कोरोनाशी मुकाबला करण्यात भारताने अद्वितीय कामगिरी केली आहे. सुमारे १३० कोटी लोकसंख्या असून देखील जगातील कोणत्याच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताचं नाव नाही, ही गोष्ट बरंच काही सांगून जाते.

पण कोरोनाच्या विरोधातील ही लढाई कोणत्याही एका माणसाचे यश नाही. हा अवघ्या भारतवासीयांचा बदललेला दृष्टिकोन आहे. स्वतःला बंदिस्त ठेवून, हजारो कोटी रुपयांच्या तोट्याची चिंता न करता प्रत्येक भारतीय कोरोनाशी लढण्यात गुंग झाला आहे. पण या यशाला काही पाश्चिमात्य संशोधन संस्था आणि माध्यम कंपन्या चाचण्यांचे गालबोट लावत आहेत, त्यांच्यासाठी हे प्रत्युत्तर आहे.

अत्यंत उत्कृष्ट आरोग्य सेवा-सुविधा असलेल्या अमेरिकेसारख्या किंवा युरोपातल्या सर्वच देशांच्या तुलनेत आज भारतात रुग्णांचं आणि मृत्यूंचं प्रमाण खूपच कमी आहे. 

माणूस म्हणून कोरोनामुळे झालेली मनुष्याच्या आयुष्याची हानी कधीच भरून काढता येण्यासारखी नाही. हेजरी मान्य केलं तरी भारत देशाचा उदय आरोग्य सेवेतील महासत्ता म्हणून होऊ घातला आहे, ही बाब अमान्य करता येत नाही.

गेल्या काही दिवसांपासून भारतीयांनी केलेल्या त्यागालाकाही लोक चाचण्यांचे गालबोट लावत आहेत. आपल्या देशात चाचण्याच होत नाहीत म्हणून कोरोना बाधितांचे प्रमाण कमी आहे असा युक्तिवाद केला जात आहे!

चला हे मान्यच आहे की आपल्या देशात चाचण्या कमीच होत आहेत. पण ज्या चाचण्या झाल्या आहेत त्यात करोना बाधित प्रकरणं निघण्याचं प्रमाण किती आहे? तपासल्या गेलेल्या लोकांमधील फक्त ३ टक्के लोक करोना बाधित आहेत. तर कित्येक युरोपियन देशात हे प्रमाण ३०-४०% इतकं जास्त आहे.

भारत चाचण्या कमी का करतोय? याच सोपं कारण म्हणजे आजमितीला भारतात चाचण्यांची सामग्रीच उपलब्ध नाही. जगात सगळीकडे या किट्सचा तुटवडा आहे. म्हणून अगदी गरज असेल तिथंच या चाचण्या केल्या जात आहेत.  

आय.सी.एम.आर.च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणातील हे आकडे पहा. फेब्रुवारी १५ ते एप्रिल ३ या काळात भारतातील सगळ्या रुग्णालयांमध्ये सिव्हिअर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात श्वसनाशी संबंधित गंभीर आजारांमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या आणि खूप आजारी असलेल्या ६००० पेशंट्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील फक्त १०४ रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. म्हणजे फक्त पावणे दोन टक्के. हे आकडे अवघ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावणारे आहेत.

यावर आता काही मंडळी जे अमेरिका किंवा इतर प्रगत देशात स्थायिक आहेत ते ऑक्सफर्ड किंवा इतर कोणत्या संशोधन संस्थांच्या हवाल्याने असं सांगायचं प्रयत्न करीत आहेत की भारतातहा आकडा किमान ५० पटीने अधिक आहे.

मग यावर असंही म्हटलं जातंय की, सरकार माहिती लपवत आहे. बरं लपवत ही असेल… गृहीत धरूया की हे खरं आहे.

समजा, करोना बाधित रुग्णांची संख्या सांगितली जातेय त्यापेक्षा खूप जास्त आहे. पण मग त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या? ती पण लपवली जातेय का? ती लपवता येईल का आपल्या देशात? सर्वात पहिलं म्हणजे भारतासारख्या देशात जिथं अंत्यसंस्कार महत्वाचे मानले जातात, तिथं मृत्यूचा दाखला मागितला जातो. याचा अर्थ मृत्यू सरकार दरबारी नोंदवला गेला असला पाहिजे, मृत्यूचं कारण नोंदवलं गेलं असलं पाहिजे.

आता यामधील दुसरा मुद्दा असा आहे की, मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची भारतातील विविध राज्यांमध्ये सत्ता आहे आणि मृत्यूची नोंद हा महापालिका किंवा नगरपालिकेचा विषय आहे. म्हणजे पर्यायाने राज्य सरकारचा.

ममता, अरविंद, उद्धव या सगळ्यांनी केंद्र सरकारसोबत षड्यंत्र रचून मृत्यूचे प्रमाण कमीच दाखवायचे ठरवले आणि यावर सगळ्यांचे एकमत झाले ? राजकारणी ही जमात सगळीकडे आपला फायदा पाहणारी असते. कोणीतरी काहीतरी लपवतंय म्हटल्यावर राजकीय पटलावर केवढी उलथापालथ झाली असती? 

राजकारण्यांबद्दल मनात कितीही पुर्वग्रह असोत, पण आज एक नागरिक म्हणून या सगळ्या राजकारण्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदललाय. आहे ना आमची व्यवस्था भ्रष्ट, मान्यच आहे. पण आज सगळे पोलीस न थकता रस्त्यावर उभे आहेत. 

संपूर्ण पोलीस व्यवस्था भारतभर चांगली कामगिरी करत आहे. PC: sciencemag.org

गरीबांना खायला घालत, लॉकडाउन तोडणाऱ्यांना रोखत उभे आहेत. सरकारी कर्मचारी जीव तोडून काम करताहेत. हे सत्य फक्त भारतात राहणाऱ्यालाच दिसू शकतं. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कारटं ही प्रवृत्ती असलेल्या पाश्चिमात्य देशांना भारताच्या प्रत्येक चांगल्या कृतीत खोट दिसणारच. त्यामुळे बी.बी.सी काय किंवा आता ऑक्सफर्डसारख्या संशोधन संस्था काय अवघ्या जगाला हे दाखवण्याच्या मागे आहेत की, आमचे कोरोनाचे मृत्यूसुद्धा तुमच्या उपायांपेक्षा श्रेष्ठच आहेत.       

असो! अजून एक महत्वाची बाब म्हणजे भारतासारख्या देशात सरकारी संस्थांकडून माहिती मागवायला माहितीचा अधिकार अस्तित्वात आहे. आजही माध्यमांचा दबदबा आहे. एवढे विरोधी पक्ष, एवढ्या स्वयंसेवी संघटना, एवढे मोबाईल फोन आणि हवं ते चित्रित करून हवं तिथं पोस्ट करायची मुभा असताना खरंच मृत्यू लपवता येतील का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीच अभारतीय देऊ शकणार नाही. आकडेवारी अचूकच आहे असं मी म्हणत नाही. पण जसे कोरोनामुळे झालेले मृत्यू नोंदवले गेले नसतील तसेच कदाचित कोरोनामुळे न झालेले मृत्यूपण कोरोना बाधितांचे म्हणून नोंदवले गेले असतील अशी देखील शक्यता आहे.

कोणताही डॉक्टर न्युमोनियामुळे मरायला लागलेला रुग्ण सध्याच्या परिस्थितीत सरकारी रुग्णालयातच पाठवेल. तिथं जर बेसुमार लोक मरायला लागले तर ते लपवता येईल का, हा महत्वाचा प्रश्न हे टीकाकार विसरताहेत.

तिथं जाऊन सर्वेक्षण करायची कल्पना आजवर एकाही पत्रकाराच्या डोक्यात आली नसेल का? सरकारविरोधी पत्रकारितेला सगळ्यात जास्त प्रसिद्धी भारतात मिळते. वेगवेगळ्या विषयांवर रोज सरकारांना अडचणीत आणणाऱ्या पत्रकारांसाठी वाढीव मृत्यूचे प्रमाण हे आयतंच कोलीत मिळाले नसतं का? या गोष्टीदेखील या टीकाकारांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. भारतात आजही माध्यमांना स्वातंत्र्य आहे, माध्यमांची दडपशाही करणाऱ्या चीन किंवा सौदीमध्ये आपण राहत नाही!

भारताची याबाबतीत आजची परिस्थिती तरी अचंबित करणारी अशी आहे. त्यातच भारताने इतर देशांना औषधांचा पुरवठा चालू केला आहे. चीनची भारतात होणारी  गुंतवणूक एका रात्रीत बंद केली आहे. 

या सगळ्याने भारत आता आरोग्य सेवेत महासत्ता म्हणून उदयाला येणार की काय, ही चिंता आता अमेरिका आणि इतर युरोपियन देशांना भेडसावत आहे; आणि कोणाच्या तरी हवाल्याने कोणती तरी आकडेवारी प्रसिद्ध करून भारत देशाला कमी लेखण्याचे उद्योग चालू झाले आहेत.

स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या आणि आरोग्य सेवेच्या सर्वोत्तम सुविधा उपलब्ध असताना देखील चीनच्या विषाणू आक्रमणाचा सामना हे देश करू शकले नाहीत. याउलट भारतात फार झगमगाट नाही, चकचकाट नाही, सरकारी रुग्णालय यथातथाच आहेत. साधनं नाहीत तरीही रुग्णसंख्या दोन महिन्यात मर्यादितच आहे, हेच या पाश्चिमात्यांचे दुःख आहे. 

पण त्यांच्या हे ध्यानीमनी देखील नाही की भारतीय नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण झाली आहे. त्यातूनच ही त्याग बुद्धी निर्माण झाली आहे; मग ती टाटा-प्रेमजींची असेल किंवा सर्वसामान्य १३० कोटी जनतेची असेल.

याउलट पाश्चिमात्य देशातील नागरिकांचा ठसकाच वेगळा असतो. यामुळेच त्यांनी कोरोनाला खूप सहजपणे हाताळलं. कोणता तरी एक शीत-ज्वर आहे, असं अमेरिकेला त्यांच्या गुप्तचर संस्था भासवत राहिल्या आणि चीन समोर या देशांना सपशेल शरणागती पत्करावी लागली. 

आता तर अमेरिकेचे काही विचारवंत असेही म्हणत आहेत की, केवळ १५ डिसेंबरला व्यापार बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी चीनने त्यांच्या देशातील परिस्थिती देशाबाहेर जाऊ दिली नाही आणि जगातल्या सर्वोच्च गुप्तचर संस्थांना गुंगारा दिला. या देशातल्या अनेक कंपन्यांचे समभाग चीनने अगदी कवडीमोल भावाने विकत घेतले आणि चीनच्या घोंघावणाऱ्या वादळाची खरी जाणीव यांना झाली. हेच खरे यांचे शल्य आहे. 

अमेरिका आणि युरोपियन देश बिथरल्यासारखे वागत आहेत. चीनला विषाणूच्या संक्रमणाची बिलं पाठवत आहेत. याउलट भारत एखाद्या परिपक्व देशाप्रमाणे चीनचे आर्थिक, जैवशास्त्रीय आणि तंत्रज्ञानाचे हल्ले शांतपणे परतवून लावत आहे. 

बदल ही भविष्याची नांदी आहे, हे या पाश्चिमात्य देशांना अजून मान्यच होत नाही आहे. त्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर काढत बसण्याखेरीज आत्ता त्यांच्याकडे पर्यायच नाही आहे. म्हणून ही सगळी आकड्यांची आदळआपट…

सीए मयूर जोशी

सीए मयूर जोशी हे फॉरेन्सिक अकाउंटिंग लेखक आणि उद्योजक असून त्यांना माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग यासारख्या जोखीम व्यवस्थापन क्षेत्रात 18 वर्षाहून अधिक अनुभव आहे. ते रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *