पुन्हा जीवनदान

चीन हा स्पीरुलीनाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि विक्रेता बनू पाहतोय. परदेशात तसेच भारतात देखील कंपन्या चीनहून स्पीरुलीना निर्यात करत आहेत. भारताचे वातावरण स्पीरुलीना वाढीसाठी पोषक आहे. चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताला ‘सर्वोत्कृष्ट दर्जा आणि कमी किंमत’ ही कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी सायनोफार्मचे शास्त्रज्ञ झटत आहेत.

स्पीरुलीना फार मोठ्या प्रमाणात उगवण्याचा प्रयत्न करणं खर्चिक आहे, म्हणून छोट्या शेतकर्‍यांनी छोटे छोटे ‘प्लांट्स’ टाकून दर्जेदार उत्पादन करावं. हा त्यांच्यासाठी पर्यायी उत्पन्नाचा चांगला मार्ग बनेल. त्यासाठी लागणारा संपूर्ण तांत्रिक पाठिंबा सायनोफार्म द्यायला तयार आहे. यासाठी छोट्या शेतकर्‍यांनी पुढे यावं असंही सायनोफार्मने आवाहन केले आहे. रियलटाईम देखरेखीचे तेथे तंत्रज्ञान विकसित करणे सुरू आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आधार मिळेल आणि दर्जामध्ये गडबड होणार नाही.

आजच्या तारखेला स्पीरुलीनाची एवढी काय गरज आहे? फळं, भाज्या, धान्य, कडधान्य कमी आहेत का? हे काय नवीन फॅड असा सहज प्रश्न मनात येतो. आपण सगळं व्यवस्थित आणि वेळेवर खातो म्हटलं तरी जे खातोय ते अन्न प्रदुषित झालेलं आहे, हवा प्रदुषित झाली आहे, तसंच पाणी सुद्धा प्रदुषित झालंय. त्यामुळे शरीर आणि मन ही प्रसन्न नाहीयेत. अन्न अंगी लागणं खरंच कठीण होऊन बसलं आहे. 

हरितक्रांती मध्ये उत्पादन वाढवणे उद्दीष्ट होतं, वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्न पुरवठा आवश्यक होतं पण त्या तंत्रज्ञानामुळे तेवढ्याच जमीनीच्या तुकड्यातून जी पोषकद्रव्यं पळीभर धान्यात येत असत, ती आता घडीभर धान्यात वाटली गेली आहेत. अर्थात, अन्नधान्याची पोषकतत्व कमी झाली. हायब्रीड, GMO (जेनेटिकली मोडीफाईड) आणि आता चिनी बियाणं इत्यादि प्रकारांमुळे, रासायनिक खतामुळे, रासायनिक तण आणि किटक नाशकांमुळे उत्पादन तर वाढलं, पण कर्जानं बळीराजा हवालदिल झाला आणि पोषणाच्या कमतरतेमुळे जनता कुपोषित झाली. 

जमीन, पाणी, हवा जास्त दुषित झाले. आता या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी जास्त प्रतिकार शक्तीची गरज भासू लागली. शेतकर्‍यांना पुन्हा काही योग्य, काही जुन्या पद्धतींकडे वाळवणं, गावठी बियाण पुरवणं, तो माल शहरी लोकांना घ्यायला प्रोत्साहित करणं हे आता एक अवघड कार्य आहे. बर्‍याच संस्था ते जिकरीने करत ही आहेत. ‘ऑर्गॅनिक’चं वेड शहरी लोकांना लागू लागलंय, पण खरंच ते ऑर्गॅनिक आहे का याची शहानिशा करणं कठीण आहे. ही सगळी क्रांती व्हायला, प्रदूषण दूर करायला १-२ पिढ्या लागतील असं दिसतंय. तोपर्यंत या आपल्या पिढीने स्वत:ला त्या दुःषचक्रातून कसं वाचवायचं? 

दर्जेदार स्पीरुलीना आपण हळदीसारखा रोज सेवन केला तर अन्नातून मिळण्याच्या पोषक तत्त्वांमध्ये जी कमतरता आढळते ती पूर्ण होईल. रासायनिक जीवनसत्वाच्या गोळ्या खाव्या लागणार नाहीत. 

कॉडलीवर ऑईलच्या गोळ्या ज्या गामालिनोलिक ऍसिडसाठी आपण खातो, ते स्पीरुलीना मध्येही आहे. स्पीरुलीनामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे जीवनसत्वांची पूर्तता होते. त्यामुळे बुद्धी तल्लख राहते, रातआंधळेपणा, मोतीबिंदू, काचबिन्दू होत नाहीत. तीन-चार प्रकारचे अँटी-ऑक्सीडेंटस् ह्यात असल्यामुळे वृध्दत्व लवकर येत नाही. हिमोग्लोबीन उत्तम राहतं. ह्याच्या गटफ्लोरा बॅलेन्सींग कार्यामुळे पचन सुधारतं.    

स्पीरुलीनामध्ये ‘इम्युलिना’नामक घटकामुळे प्रतिकार शक्ती योग्य त्या प्रमाणात सांभाळली जाते. प्रतिकार शक्ती वाढवणारे बरेच पदार्थ असतात पण प्रमाण सांभाळणारे दुर्लभच. अति प्रतिकार शक्ती मुळे ऑटोइम्युन डिसीज होतात जसे की अर्थ्राइटीज, सोरायसिस, लिव्हर सिरॉसिस इत्यादि. स्पीरुलीना घेणार्‍या लोकांमध्ये स्टॅमिना प्रचंड वाढतो, जखमा चटकन भरून येतात, पायात गोळे येणं प्रकार थांबतो. जीवनसत्व योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे छोट्या मोठ्या तक्रारी, जसं की केस गळणं, आपोआप दूर होतात. 

प्लास्टिकचा वापर आणि प्रचंड प्रदूषणामुळे भारतात निरनिराळ्या कर्करोगांचं प्रमाण खूप वाढलं आहे. स्पीरुलीना मधील ‘नॅच्युरल किलर’ आणि TNF हे घटक कॅन्सर सेल्स तयार होऊ देत नाहीत. त्यात ‘रेडियोप्रोटेक्टिव्ह’ गुणधर्म असल्यामुळे यूव्ही रेडीएशन पासून सुद्धा ते आपल्याला वाचवतात. किमोथेरपी बरोबर स्पीरुलीना घेतल्यास केस जाणे, बारिक होणे इ. हे सगळं टळतं. स्पीरुलीनाच्या नित्य सेवनामुळे महिलांची मासिकपाळी एकदम सुरळीत होते, PCOD आणि PMS चा त्रास होत नाही. ह्यात प्रोटीन जास्त असल्यामुळे ह्याचे फेशियल ही उत्तम होते.

स्पीरुलीनातील जिवनसत्व इतक्या पटकन शरीरात शोषली जातात की त्याचा भार पचनसंस्थेवर पडतच नाही. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे तिथे अन्न पोटात तरंगतं आणि पचत नाही. याच कारणामुळे अंतराळवीरांना आंतराळात हे अन्न म्हणून दिलं जातं. 

परदेशात खेळाडूंमध्ये हे प्रसिद्ध आहे. आता भारतात बरेच ब्रँड दिसू लागले आहेत, पण बहुतांशी कंपन्या चीन कडून आयात करतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी मान्य केलेल्या ब्रँड कडून घेणं योग्य ठरेल. कधीकाळी जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे भारतात अन्नपदार्थांमध्ये हळदीचा समावेश झाला असावा. त्या काळातील सूज्ञ समाजाने ते नीट पाळलं. आता आपल्या पिढीच्या सूज्ञतेची परीक्षा आहे. काळानुरुप आपण आपल्या खाण्यात याचा अंतर्भाव करून घेत आहोत का?

स्पीरुलीनाची चव आपल्या परिचयाची नाही. त्या चवीला ‘उमामी’ असं म्हणतात. प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा वासही मासे व अंड्यांसारखा येतो. परंतु कुठल्याही पदार्थात मिळवल्यावर वास आणि चव नाहीसे होतात. पदार्थाला हिरवा रंग मात्र येऊ शकतो; तेही प्रमाणावर अवलंबून आहे. ह्याची पावडर दुध, ताक, मिल्कशेक इत्यादि मध्ये घालून घेऊ शकतो. शिजवलेल्या भाज्यांमध्ये शेवटी हळदी इतकं घालू शकतो कारण गरम केल्यास त्यातली जीवनसत्व कमी होऊ लागतात. 

ज्यांना त्याचा वास / चव जमत नाही ते लोक कॅप्सुल्स् पसंत करतात. जास्त हालचाल नसणार्‍या लोकांनी दिवसाला केवळ २ ग्रॅम स्पीरुलीनाचं सेवन केल्यास पुरेसं आहे. खेळाडू आणि व्यायाम करणार्‍यांनी तसंच आजारी व्यक्तींनी दिवसातून ६–८ ग्रॅम पर्यंत घेण्यास हरकत नाही. स्पीरुलीना जेवणाला पर्याय नाही तर पूरक आहे. पृथ्वीला ज्यानं आधी जीवनदान दिलं आहे, त्याकडून आपल्याला पुन्हा जीवनदान मागून घ्यावं लागणार आहे. 

दीपाली दंडे

दीपाली दांडे या मध्यम व लघु उद्योग, व्यवसाय आणि वित्त सल्लागार आहेत. त्या सायनोफार्म येथे संशोधन समन्वयक सुद्धा आहेत.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *