यांना आणि पक्षांना गरजेच्या वाटूलागल्या. प्रस्तुत लेखामध्ये नवीन अराजकीय संधी ह्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Personal Assistant /खाजगी मदतनीस

 राजकीय नेता हा बऱ्याच कामांसाठी त्यांच्या PA वर अवलंबून असतो, जो नेत्यांचे फोन उचलण्यापासून त्यांच्या बरोबर सावलीसारखा वावरत असतो. विविधलोकांना फोन करणे, कामे करून घेणे आणि जनतेच्या अडचणी सोडवणे हे PA चे प्रमुख काम असते. PA होण्यासाठी काही गोष्टींची तयारी करणे आवश्यकअसते जसे की सरकारी खात्यांची माहिती असणे, गोड बोलता येणे आणि संयम बाळगणे.

काही नेते त्यांच्या कार्यालयात एक PA ठेवतात. त्याचे काम लोकांना भेटणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, सरकारी खात्यांबरोबरसमन्वय करणे इत्यादी असते. शारीरिक आणि मानसिक श्रमाची परिक्षा पाहणारे हे काम आहे. अनेक लोकांनी PA म्हणून सुरुवात करून नंतर मोठी मजलमारली आहे. पूर्वी खाजगी मदतनीस हे फक्त पगारी काम होते परंतु हल्ली, PA म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती ह्या कामाच्या स्वरूपात मोबदला ठरवून घेतात. स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

Social Media / सामाजिक प्रसार माध्यमे

गेल्या १० वर्षात सर्व राजकीय पक्ष आणि नेते सामाजिक प्रसार माध्यमांवर ‘ऍक्टिव्ह’ झाले आहेत. खऱ्या अर्थाने या माध्यमांची ताकद २०१४ च्या लोकसभानिवडणुकीत दिसली. ‘अब की बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य लोकप्रिय होण्यामागे फेसबुक, व्हॉट्सऍप ह्यांचा मोठा वाटा आहे. ह्या कामासाठी फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्रॅमची माहिती असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर कुठले फोटो आणि माहिती कधी टाकायची याचे पण ज्ञान असणे अपेक्षित आहे. युवकांसाठीही मोठी संधी आहे, कारण त्यांना सामाजिक प्रसार माध्यमे चांगल्या प्रकारे हाताळता येतात. 

या माध्यमांचे कामकाज बघण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेते स्वतंत्र व्यक्तींची नियुक्ती करत आहेत. २४ तास घडणाऱ्या गोष्टी त्वरित अपलोड करणे हे प्रमुखकाम असते. हे तितकेच जवाबदारीचे आणि जोखमीचे पण असते कारण खरी माहिती, फोटो आणि आकडे अपलोड करायचे असतात आणि त्यासाठी त्याचीअधिकृत माहिती असणे गरजेचे असते. कामाच्या स्वरूपात या सेवा पुरवणाऱ्या कंपन्या त्याचे आकार ठरवतात.

Survey & Analysis / सर्वेक्षण व विश्लेषण

राजकीय व्यावसायिक सल्लागार ही संकलपना भारतात रुजवण्याचे श्रेय प्रशांत किशोर ह्या व्यक्तीला द्यावे लागेल. गेल्या १० वर्षात सर्वेक्षणे करण्याला खूपमहत्त्व आले आहे. राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे आणि उमेदवार स्वत्रंतपणे सर्वेक्षण करत आहेत. भाजप सारख पक्ष तर सर्वेक्षण केल्याशिवाय आणि त्याचाअहवाल घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. ह्यावरून सर्वेक्षणांची गरज आणि त्यांचे महत्त्व लक्षात येईल.

वॉर्डरचने पासून ते लोकसभा मतदार संघापर्यंत, सर्व स्तरांवर सर्वेक्षणाचे काम चालू असते. त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यकआहे. विविध सर्वेक्षण कंपन्यांना आणि व्यक्तिगत पातळीवर सुद्धा या कामासाठी मोठया प्रमाणात मनुष्यबळ लागते. सर्वेक्षण करण्यासाठी प्राथमिक ज्ञान,फिरायची आवड आणि लोकांना बोलतं करण्याची कला अवगत असणे महत्त्वाचे असते. माहिती (data) गोळा झाल्यानंतर कामाचा दुसरा टप्पा चालू होतो. “Research Analyst” (संशोधन विश्लेषक) चे काम चालू होते. ह्या कामासाठी जास्त अनुभव लागतो, कारण असलेल्या माहितीचे विश्लेषण करून अचूकनिरीक्षण नोंदवायचे असते. ह्या निरीक्षणावरून राजकीय पक्ष आणि उमेदवार पुढचे नियोजन करत असतात. ह्या कामामध्ये चांगल्या प्रकारचे मानधन मिळते.  

Media Management / प्रसार माध्यमांचे व्यवस्थापन

विविध नेत्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते आणि त्यासाठी ते हल्ली स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक ही करतात. त्या व्यक्तीचे काम सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकारांशी समन्वय साधणे आणि फोटो आणि माहिती योग्य वेळी पोहोचवणे अशा स्वरूपाचे असते. 

ह्या कामासाठी अनुभवी व्यक्तीची निवड केली जाते. पत्रकारिता आणि पत्रकार याची कामे माहिती असल्यास त्याचा फायदा होतो. तसेच पत्रकार आणि प्रसार माध्यमांशी संपर्क असणे गरजेचे आहे. पंतप्रधानांपासून आमदारांपर्यंत सर्व राजकीय नेते ह्यासाठी आग्रही असतात. बातमी अचूक शब्दामध्ये तयार करून त्यातमहत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करण्याची कला असणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

Public Policy Experts / सरकारी योजनेचे तज्ज्ञ

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेचे काम सतत चालू असते. प्रत्येक लोकप्रतिनिधीला विशिष्ठ निधी मंजूर झालेला असतो, मतदारसंघाच्या गरजेनुसारसरकारी योजनांमध्ये निधीचा वापर करून जनतेला सेवा देणे हे मुख्य काम ह्या तज्ज्ञाचे असते. त्याची योग्य व सखोल माहिती असलेल्यांची राजकीय नेत्यांनानितांत गरज आहे. लोकप्रतिनिधींचा निधी आणि सरकारी योजनांचा मेळ घालणे ही महत्त्वाची जबाबदारी ह्या तज्ज्ञाने पार पडणे अपेक्षित असते कारण निधी हानेहमीच तुटपुंजा असतो. कामाचा अनुभव, सरकारी कामाची माहिती व अधिकाऱ्याबरोबर असणारा संपर्क ह्या प्रामुख्याने लागणाऱ्या गोष्टी आहेत. 

Software and Related Services / सॉफ्टवेअर्स आणि संबंधित सेवा

विविध निवडणुकांसाठी लागणारी माहिती आता विविध सॉफ्टवेअर्स मधून मिळते. सॉफ्टवेअर्स तयार करणे आणि ते सुयोग्य पद्धतीने हाताळण्यासाठी तंत्रकुशलमाणसांची गरज असते. हल्ली निवडणुका सोडून ५ वर्ष उपयोगी पडतील अशा सॉफ्टवेअर्सला देखील खूप मागणी असते. ह्या कामासाठी IT आणि कॉम्प्युटर्समधील तज्ज्ञ काम करत असतात. नेत्यांच्या गरजेनुसार देखील विशिष्ट सॉफ्टवेअर्स तयार करून विविध IT कंपन्या विकत आहेत

Ad Agency / जाहिरात एजन्सी 

सर्जनशील काम करणाऱ्या लोकांसाठी राजकीय क्षेत्रात ह्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. राजकीय पक्ष आणि नेते यांना प्रचार आणि प्रसिद्धीसाठी नवनवीन कल्पना सुचवणाऱ्या जाहिरात एजन्सीजची नितांत निकड भासू लागली आहे. घोषवाक्य तयार करण्यापासून नेत्याने कुठल्या रंगाचे कपडे परिधान करावेत इथपर्यंतचा सल्ला नेते मंडळी घेत आहेत. भाषणामध्ये कुठले मुद्दे कधी घ्यायचे इथपासून देहबोलीचा आणि भाषेचा सुयोग्य वापर कसा करावा इथपर्यंत ह्या कंपन्या काम करत आहेत. भविष्यात ह्याची गरज वाढतच राहणार आहे.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांपर्यंत मर्यादित न राहता सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या निवडणुकांना सुद्धा विविध प्रकारच्या सेवांची गरज पडत आहे. अशी विविध कामे राजकीय पक्ष आणि नेते यांच्याकडे सतत चालू असतात. अशा कामासाठी त्यांना चांगल्या माणसांची सतत गरज भासत आहे. 

आपण ह्याकडे सुद्धा नवीन करिअर म्हणून बघू शकतो. येणाऱ्या काळात निवडणुका ह्या हुशार आणि तज्ज्ञ लोकांच्या भरवशावरच चालतील ह्याबद्दल माझ्यामनात यत्किंचितही शंका नाही. १२ महिने अशा सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांची आणि  प्रशिक्षित व्यक्तींची गरज राहणार आहे स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यातरुणांसाठी ही  सुवर्णसंधी आहे. 

प्रा. महेश साने

प्रा. महेश साने एमआइटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *