माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने रहा अधिक सुरक्षित

असे म्हणतात की, ब्रिटिश राजवटीत काठीला सोने बांधून काशीला जायची सोय होती!  याचे कारण म्हणजे त्याकाळी कायद्याचा वचक तसा असावा. परंतू सध्या विविध कारणांमुळे कायद्याचे राज्य कमी होत चालले असून वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक इ. सर्वच स्तरांवर असुरक्षितता वाढू लागली आहे, हे आपण पाहतो आणि अनुभवतोच आहोत.

सध्या सर्वत्र वैयक्तिकअसुरक्षिततेचे वातावरण आढळत आहे. अनेक प्रकारचे गुन्हे (चोरी, बलात्कार,शोषण , मारहाणइ ) लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी पारंपारिक उपायांसोबतच नवे माहिती तंत्रज्ञानही सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. त्याची काही उदाहरणे आपण पाहू.

सुरक्षिततेचा विषय निघाला की साधारणतः प्रथम आठवतात सीसीटीव्ही उर्फ क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा– CCTV). हॉटेलपासून बँकांपर्यंत आणि परीक्षा केंद्रांपासून तुमच्या आमच्या घरांपर्यंत बहुधा सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हे उपकरण असावे. हॉलिवूडच्या चित्रपटांत देखील याचा मुबलक वापर केलेला दिसतो.

आकार, किंमत, कार्यक्षमता, कार्यपद्धतीमधील किचकटपणा इत्यादी बाबींवरुन सीसीटीव्हीचे बरेच प्रकार पडतात. काही सीसीटीव्ही कॅमेरा काही कित्येक तासांपर्यंत रेकॉर्डिंग करू शकतात, काही रात्री वा कमी उजेडातदेखील पाहू शकतात (नाइट व्हिजन), काही थेट उपग्रहाशी जोडता येतात, काही सतत चालू असतात, काही फक्त हालचाली टिपतात आणि एरवी निष्क्रिय असतात. 

उच्च तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे मजकूर (विशेषतः वाहनांच्या नंबरप्लेट्स) अचूकतेने टिपू शकतात. आता या तंत्रामध्ये आणखी सुधारणा होत आहे. यापुढे, घरात लावलेले कॅमेरे घरातील व्यक्तींना चेहर्‍याने ओळखून त्यानुसार स्वतःची कार्यपद्धतीत बदल करतील. 

सजग पोलिस आणि नागरिकदेखील कॅमेर्‍यात कैद झालेल्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली पाहून त्यांना पकडण्यासाठी अधिक माहिती अन्य मार्गाने मिळवू शकतात. बीजिंग वलंडनसारख्याशहरांच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांची संख्या ही अजस्त्र म्हणजे तीन लाखांहून अधिक आहे. 

अर्थात, एवढ्या संख्येने जर हे कॅमेरे वापरले गेले तर त्यावर चित्रित झालेली दृश्य पाहण्यासाठी मानवी पोलिसदेखील लाखोंच्या संख्येने लागतील. अशावेळी, येथे माहिती विश्लेषण (बिग डेटा एनालिटिक्स) आणि फेशिअल रिकग्निशन म्हणजेच चेहऱ्यावरुन ओळख पटविण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानाचे आधारे संगणकाला निरुपद्रवी आणि धोकादायक हालचालींच्या दृश्यांमधील फरक ठरविता येतो. 

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे अनेक प्रकार आहेत. परंतू, त्यामध्ये इन्फ्रारेड (IR) कॅमेरात्याच्या खालील वैशिष्ट्यांमुळे, अधिक लोकप्रिय आहेत -.

·         दिवसाउजेडी उच्च दर्जाचे रंगीत चित्रण आणि कमी प्रकाशात आपोआप कृष्णधवल चित्रण करू शकतात.

·        कॅमेऱ्यातीलविशिष्ट चित्रण-यंत्रणेमुळे कमी प्रकाशातील चित्रणही स्पष्ट दिसते

·         बदलत्या हवामानाचा त्यांच्या कामावर परिणाम होत नसल्याने त्यांना अतिरिक्त संरक्षक आवरण पुरवण्याची गरज राहत नाही. 

·         बाह्य तसेच अंतर्गत चित्रणही अत्यंत स्पष्ट असते.

या प्रकारच्या कॅमेऱ्याव्यतिरिक्त छुप्या स्वरूपात वापरण्याचे पेन, चष्मे अथवा अगदी बटणाच्या आकाराचे कॅमेरेही (ज्यांना स्पाय कॅमेरे म्हणतात) अनेकजण वापरतात. व्यवसायासंबंधी बैठकांमध्ये या कॅमेऱ्यांचा वापर झाल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली आहेत. आज जवळजवळ प्रत्येकाच्याच हाती दिसणार्‍या भ्रमणध्वनीचाही वापर अतिशय प्रभावीरित्या करता येतो. यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन (असला तर उत्तम परंतू) असण्याचीही तसे पाहिले तर गरज नाही. 

अगदी साधा वाटणारा बार फोन देखील आणीबाणीच्या प्रसंगी तसेच बनावट कॉल करू शकतो. फोनची बॅटरी पूर्णपणे संपलेली असेल तरीही ठराविक क्रमांकावरइमर्जन्सी कॉलत्यावरून करता येतात शकतात. 

बनावट अर्थात फेक कॉलम्हणजे एकट्याच असणार्‍या वापरकर्त्याला कोणी धमकावत असले, त्रास देत असेल तर तो किंवा ती एकटी नसून कोणाच्यातरी संपर्कात आहे असे भासवणारा बनावट कॉल. हा कॉल खरा नसतो तर फक्त रिंग वाजते व समोरच्या व्यक्तीला वाटते वापरकर्त्याला कॉल आला आहे.

दुर्गम भागात राहणार्‍या किंवा एकट्यानेच ट्रेकिंगला जाणार्‍या व्यक्तींना स्मार्टफोनचा वापर आणीबाणीच्या प्रसंगी उत्कृष्टरित्या करता येतो. अर्थात, अशा ठिकाणी नेटवर्क असण्याची शक्यता कमी असते म्हणा. काही बिकट परिस्थितीत सापडलेली अशी व्यक्ती सद्यस्थितीचा फोटो काढून पाठवू शकते. भ्रमणध्वनीमध्ये समाविष्ट असलेल्या जीपीएस, लोकेशन सेन्सर अशा सुविधांचा वापर करून निदान भ्रमणध्वनीधारकाचे स्थान तरी निश्चित करणे इतरांना सोपे जाते. आजकाल जीपीएस समाविष्ट असलेले स्मार्टवॉच देखील मिळते.

गाडीच्या रिमोट-लॉकिंग सारखेच दिसणारे हे एक सुरक्षा-उपकरण आहे. त्यावरील योग्य ती बटने दाबली असता ते पूर्वनिर्धारित मोबाइल क्रमांकांना संदेश पाठवू शकते,स्वतःचे स्थान जाहीर करू शकते तसेच मोठा आवाजही काढू शकते.

स्मार्ट वॉच सुद्धा संकटसमयी कामी येऊ शकते. PC: Luke Chesser Source: unsplash.com 

सुरक्षितता जपण्यासाठी सहाय्य करणारी अक्षरशः शेकडो मोबाइल ऍप्स उपलब्ध आहेत. अशी ऍप्स उपकरणात घेतली की, फक्त एका बटनावर ती वापरकर्त्याची गरज आणि पसंतीनुसार, विविध कामे करू शकतात. उदाहणार्थ,पुर्वनिश्चित क्रमांकांवर थेट कॉल लावणे,पोलिसांना कॉल लावणे फार काय जोरात किंचाळण्याचा आवाज काढणे (ज्यायोगे तिथे काहीतरी गडबड आहे हे आसपासच्या लोकांना समजावे). काही उपकरणे जोरात हलवली तरी त्यावरील संबंधित ऍप चालू होऊ शकते.

यापेक्षाही भन्नाट म्हणजे पीडित व्यक्ती स्वतःच जोरात किंचाळली वा ओरडली तरी त्याद्वारे देखील ट्रिगर होणारे ऍप मिळते. प्रकृती अचानक बिघडणे, अपघात, भूकंप, चक्रीवादळ अशांसारख्या संकटांतही ही ऍप्स वापरून मदत मिळवणे शक्य असते. अशी ऍप्स महिलांप्रमाणेच लहान मुले, एकटेच राहणारे ज्येष्ठ नागरिक,विरळ लोकवस्तीच्या भागांत राहणार्‍या व्यक्तींना उपयुक्त असतात. आपल्याकडे मिळणार्‍या अशा काही लोकप्रिय ऍप्सची आपण इथे थोडक्यात माहिती घेऊ.

स्क्रीम अलार्म–

हे फ्री ऍप असून अँड्रॉइड यंत्रणेवर चालणार्‍या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये गूगल प्लेस्टोअरद्वारे डाऊनलोड करता येते. त्याचे काम नावातूनच स्पष्ट होते– कोणी छेडछाड करीत असल्यास किंवा वापरकर्त्याला विरळ वस्तीच्या ठिकाणी अपघात इत्यादी घडल्यास झाल्यास,बटन दाबले की, मुलीच्या किंचाळण्याचा मोठ्ठा आवाज याद्वारे प्रक्षेपित केला जातो.

सर्कल ऑफ सिक्स–

हे ऍप अँड्रॉइड तसेच आय ओएस वर चालू शकते. हे देखील फ्री आहे.व www.circleof6app.com या संकेतस्थळावर मिळते. ह्यामध्ये आपण सहा जवळचे मित्र वा नातलग निवडून त्यांचे नंबर्स फीड करून ठेवू शकता. तसेच हॅँडसेटच्या स्क्रीनवर, या सहा व्यक्ती वा संस्थांच्या नावांबरोबरच, तीन चिन्हे देखील दर्शवलेली असतात– मोटार, भ्रमणध्वनी आणि संदेश. आणीबाणीच्या प्रसंगी वापरकर्त्याने कोणाशी संपर्क साधायचा हे ठरवून त्यानुसार स्क्रीनवरील चिन्हे निवडायची असतात. याशिवाय मदतकर्त्याने संकटस्थळी यायचे आहे (कार), कॉल करायचा आहे (फोन) की संदेश पाठवायचा आहे (टेक्स्ट) हे निवडण्याचा पर्यायही वापरकर्त्याला आहे. यासाठी वापरकर्त्याने योग्य ती सेटिंग्ज आधीच करून ठेवणे अर्थातच आवश्यक आहे. या ऍपने व्हाइट हाउस चा पुरस्कार पटकावला असून (दिल्लीतील २०१२ मधील घटनेनंतर सादर केले गेल्याने कदाचित) ते हिंदीमध्येही उपलब्ध आहे. दिल्ली परिसरातील वापरकर्ते तर हे ऍप वापरून जागोरी सारख्या स्वयंसेवी मदतगटाला किंवा वकिलांच्या संघटनेलाही थेट कॉल पोचवू शकतात.

काइटस्ट्रिंग–

याची कार्यपद्धती जरा वेगळी आहे. वापरकर्त्यास फारशा चांगल्या नसलेल्या वस्तीत किंवा अपरात्री कोठे जायचे असल्यास तेथे पोचण्याची साधारण वेळ त्याने या ऍपला सांगून ठेवायची असते. ती वेळ टळून गेल्यानंतर थोड्याच कालावधीत हे ऍप वापरकर्त्याच्या मोबाइलवर संदेश पाठवते. त्याचे उत्तर त्याने पुढील पाच मिनिटांत न दिल्यास, पूर्वनिश्चित क्रमांकांना, त्या फोनचे ठिकाण आणि धोक्याचा संदेश ऍपकडून आपोआप पाठवला जातो. हे फ्री ऍप असून सर्व ओएस वर चालते असा त्याच्या निर्मात्यांचा दावा आहे.www.kitestring.ioवर हे मिळेल.

याखेरीज रक्षा, निर्भया अशी आणखीही अनेक ऍप्स आहेत. काहींमध्ये ऍप चालू स्थितीत असावे लागते तर काही ऍप्स निव्वळ व्हॉल्यूम की तीन सेकंद दाबून धरल्याने किंवा पॉवर बटन दोनदा लागोपाठ दाबल्यानेही पूर्वनिश्चित क्रमांकाला धोक्याचा संदेश पाठवू शकतात.

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *