यंदाची विधानसभा निवडणूक कोणाची?

विधान भवन, मुंबई. PC: Mrnikkhil. Source: Wikimedia Commons

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या चर्चांना सुरुवात झाली होती. लोकसभेचे निकाल बऱ्याच राजकीय समीक्षकांसाठी अनपेक्षित होते. तसेच या निकालानंतर अनेक राजकीय पक्ष आणि मोठ्या नेत्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहण्यास सुरवात झाली.

लोकसभेचा निकाल जाहीर होऊनतीन महिने होऊन गेलेत. विविध राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. परंतू खरी उत्सुकता आहे ती युती होणार का? कोणत्या पक्षालाकिती जागा मिळणार? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी. संयुक्त पुरोगामी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)बद्दलही अशीच चर्चा सुरु आहे.

भाजप, शिवसेनेची घौडदौड सुरुच 

लोकसभेत मिळालेल्या दैदिप्यमान यशानंतर भारतीय जनता पक्षाचा (भाजप) आत्मविश्वास उंचावला आहे. त्यानुसार पक्षाने संघटनेमध्येदेखील बदल करायला सुरवात केली आहे. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. मंत्रिमंडळाची फेररचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या जनादेश यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत आहेत. साधारण १० वर्षांपुर्वी भाजपला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य समजणारे नेते आणि पक्ष यांना आता भाजपमध्येच भविष्य दिसू लागले आहे. मोदी आणि फडणवीस हेच आता तारणहार आहेत असे अनेक नेत्यांना वाटू लागले आहे. अर्थात, यामागे कारणेदेखील आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे, मुलांच्या भविष्याची सोय आणि स्थानिक राजकारणात झालेला बदल याचा प्रामुख्याने उल्लेख करावे लागेल. 

परंतू मोठ्या प्रमाणावर येणारे आयाराम पक्षाची प्रतिमा खराब करू शकतात आणि जुन्या निष्ठावंतांना दुखावू शकतात. अर्थात, पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला विधानसभेचे तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही.

काही नेते मुख्यमंत्र्यांना भेटून शिवसेनेतदेखील प्रवेश करत आहेत. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीतील युतीनंतर भाजप आणि मोदींवर टीका करणे टाळले आहे. लोकसभेत एक जागा जास्त घेऊन शिवसेनेने दाखवून दिले आहे की तेआता वाटाघाटींमध्ये मागे नाहीत. विधानसभेतही दोन्ही पक्षांची युती होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळीच केली होती.

आदित्य ठाकरेदेखील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरात फिरत आहेत. भविष्यात त्यांना शिवसेनेत मोठी जवाबदारी मिळणार याची चुणूक ते दाखवत आहेत. यासाठी आदित्य ठाकरे कदाचित विधानसभेच्या रिंगणातदेखील उतरु शकतात. यंदा ते मुंबईमधील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावणारे ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य ठरतील. शिवसैनिकांना न दुखावता नवीन लोकांना सामावून घेणे हे सेनेसमोरील आव्हान आहे. मंत्रिमंडळातील नुकत्याच फेररचनेत दोन्ही आयात मंत्र्यांना मोठी खाती देण्यात आली त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दुष्काळ आणि पूर अशा दोन्ही नैसर्गिक परिस्थितींचा फटका सत्ताधारी पक्षांना बसू शकतो.

सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची सुवर्णसंधी भाजप आणि सेनेकडे आहे. कदाचित मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी सेनेला दिल्यास युती अंतिम स्वरूपात येऊ शकेल. यामुळे, उद्या आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको.

काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई  

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी हे दोन पक्ष सध्या सर्वात कठीण परिस्थितीतून जात आहेत. लोकसभेतील दारुण पराभवानंतर दोन्ही पक्ष अद्याप स्वतःला सावरू शकलेले नाहीत. विशेषतः काँग्रेस पक्ष अडीच महिने अध्यक्षांविना होता. आतादेखील सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी घेतली आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी अथक परिश्रम घेऊन देखील पक्षाला संपूर्ण देशामध्ये फक्त ५२ जागा तर उत्तरप्रदेशात केवळ १ जागा राखण्यात यश आले.    

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा त्याग करत गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण दुर्दैवाने अजूनतरी नव्या अध्यक्षाच्या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. राहुल गांधी करत असलेले बदल कार्यकर्त्यांना सुखावणारे असतील पण पक्षातील इतर नेतेमंडळी मात्र या बदलांसाठी तयार नाहीत. घराणेशाहीतुन न येणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्येपक्ष पद आणि उमेदवारी मिळणार का हाच कळीचा मुद्दा आहे. सध्या अनेक नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. तेव्हा नवीन आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.

पवार साहेबांच्या राजकीय आयुष्यातील तर हा आतापर्यंतचा सर्वात कसोटीचा काळ आहे. पवारांचा नातू लोकसभा निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातून पडला. पक्षाचे अवघे ४ खासदार निवडून आले. पक्षस्थापनेच्या काळापासून बरोबर असलेली नेतेमंडळी पक्ष सोडून जात आहेत. 

काँग्रेसबरोबर आघाडी तर करावी लागेलच, पण लोकसभेला वापरलेले राज ठाकरे हे अस्त्र देखील निकामी ठरले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी तर्फे डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी वापरण्याचे डावपेच अंमलात आणले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भगवा ध्वज आता पक्षाच्या झेंड्याबरोबर लावायला सुरवात केली आहे. या मागे भाजप आणि शिवसेनेला मराठा आरक्षणाचा फायदा मिळू नये हा हेतू आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी हीअस्तित्वाची लढाई आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर युती कठीण आहे कारण जागावाटपावरून चर्चा फिस्कटू शकते.

सर्वसमावेशकता कायम राखण्यावर भर 

लोकसभेची ही निवडणुक अनपेक्षितरित्या वंचित बहुजन आघाडीने गाजवली. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसींनी आघाडी आणि युतीवर आक्रमकपणे टीका करून तरुणांचे लक्ष वेधले. इतर वंचित जातीतील उमेदवारांना संधी देऊन आपला पक्ष केवळ दलित आणि मुस्लिमांपुरता मर्यदित राहणार नाही याची काळजी घेतली. विधानसभेतदेखील त्यांच्याकडून हेच तत्व पाळण्यात येईल. युती आणि आघाडीकडून उमेदवारी न मिळणाऱ्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचा पर्याय खुला असेल. 

सरकारवर नाराज असणाऱ्या लोकांची मते आक्रमक भाषणे आणि योग्य जातीय समीकरणांद्वारे स्वतःकडे खेचण्याची रणनीती आंबेडकर आखत असतील. महाराष्ट्रातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे २८८ उमेदवार उभे राहून लोकांसमोर तिसरा पर्याय निर्माण करु शकतील. जागांवरुन चर्चा फिस्कटण्याच्या शक्यतेमुळे आंबेडकर काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे फारसे प्रयत्न करतील असे वाटत नाही.

गर्दीचे मतांमध्ये रुपांतर करण्याचे आव्हान 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी सभांमध्ये ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा नवीन प्रकार आणला. याला लोकांमध्ये व माध्यमांतर्फे प्रचंड प्रतिसाद मिळाला, तरीही लोकांची मते वळविण्यात मात्र त्यांना यश आले नाही. गर्दीचे मतांमध्ये रुपांतर करण्याचे मोठे आव्हान मनसेसमोर आहे. 

सक्तवसुली संचालनालया(इडी)च्या चौकशीनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आले आहेत. यामुळे त्यांना सहानुभूती देखील मिळू शकते. परंतू ते निवडणुकीच्या रिंगणात एकट्यानेच उतरणार की आघाडीमध्ये जाणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. कदाचितराज ठाकरेंविषयी सहानुभूती होऊ द्यायची असेच भाजपचे डावपेच असतील, जेणेकरून सरकारच्या विरोधातील मते आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये विभागली जातील.

सध्याची परिस्थिती पाहता महायुती सलग दुसऱ्यांदा सत्तेत येईल असे नक्कीच म्हणता येईल. महायुती २३० जागा मिळवण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे आघाडीलाही सक्षम २८८ उमेदवार मिळवण्यासाठी झगडावे लागू शकते. पवार साहेबांच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सगळ्यात अवघड निवडणूक असेल. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे भवितव्य ते किती जागा जिंकतील यावर ठरेल. मात्र सध्या देवेंद्र फडणवीस हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी तयार असतील असेच म्हणावे लागेल.

प्रा. महेश साने

प्रा. महेश साने एमआइटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *