मराठ्यांचा महत्त्वाचा विजयः खर्ड्याचा रणसंग्राम

खर्डे येथील किल्ला. Source: Wikimedia Commons

मराठयांच्या इतिहासातील शेवटचा महत्वाचा विजय म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत निजामावर मिळवलेला विजय म्हणता येईल. पानिपतचा पराभव जेवढा दुःखदायक, तेवढाच खर्ड्याचा विजय स्फुरण देणारा ठरतो.  

खर्डा हे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील गाव. मराठा आणि निजाम यांच्यात येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धामुळे हे गाव प्रसिध्द आहे. ही लढाई पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात इ.स. १७९५ सालच्या फेब्रुवारी – मार्चमध्ये झाली. लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. आज २२३ वर्षांनंतर या मोहिमेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.  

महाराष्ट्रावर कोणी राज्य करायचे यावरून मराठ्यांचे आणि निजामाचे भांडण खूप काळ चालू होते. शाहू महाराजांनी मुसलमानांना न दुखवायचे धोरण अवलंबलेले होते. नंतर नानासाहेब पेशव्यांनी निजामाला वेळप्रसंगी युध्यप्रसंगाने वा राजकारणाने थोपवून धरलेले होते. पुढे माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत निजामाने फार हालचाली केल्या नाहीत. नारायणरावांच्या खुनानंतर मात्र निजामाला डोके वर काढण्यास संधी मिळाली.  

मराठ्यांना दक्षिणेतील स‌हा सुभ्यांचे चौथाई व स‌रदेशमुखी वसुलीचे अधिकार १७१८ मधे सय्यद बंधूनी दिल्लीच्या बादशहाकडून मिळवून दिलेले होते. परंतू, निजाम आपल्या ताब्यातील प्रदेशाची चौथाई आणि स‌रदेशमुखी मराठ्यांना सुखासुखी देत नव्हता. मराठ्यांनी वेळोवेळी युद्धात निजामाचा पराभव करून हे देणे त्याच्यावर बसविले होते. मात्र निजाम ते देण्याची टाळाटाळ करत होता.  

चौथाईची बाकी जवळजवळ तीन कोटी रुपये झाल्याने मराठ्यांना युद्धाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नव्हता. नाना फडणवीस निजामास आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी हैदराबादचा दिवाण मुशीरुल्मुल्क हा मराठी साम्राज्याच्या नाशाची स्वप्ने रंगवीत होता.  

महादजी शिंद्यांचे बस्तान बादशाहीत बसून, त्यांस व पेशव्यांना वकील-इ-मुल्मक व मालिकी स‌न्मान मिळाल्यापासून हैदराबादच्या निजामअलीस अत्यंत वैषम्य वाटू लागले होते. चौथाईची बाकी आणि बीड परगणा शिंद्यांना द्यायचे निजामाने नाकारल्यामुळे पेशवे आणि शिंद्यांनी निजामावर स्वारी करण्याचे ठरवले. तेव्हा शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांतील संबंध सुधारले होते.  

महादजी शिंदे पुण्यात आल्यावर नानांस बळ आले. त्याचे परिणाम हैदराबादेत दिसायला लागले होते. तिकडे निजामांनी बिदर प्रांतात आपल्या सैन्याची जमवाजमव सुरु करत पुण्यावर चालून येण्याची हूल उठवली. निजामाने इंग्रजांना मदतीसाठी व तंटा मिटवण्यात मध्यस्थी करण्याची गळ घातली. पण इंग्रजानी ती मान्य केली नाही.  

चौथाईची तीन कोटी रक्कम आणि तीस लाख उत्पन्नाचा मुलुख मराठ्यांना देऊन हा तंटा मिटवण्याऐवजी तीच रक्कम वापरून मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे निजामाने ठरवले. दुसरीकडे, व्हराडाच्या उत्पन्नाची वाटणी निजामाने नागपूरकर भोसल्यास देण्याचे बंद केलेले होते.  

महादजी शिंदे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी मरण पावले. त्यानंतर २० जून १७९४ रोजी हरिपंत फडकेंचे निधन झाले. दोघांच्या मृत्यूमुळे मराठ्यांवर चालून जाण्यास हीच संधी योग्य आहे, असे निजामाने ठरविले.  त्याने इंग्रजांच्या मध्यस्थीने नाना फडणवीसांशी बोलणी सुरु ठेवली होती. याशिवाय इंग्रज मदत अथवा मध्यस्थी करुन दोघांमधील तंटा मिटवतील अशी निजामास आशा होती.  

निजाम – मराठे यात वितुष्ट वाढत जाण्यास काही अंशी टिपू पण कारणीभूत होता. निजामाने मद्रास गव्हर्नरमार्फत आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण टिपूकडे पाठवले, पण त्याने ते स्विकारले नाही. याऊलट, तेव्हाच झालेल्या टिपूच्या मुलाच्या लग्नाला निजामाला न बोलावता पेशव्यांना ‘घरचेच कार्य’ आहे सांगत अगत्याचे निमंत्रण केले.

यावेळी निजामी दरबारातील मराठ्यांचे वकील गोविंद कृष्ण काळे व हरिपंत यांच्यातर्फे दोघांमधील मतभेद मिटविण्याचे प्रयत्न झाले, पण ते असफल ठरले. नानाने तेव्हा निजामाकडे केलेल्या आठ कलमी मागणीकडे त्याने कानाडोळा केला.  

मध्यस्थीने काम होत नाही, हे दिसताच नाना व पेशव्यांनी ४ जानेवारी १७९५ मध्ये पुणे सोडले आणि नगरकडे कूच केली. याआधीच म्हणजे नोव्हेंबरमधे निजामाची फौज बिदरच्या पश्चिमेस १०८ किमी. दूर बोलीगाव येथे पोहोचली होती. त्यावेळी निजामाची फौज जवळपास एक लाखाच्या आसपास होती.

निजामाचे धोरण ओळखून नानांनी १७९४ च्या सुरुवातीपासूनच स‌र्व स‌रदारांना पुण्यास बोलाविण्यास सुरुवात केली होती. रघुजी भोसले त्यांच्या १५,००० फौजेसह दाखल झाले. सांगलीकर, पटवर्धन, कुरुंदवाकर, यादवाडकर, मिरजकर, मंगळवेढेकर वगैरे इतर स‌रदार पेशव्यांना वाटेत येऊन मिळाले.  

पुण्याचा बंदोबस्तास माधवराव रामचंद्र कानडे यास नेमून पेशव्यांनी मांडवगण, श्रीगोंदा, मिरजगावमार्गे सीना नदीच्या काठी तळ दिला. मिरजगाव, घोडेगाव, फाराकाबाद, धानोरे, खडकत, रत्नापूर या गावात सरदारांच्या छावण्या पडल्या. पेशव्यांच्या हालचालींची बातमी लागताच निजाम मोहरी घाट उतरून तेलंगीस व मोहोरी गावाच्या परिसरात मुक्कामास आला.  

पुढे ९ मार्च रोजी निजाम खर नदीच्या काठाने लोणी ते वाकी या दोन गावांदरम्यान तळ देऊन राहिला. तेव्हापासून निजाम आणि मराठा सैन्यात छोट्या मोठ्या चकमकी सुरु झाल्या. खाली परांडयाच्या आश्रयाला निजामाचा बेत जायचा होता तर पेशव्यांना निजामाला तिथे पोचण्याआधीच नेस्तनाबूत करायचे होते. पेशवे आपणावर लगेच हल्ला करतील अशी निजामाची समजूत होती, पण होळीचा सण असल्याने पेशव्यांनी लगेच काही हालचाल केली नाही.  

पुणे ते बिदरच्या साधारण मध्यावर जामखेड तालुक्याच्या अगदी पश्चिमेस खर्डा गाव आहे. तेथे सुलतानजी निंबाळकरांची एक जुनी गढी गावाच्या दक्षिणेला एका टेकडीवर आहे. खर्डा हे गाव तटाच्या आत असून त्याला वेशी आहेत.  

निजामाची फौज ११ मार्च १७९५ रोजी लोणीहून दक्षिणेस निघाली. मराठ्यांचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन खर्ड्याजवळील रणटेकडीच्या मागे निजामावर कसा हल्ला करायचा याचा बेत आखत आहेत, याचा निजामाला सुगावा लागला. निजामाच्या आघाडीच्या फौजेने परशुरामभाऊंच्या तुकडीवर अचानक हल्ला केला. या झटापटीत परशुरामभाऊंच्या उजव्या डोळ्याला तलवारीने जखम झाली. यावेळी मराठ्यांचे विठ्ठलराव पटवर्धन, चिंतामणराव खाडिलकर हे ठार झाले. ही बातमी पसरताच शिंद्यांकडील जिवबादादा, बक्षी, गारदी, नागपूरकर भोसले सरदार ताबडतोब मदतीस आले.  

जिवबादादानी निजामाच्या आघाडीवर तोफांचा मारा चालू केला. निजामाच्या फौजेचा धुव्वा उडाला. यात त्याचा सरदार लालखान, वजीरखान पठाण व असगूलखान ठार झाले, रावरंभा निंबाळकर, भारामल, असदअल्लीखान जखमी होऊन मागे हटले. मराठ्यांनी रात्रीची लुट करून हत्ती, घोडे, उंट, सुमारे ८० पेटारे दारुगोळा, बारा तोफा वगैरे जे हाती लागेल ते ताब्यात घेतले.  

थोड्याशा चकमकीने कच खाऊन निजामाच्या फौजेने खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रय घेतला. मराठ्यांनी किल्ल्यास वेढा देऊन निजामाची रसद आणि पाणी तोडले. या लढाईत निजामाचे दोनशे सैनिक कापले गेले तर अंदाजे पंधराशे सैनिक जखमी झाले.  

दुस‌ऱ्या दिवसापासून म्हणजे १२ मार्च ते २७ मार्च पर्यंतचे १५ दिवस तहाच्या वाटाघाटी करण्यात गेले. यादरम्यान निजामाच्या सैन्याची हलाखी दिवसेंदिवस वाढत होती. युद्ध थांबवावे व तह करावा, अशी गोविंदराव काळ्यांतर्फे निजामाने मराठ्यांना विनंती केली.  

शेवटी अन्न आणि पाणी यांवाचून सैन्याचे भयंकर हाल होत आहेत, हे पाहून २७ मार्चला मुशीरुल्मुल्क आपणहून पेशव्यांच्या छावणीत आला. नाना फडणवीस त्यास सामोरे गेले. नंतर पेशवे सुद्धा त्यास भेटले.  

पुढे निजाम-मराठ्यांत झालेल्या तहामध्ये पुढील अटी ठरल्या : १. निजामाने वीस वर्षाचे मिळून तीन करोड रुपये व मसलतीचा खर्च दोन करोड रुपये असे मिळून पाच करोड रुपये मराठ्यांना तीन वर्षात दयावेत. २. तीस लक्षांचा मुलूख आणि दौलताबादचा किल्ला सरकारात द्यावा. ३. भोसल्यांचा घेतलेला मुलुख आणि देणे भोसल्यांना द्यावे. ४. मशीर यास दिवाण पदावरून निजामाने दूर करावे.

या लढाईबद्दल हेस्टींग्ज फ्रेजरने तिऱ्हाईत दृष्टिकोनातून लिहिलेली हकीगत खूप काही सांगून जाते. त्याने या लढाईत भाग घेतलेल्या फौजेचे आकडे लिहून ठेवलेले आहेत. या लढाईत मराठयांच्या फौजेत ८४ हजार घोडेस्वार, ३८ हजार पायदळ तर १९२ तोफा होत्या. तर निजामाच्या फौजेत ४५ हजार घोडेस्वार, ४४ हजार पायदळ तर १०८ तोफा होत्या.  

शिंद्यांकडे पेरॉन, निजामाकडे रेमंड तर होळकरांकडे ड्यूड्रनेक हे युरोपियन सेनापती होते. या लढाईचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीकडच्या सैन्यात असणाऱ्या कवायती पलटणी व तोफखाना. प्रथम तोफांनी लढाई झाली नंतर गनिमी युद्धाने मराठ्यांनी निजामास कोंडून त्याचे अन्न पाणी तोडून हैराण केले. या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मराठी सैन्याची आकडेवारी व सरदारांची खानेसुमारी पाहता मराठी राज्याच्या इतिहासात पानिपत खालोखाल या स्वारीचा क्रमांक लागतो हे निश्चित.  

पानिपतनंतर प्रथमच आणि शेवटचेच मराठे सरदार लढण्यासाठी एकत्र आले होते. मराठी सरदारांच्या या स्वभाववैशिष्ट्यांचे तटस्थपणे निरीक्षण व आपल्या भविष्यातील शत्रूच्या गुणदोषांची नोंद इंग्रज वकील मॅलेट करत होता. नानाने इंग्रजांना आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी मॅलेटला सोबत घेतले होते खरे, पण मॅलेटला पुणे दरबारची मजबुती न दिसता भोंगळ कारभार मात्र नजरेस पडला.

तह करून त्यावर सही शिक्के होण्याआधी खर्ड्याचा किल्ला सोडून निघणे निजामास दुष्काळी परिस्थितीमुळे भाग होते. मात्र, आपण किल्ला सोडून बाहेर पडल्यावर परत मराठे हल्ला करतील या भीतीने प्रथम मराठ्यांनी आपली छावणी हलवावी, नंतर निजामाने आपल्या वाटेने जावे असे ठरले. त्याप्रमाणे पेशवे, नाना फडणीस, मॅलेट वगैरे सीना नदीच्या संगमावर गेले.  

निजाम नलीवडगाव मार्गे वीटचा घाट चढून बिदरकडे निघाला. त्याचा पाठलाग बाबा फडक्यांनी केला. मराठयांच्या छावणीत असणारे निजामाचे वकील मीर अलम, रायराया रेणुराव व रघुत्तमराव हे निजामाकडे परतले. जाताना निजामाने मराठ्यांना कळवले की, मी कोणत्याही वाटेने गेलो तरी ठरलेल्या तहात काही बदल करणार नाही. सर्व तह सही शिक्के करून परत पाठवतो.  

निजाम पारेनांदूर, पारगाव, अडळ बोरगाव, कळंब, सुरडी खडकी या मार्गे बिदरला परत गेला. निजामाने १३ एप्रिल १७९५ रोजी तहाची सर्व कागदपत्रे सही शिक्क्यानीशी तयार करून गोविंदरावांच्या ताब्यात दिली. बरोबर पेशव्यास नजराणा म्हणून वस्त्रे, जडजवाहीर दिले. त्यानंतर १५ एप्रिलला पेशव्यांच्या छावणीत खर्ड्याच्या तहाचे एकमेंकांच्या सही शिक्क्याचे कागद एकमेकांच्या स्वाधीन करून हा तह कायदेशीररित्या पूर्ण करण्यात आला.  

विजयी सैन्य व शाही कैद्यासह सवाई माधवराव ता. १ मे १७९५ रोजी पुण्यास दाखल झाले. बाकी, खर्ड्याच्या युद्धात पुणे दरबारला फक्त ३० लाख रुपये आणि मशीरला काही काळ कैद एवढेच प्राप्त झाले. याउपर खर्ड्याच्या लढाईचा मराठी राज्याला वा पुणे दरबारास कसलाही फायदा झाला नाही. खर्ड्याच्या तहातील एकही कलम नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर आचरणात आले नाही. पेशव्यांना खंडणीपैकी बहुतेक रक्कम मिळाली नाही. पण निजामाने इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारुन स्वत:चे अस्तित्व बरीच वर्षे पुढे कायम ठेवले.

संदर्भ :
मराठी रियासत – खंड ७ : छत्रपती धाकटे शाहू राजे, पेशवा सवाई माधवराव : आवृत्ती दुसरी : लेखक : गो. स. सरदेसाई : प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, ताडदेव, मुंबई. १९९१.

निजाम पेशवे संबंध – १८वे शतक  – त्रं. शं. शेजवलकर 

संदीप परांजपे

संदीप परांजपे इतिहासाचे अभ्यासक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *