आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय चित्रे , धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली! यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवाद माध्यमांचा फार मोठा वाटा आहे. यामध्येही सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी), सर्व संगणकीय वैशिष्ट्ये समाविष्ट असलेला भ्रमणध्वनी आणि इंटरनेटमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांचेही जीवनचित्र पूर्णतः वेगळे झाले.

तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे,  विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे – एकात्मिक माहिती,  संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. इंटरनेट ही चैनीची बाब नसून एक अत्यावश्यक घटक बनत चालली आहे. घराबाहेर पडताना पुर्वी घरातील मंडळी आपल्याला विचारत असत की  रुमाल घेतला का, पाकीट व्यवस्थित आहे ना वगैरे. आता त्या यादीत भ्रमणध्वनी (मोबाईल) , संगणक अशा काही अजून काही गोष्टीचीं भर पडली आहे. 

एकविसाव्या शतकात संगणक व मोबाईल क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे.

माहितीने जागतिक अर्थव्यवस्थेत आता  तेलाची जागा घेतली आहे. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे आज चैन नसून गरज होत चालली आहे. साधारणपणे १९९० नंतर जन्मलेल्यांना संगणक, स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांच्याखेरीज असलेल्या जगाची कल्पनाच करता येत नाही असे म्हटले तरी चालेल.

कारण, ही (आणि यांसारखी) उपकरणे नसलेले आयुष्य त्यांनी पाहिलेले आणि अनुभवलेलेच नाही. त्यामानाने १९५०-६० च्या आसपास जन्मलेल्यांनी (जे आज वयाच्या साठी-सत्तरीमध्ये आहेत) इलेक्ट्रॉनिक्स, त्यांवर आधारित ग्राहकोपयोगी वस्तूंचा प्रसार,  त्यांची बदलती उत्पादनतंत्रे आणि या घटकांचा सामाजिक-आर्थिक बाबींवर होणारा परिणाम अशांसारख्या गोष्टी अनुभवल्या.

अशी ही मागची पिढी नवतंत्रज्ञानापासून मुळीच दूर राहिली नाही. उलट स्मार्टफोनमुळे तिला हे तंत्रज्ञान ‘मुठ्ठीमें’ वाटू लागलं. नव्या शतकाच्या सुरूवातीला डेस्कटॉप संगणकालाही जरा बिचकणारी ही पिढी टॅबलेट आणि स्मार्टफोन लीलया हाताळताना आढळते. अगदी संपूर्ण आयुष्यात आपल्या खेडेगावाची वेसदेखील न ओलांडलेल्या नऊवारीतल्या आज्ज्यासुद्धा व्हॉट्सऍप वापरताना आणि गेम्स खेळताना दिसतात.

सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे  असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या वैशिष्ट्यामुळे स्वतःचाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काहींच्या बाबतीत व्यसनाकडे झुकू लागला आहे . 

संगणक व इतर उपकरणे आपले जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केली आहेत. पण दुर्दैवाने अनेक लोक त्याच्या अधीन झाले आहेत. सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे – हो मानसिक आजार पण असू शकतो!

अनेक तरुण (मुले /मुली) अगदी कपडे बदलले की त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांना काढायची आहे, यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतू, यामध्ये काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे?

सध्या लहान मुले, आबालवृद्ध आणि समस्त युवावर्गाला पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील ठिकाणाची छबी, दृश्य आपापल्या मोबाईलवर टिपण्याचे नवे वेड लागले आहे. फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेकजण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाईद्वारे सेल्फी काढतात. 

गडकिल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दऱ्या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचे वेड केवळ युवकांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. 

भारतात सेल्फी मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक. Source: IIIT, Dellhi

सेल्फी म्हणजे असे काय आहे की ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये?  ती प्राणाच्या पलीकडे आहे का?  दुर्दैवाने आपला देश याप्रकारच्या सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूमधे आघाडीवर आहे.

यामागे कमी वयात हातात येणारा पैसा आणि त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे. या विकृतींना लगाम कोण घालणार, याचा विचार करण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. 

शाळा महाविद्यालयांमध्येही संगणक/ स्मार्टफोनचे दुष्परिणाम या विषयांवर प्रबोधन करणे बंधनकारक व्हावे. नागरिकशास्त्र या विषयात या गोष्टीचा समावेश व्हायची हीच वेळ आहे.

कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाईल तंत्रज्ञानाचे पण असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ , कला , बाह्य क्रिया , योगा , फिरणे , संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाईल न वापरायची सवय पण झाली पाहिजे. 

माझा एक मित्र रविवारी मोबाईल/इंटरनेट अजिबात वापरत नाही. याबाबतीतही स्वतःवर बंधन व शिस्त आवश्यक आहे. जर माफक प्रमाणात, हवे तेव्हाच जर आपण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत.

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *