मानसिक स्वास्थ्य – निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली

Mental health matters. PC: Katrina Source: Unsplash.com

मनाचा निरोगीपणा बरेचदा आनंदी राहण्याशी व प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याशी जोडला जातो. सकारात्मकता (positivity) म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची गुरुकिल्ली. पण सुखी, आनंदी जीवनासाठी फक्त सकारात्मकता पुरेशी नाही. बरेचदा काय होते, मनाचा निरोगीपणा आनंदी राहण्याशी जोडला जातो. पण फक्त आनंदी राहणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य नव्हे, तर मानसिक स्वास्थ्य ही बरीच मोठी संकल्पना आहे. त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात परिचय आपण या लेखातून करुन घेणार आहोत.

१) Self-acceptance:- स्वतःचा स्वीकार –


स्वतःला स्वतःची ओळख असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबरीने आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणे हे देखील तितकेच, किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे. स्वतःची ताकद व मर्यादा (strength and weakness) ओळखणे ही त्याची पहिली पायरी.

वंदना एक प्रचंड हुशार, मेहनती, “करिअरस्टिक” इंजिनिअर. घरी मुलाच्या अभ्यासावरुन प्रश्न सुरु होते. तिची अपेक्षा की मुलाला एका झटक्यात सगळे समजावे पण तो तिच्या इतका बुद्धिवान नव्हता. हे तिला कळत होते, पण त्यामुळेच तिची प्रचंड चिडचिड होत असे. दुस-या बाजूला अभ्यास म्हणजे भयंकर काहीतरी अशी मुलाची समजूत होऊन बसली. त्यामुळे घरात रणकंदन माजे. या सगळ्या प्रकारात मुलाला अभ्यासाची भिती बसली. वंदनाचा पारा चढणे, मुलाला मार बसणे हे नित्याचेच होऊन गेले होते. त्यात मुलगा सहामाही परिक्षेत नापास झाला. मुलाला अभ्यासाची बसलेली भिती, आणि वंदनाला न जमणारी गोष्ट म्हणजे त्याचा अभ्यास घेणे यामुळे अतिशय निराश झालेली वंदना तिच्या कामावर लक्ष केद्रिंत करु शकत नव्हती. स्वतःचे, पर्यायाने मुलाचे, व सगळ्या घराचे मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या वंदनाला दिलेला “चांगली शिकवणी लावली तर काम खूप सोपे होईल, तू त्याचा अभ्यास घेण्याच्या भानगडीत पडू नकोस” हा सल्ला तिने मान्य केला.

आज मुलगा वर्गात पहिल्या पाचांत आहे, आणि आई मुलाचे नातेही आनंदी आहे.

या उदाहरणात वंदनाला स्वतःच्या मर्यादेची योग्य जाणीव झाली. ती तिच्या नोकरीवर लक्ष केंद्रीत करु शकली. याचबरोबर मुलगाही आनंदी झाला. “सुपर वुमन” व्हायच्या नादात अनेक स्त्रिया कित्येक गोष्टी आपल्या अंगावर ओढवून घेतात. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी“अब ये मेरे बसकी बात नही” हे समजून घ्यायला हवे. नोकरी जाण्यामुळे, अथवा निवृत्त झाल्यामुळे अचानक आलेले रिकामपण, एखादा आजार, अपघात, आर्थिक अडचण, ब्रेकअप, घटस्फोट यासारख्या घटनांमध्ये समोर आलेली परिस्थिती हाताळता न येणे या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते.

२) आयुष्यातील उद्दिष्टे:- Goals in life

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपले कोणते ना कोणते तरी उद्दिष्ट असते. शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न, संसार, मुलं, कुटुंब. एक काळ असा येतो की आयुष्य स्थिरावते. पुढे काय? हा प्रश्न “आ” वासून उभा ठाकतो. हे रिकामपण झेलणे प्रत्येकालाच जमते असे नाही, आणि मग सुरु होतो मानसिक अस्वस्थतेचा फेरा.
 

सुमेधा, पंचेचाळीस वर्षांची. करिअर बहराच्या ऐन जोशात असतानाच तिला घरगुती अडचणींमुळे नोकरीत ब्रेक घ्यावा लागला. आयुष्यात अचानक आलेले हे रिकामपण ती पचवू शकली नाही. तिला नैराश्य आले. खरेतर करिअरमध्ये उच्च पदाला पोहचायचे तिचे उद्दिष्ट होते. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी झटणे व त्यात आनंद मिळवणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते. तेच संपल्यामुळे तिला जीवन निरर्थक वाटायला लागले व ती मानसिक स्वास्थ्य हरवून बसली. आयुष्यात समोर आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करणे तिला जमले नाही.

आयुष्य परिपूर्ण बनविण्यासाठी डोळ्यांसमोर ध्येय असणे अत्यंत गरजेचे असते. दिशाहीन, ध्येयहीन आयुष्य कोणालाच नको असते. मग आयुष्य निरर्थक, अर्थहीन वाटायला लागते व त्यातून पुढे नैराश्य येते. 
 

३) नियोजन आणि समन्वय:- Planning and co-ordination 

कोणतीही व्यक्ती विविध पातळ्यांवर जगत असते. वैयक्तिक, सामाजिक कौटुंबिक, कार्यालयीन या सगळ्यात एक प्रकारचे नियोजन /समन्वय असणे महत्त्वाचे आहे. आता नियोजन कशाचे? तर कौटुंबिक नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी सहचारी, वरिष्ठ्, कनिष्ठ वर्ग व त्याचबरोबर अजून एक नियोजन गरजेचे असते ते म्हणजे आर्थिक नियोजन.

नातेसंबंधातील नियोजनाबरोबर आर्थिक नियोजन नसेल तर अचानक झालेला अपघात, आजारपण, औषधोपचाराचा खर्च, घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यादृष्टीने योग्य ते नियोजन करणे मानसिक स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टिने आवश्यक आहे.

समन्वय कशासाठी? ताणतणावविरहित निरोगी आयुष्य जगण्यासाठी सगळ्या पातळ्यांवर समन्वय हवे. जगण्याची लढाई असते जणू ही. मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे स्वतःची स्वतंत्र जीवनशैली सांभाळत या पातळ्यांवर जगावे लागते. तिथे झालेला बिघाड मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतो. त्याचबरोबर आवश्यक असते ते नातेसंबंधातील नियोजन. नात्या-नात्यांमधल्या गरजा, अपेक्षा पूर्ण करणे हे काही वेळेला वरवर वाटते तितके सहज सोपे नसते. त्यातून ताण वाढतो.

नेहा लग्न होऊन सासरी आली. इतके दिवस माहेरी ती सकाळी उठून, फक्त स्वतःचे आवरून, आईने तयार केलेला डबा घेऊन ऑफिसला जात असे. घरची कोणतीच जबाबदारी अंगावर नव्हती. रात्री घरी आली की आई जेवण तयार ठेवत असे. सुटीच्या दिवशी आराम, सिनेमा, शॉपिंग… आता सासरी जबाबदारी आली. सासुची, नव-याची तिच्याकडून अपेक्षा अशी की तिने लवकर उठून स्वयंपाक करावा, सुटीच्या दिवशी जास्तीची कामे करावीत. पण तिला ते जमत नव्हते की आवडत नव्हते. सगळ्या घरात तणावाचे वातावरण, त्यामुळे सगळ्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले. मंडळी, नेहा या पिढीचे प्रतिनिधित्व करते. मुली / स्त्रियांच्याबरोबरीने घराघरातील स्वास्थ्य, पर्यायाने कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मुलांनी / पुरुषांनी घरकामांत स्वतःहून जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

मनाने निरोगी असणे म्हणजे काय? मनाने निरोगी असणारी व्यक्ती कायमच स्वतःच्या वाढीचा विचार करते. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. आपले विचार, मत, अनुभव यातून सतत काहीतरी शिकत असते. नवीन गोष्टींसाठी ती व्यक्ती कायम तयार असते. अशांचे जीवन प्रवाही असते व ते मानसिक स्वास्थ्य अनुभवत असतात.

याउलट आयुष्यातील स्थिरता पचवणे काहींना शक्य होत नाही. परिस्थितीचा स्वीकार करणे किंवा जुळवून घेणे यात कमी पडले की मानसिक स्वास्थ्य हरवते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होणारे बदल स्विकारणे, त्यानुरुप स्वतःला बदलणे हे देखील महत्त्वाचे असते. तरच मानसिक स्वास्थ्यजपता येते. त्यामुळे पुढचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
 

४) स्वतःचा विकास:- अर्थात Self-development

काल पेक्षा मी आज कुठे आहे? स्वतःची स्वतःशी तुलना यातील समाधानाचा निर्देशांक आयुष्य आनंदी बनवतो. जीवन प्रवाही असायला हवे. साचलेपण कोणालाच नको असते. जगण्यात दररोज वाढ अपेक्षित असते; तसे होत नसेल तर निराशा येते व मानसिक स्वास्थ्य बिघडते.

पन्नास वर्षांची मेघना, शारीरिक दुखण्यामुळे नोकरी सोडून घरी बसली. दिवसभर करायचे काय? हा प्रश्न समोर उभा ठाकला. कालांतराने शारीरिक दुखण्यासोबत मानसिक अस्वास्थ्य आले. “आता घरीच आहेस तर मस्त आराम कर. तुझे आपले रोजचे नवीन काहीतरी!” अशी शेरेबाजी मुलांकडून, नव-याकडून होई. त्यामुळे मेघना अधिकच निराश झाली.

निवृत्तीनंतर आयुष्यात जे रिकामपण येणार आहे त्याची मानसिकता आधीपासून तयार करणे गरजेचे असते. यासाठी आयुष्यातल्या कोणत्याही टप्प्यावर एखादा छंद उपयोगी पडतो. याचबरोबर काहीही नवीन शिकण्यास खरेतर वय आड यायला नको. तरच जीवनाला अर्थ राहतो व मानसिक स्वास्थ्य जपले जाते.

५)स्वयंपूर्णता:- Self-contentment

जीवनामध्ये स्वावलंबन अतिशय गरजेचे असते, अर्थात कोणत्याही बाबतीतले. आर्थिक स्वावलंबन हा एक भाग झाला. तो महत्त्वाचा तर आहेच, परंतु त्या बरोबरीने प्रत्येक बाबतीतील स्वयंपूर्णता व्यक्तीचे जीवन स्वस्थ बनवते. कोणावर अवलंबून न राहणे, आपले काम आपण स्वतः करणे मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे.पण काही कारणाने अपघात, आजारपण, किंवा वृध्दत्व यामुळे जेव्हा परावलंबित्व येते, तेव्हा मानसिक अस्वास्थ्य जाणवते.आपण पुढाकार घेऊन जबाबदारीने काम करणे, पूर्णत्वास नेणे यामुळे व्यक्तीचा स्वाभिमान चांगल्या अर्थाने वाढीस लागतो.
 

माझ्याकडे आलेल्या वसुधाचा उशिराने घटस्फोट झाला. चांगली नोकरी होती, पण सगळे आर्थिक व्यवहार नवरा बघत असे. त्याने कुठे, किती, कशी गुतंवणूक केली याची तिला काहीही कल्पना नव्हती. कायद्याने तिचे पैसे तिला मिळाले ही असते, पण या सगळया प्रकरणात तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. सुरुवातीपासून तिने स्वतः लक्ष घालून गुंतवणूक केली असती तर आज ही वेळ आली नसती.

कर्वे आजी-आजोबांनी आत्ता आत्ता स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली. नेट बॅकिंग, सिनेमा, नाटकाची तिकिटे बुक करणे, मोबाईल व इतर बिले भरणे अशी कामे ते आता मुलां-नातवडांशिवाय करु शकतात. कर्वेआजी सुध्दा नेटवरुन नातवंडे, सुना, मुले यांच्या वाढदिवसाला भेटवस्तू मागवतात. वेगवेगळ्या ऍप्सवरुन माहिती करुन घेणे प्रवास करणे या सगळ्यात ते दोघेही तयार झालेत. असा अनुभव नक्कीच जीवन समृध्द करतो.

याउलट, प्रत्येक बाबतीत मुलांवर अवलंबून राहणारे पालक स्वतःचे व त्याचबरोबर इतरांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवतात. मुलांना आमच्यासाठी कसा वेळ नाही, आम्ही आता त्यांच्यावर कसे अंवलबून आहोत हे परस्वाधीन जीणे कायमच मानसिक स्वास्थ्य बिघडवते. स्वयंपूर्ण असणे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी केव्हाही चांगले.

‘मानसिक स्वास्थ्य’

आता आपण मानसिक स्वास्थ्याच्या कोणत्या पायरीवर आहोत हे तपासून बघूयात. एकंदरीत जगण्याची गुणवत्ता फक्त निरोगी शरीरावर नव्हे, तर निरोगी मनावरसुद्धा अवलंबून असते. कोणत्याही शारीरिक व्याधीचा उगम मानसिक अस्वस्थतेतून होतो.“आज जरा बरे वाटत नाही”, असे वाटते तेव्हा ते शरीराचे दुखणे आहे की मनाचे, हे ओळखता यायला हवे.

आत्तापर्यंत आपण मानसिक स्वास्थ्यकसे जपायचे हे पाहिले. स्वचा स्वीकार, आयुष्यातील उद्दिष्ट्ये, नियोजन आणि समन्वय, स्वतःचा विकास, स्वयंपूर्णता, आणि नातेसंबंध या सगळ्याबाबत आपण चर्चा केली. हे सगळे निकष स्वतःला लावून पाहिले तर आपण काही बाबतीत ठीक आहोत तर काही बाबतीत सुधारणा गरजेच्या आहेत याची जाणीव होईल. त्यादृष्टीने सतत प्रयत्न करणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. “मन चंगा तो सबकुछ चंगा” हा अनुभव आपण घेतलेला असतोच, त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपल्या मनाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे.

भाग्यश्री चौथाई

भाग्यश्री चौथाई व्यवसायाने वकिल असून विवाहपूर्व समुपदेशक म्हणून काम करतात, तसेच महिला व मुलांच्या समस्या व प्रश्नांवर विविध वर्तमानपत्र व मासिकांत लिहितात.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *