देव आनंद – प्रभातने घडवलेला फिल्मस्टार!

देव आनंद- नूतन यांच्या 'तेरे घर के सामने' या चित्रपटातील एक दृश्य. Source: Upstall.com

खरं नाव धरमदेव पिशोरीलाल आनंद पण घरच्यांसाठी ‘देव’. जन्म २६ सप्टेंबर १९२३; ठिकाण शक्करगढ, गुरुदासपूर, पंजाब. पुढचं शिक्षण लाहोरमध्ये झालं.

त्याचे वडील सुप्रसिद्ध वकील होते. चार भावंडांमध्ये देव तिसरा. मोठा भाऊ वडिलांना वकिलीत मदत करायचा. दुसरा भाऊ चेतन डून स्कुलमध्ये शिक्षक. तो लेखक म्हणूनही प्रसिद्ध होता. देवच्या घरातल्या सगळ्यांचाच गांधीजींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता.

खरंतर देवला नौदलात जायचं होतं. पण तो काळ ब्रिटिश सत्तेचा. एखाद्याला नोकरी देण्यापूर्वी त्याची सगळी चौकशी व्हायची. वडील राजकीय चळवळीत होते हे सत्ताधाऱ्यांना कळाल्यानंतर त्याची नौदलात जाण्याची संधी हुकली.

त्याकाळचे सुपरस्टार अभिनेते अशोककुमार कुठल्यातरी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एकदा त्याच्या लाहोर शासकीय महाविद्यालयात आले होते. त्यांची सही घेण्यासाठी झालेल्या गर्दीत देव सुद्धा होता. त्याला सही मिळाली नाही. मात्र, अशोककुमार यांची खास शैली आणि त्यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय पाहून तो भारावून गेला. त्यादिवशी त्यानं ठरवलं की आपण सुद्धा अशोककुमारसारखं चित्रपटात नायक व्हायचं. 

देव दिसायला देखणा होताच. आरशासमोर तासनतास उभा राहायचा आणि अशोककुमारचे संवाद म्हणायचा. त्याच काळात त्याचं स्वतःवर प्रेम जडलं असावं. पदवी शिक्षण पुर्ण होताच त्याने पहिली फ्रंटीयर मेल पकडून मुंबई गाठली. 

तारीख १९ जुलै १९४३. वयाची अवघी २० वर्षेदेखील पूर्ण न झालेला देव आनंद पहिल्यांदाच मुंबईत आला. याबद्दल वडिलांना सांगितलं देखील नव्हतं. खिशात अवघे ३० रुपये होते. आख्ख्या मुंबईत एकही जण ओळखीचा नाही. कुठं जायचं ठाऊक नाही. 

मोठमोठ्या इमारती, रस्त्यावरून धावणाऱ्या मोठमोठ्या कार आणि ट्राम हे सगळं बघून चक्रावूनच गेला होता. एकेदिवशी कर्मधर्मसंयोगाने त्याला फुटपाथवरुन एक मुलगा जाताना दिसला. तोही लाहोरहून चित्रपटांमध्ये काही संधी मिळते का बघायला मुंबईत आला होता. त्याच्या परळच्या चाळीतल्या खोलीत देवची राहण्याची सोय झाली. 

चर्चगेट भागातील लष्करी सेन्सर कार्यालयात ६५ रुपये पगाराची कारकुनाची नोकरी मिळाल्यामुळे खाण्यापिण्याचा प्रश्न मिटला होता. मोठा भाऊ चेतन याच्या निमित्ताने देव नाटकाशी जोडला गेला. नाटकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका करताना उरलेल्या वेळेत चित्रपटांमध्ये काम शोधत राहायचा. 

त्याकाळी मुंबई चित्रपटसृष्टीत नशीब अजमावायला येणारी सर्व मंडळी रोज संध्याकाळी एका डेअरीसमोर जमायची. गरमागरम कॉफी किंवा दुधासोबत गप्पाटप्पा व्हायच्या. एकमेकांना काही सल्ले दिले जायचे. देवसुद्धा त्या घोळक्यात सामील असायचा. एकेदिवशी कोणीतरी त्याला सांगितलं, ‘प्रभात फिल्म कंपनीला त्यांच्या सिनेमात अगदी तुझ्या वयाचा मुलगा नायक म्हणून हवाय. त्यासाठी चाचण्या सुरु आहेत.’

देवने हवेत उडीच मारली. काहीही झालं तरी ही संधी सोडायची नाही अशी त्यानं मनाशी गाठ मारली. दुसऱ्या दिवशी थेट प्रभातच्या मुंबई कार्यालयात जाऊन धडकला. परंतू तिथला रखवालदार त्याला आत घुसू देत नव्हता. दोघांची थोडीफार बाचाबाची सुरू होती. 

इतक्यात एक गाडी कार्यालयाच्या आवारात आत आली. गाडीतून प्रभातचे वितरण प्रमुख बाबुराव पै बाहेर आले. त्यांनी एक कटाक्ष देववर टाकला आणि त्याला आत बोलावून घेतलं. देव त्यांना पाहताक्षणी आवडला होता. त्यांनी त्याला विचारलं, “आमचा सिनेमा पुण्यातल्या स्टुडिओमध्ये बनतो. तुला तिथे जाऊन काम करायला जमेल?” 

देव एका पायावर तयार होता. पण आधी चाचणी द्यावी लागणार होती. त्याला दुसऱ्या दिवशीच्या पुण्याला जाणाऱ्या डेक्कन क्वीन रेल्वेगाडीचं प्रथम श्रेणीच्या डब्याचं तिकीट देण्यात आलं. आयुष्यात पहिल्यांदा प्रथम श्रेणीमध्ये प्रवास करुन देव ऐटीत पुण्याला आला. 

पुण्यातील प्रभातच्या भव्य स्टुडिओमध्ये त्याची चाचणी झाली. दिग्दर्शक पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषीचे वडील) यांनी आपल्या ‘हम एक है’ या सिनेमासाठी त्याची निवड केली. ते वर्ष होतं १९४५.

चित्रीकरणासाठी देव पुण्यात आला. त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. एकदा धोब्याने कपडे देताना गोंधळ केला. तेव्हा देवची आणखी एका तरुणाबरोबर ओळख आणि पुढे घट्ट मैत्री झाली. त्याचं नाव वसंतकुमार पदुकोण उर्फ गुरुदत्त. गुरुदत्तसुद्धा त्याकाळी पुण्यात प्रभातमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत आपला जम बसवायचा प्रयत्न करत होता. 

पुणे तेव्हा शांत निवांत शहर होतं. निवृत्त ‘पेन्शनरां’च्या या गावात नदीच्या पलीकडे डेक्कन भागात तुरळक वस्ती होती. अगदी जंगल म्हणावं एवढी दाट झाडी. फर्ग्युसन महाविद्यालयामुळे थोडीफार ये-जा सुरू असायची. 

गुरुदत्त आणि देव आनंद ही जोडगोळी चित्रीकरण आणि त्यानंतरच्या वेळात या भागात पायी फिरायची. सकाळी वेताळ टेकडीवर व्यायामाला जायचं, संध्याकाळी डेक्कनच्या इराणी हॉटेलमध्ये कॉफीसाठी अड्डा टाकायचा असा त्यांचा दिनक्रम असायचा. याच ठिकाणी दोघांनी भविष्याची स्वप्न रंगवली होती.

उद्या देव स्टार झाला तर त्याने गुरुदत्तला चित्रपट बनवण्यासाठी मदत करायची किंवा गुरुदत्तला आधी चित्रपट बनविण्याची संधी मिळाली तर त्याने देव आनंदला मुख्य नटाची भूमिका द्यायची, अशा आणाभाका दोघांनी घेतल्या होत्या.

‘हम एक है’ चं चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित व्हायला १९४७ साल उजाडलं. हिंदू मुसलमान ऐक्यावरील चित्रपट आला तोवर देश स्वतंत्र झाला होता. परंतू, दुर्दैवाने देशाची फाळणी झाली होती आणि देवचं गाव पाकिस्तानात गेलं होतं.

मात्र, या सिनेमाने त्याला खूप काही शिकवलं. प्रभातच्या शिस्तीने त्याच्यातील अभिनेता घडवला. अभिनयाचं प्रशिक्षण नसलेल्या लाहोरच्या धरमदेव आनंदला पुण्याच्या प्रभातने ख्यातनाम चित्रपट अभिनेता देव आनंद बनवलं. दैवाचा विचित्र खेळ बघा, प्रभात कंपनी बंद पडल्यावर सरकारने त्याच जागेत चित्रपट शिक्षण संस्था सुरू केली जिथे देशभरातून विद्यार्थी चित्रपटाचं शिक्षण घ्येयला येतात.

पुढे देवला त्याचे आदर्श असणाऱ्या अशोक कुमार यांच्या ‘जिद्दी’ सिनेमानंतर सगळीकडे ओळख मिळाली. काही वर्षातच तो भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार झाला. त्यानंतर त्याने स्वतःची नवकेतन नावाची चित्रपटांची कंपनी सुरू केली आणि आपला दोस्त गुरुदत्तला दिलेले वचन पूर्ण करत ‘बाझी’ चित्रपटात दिग्दर्शनाची संधी दिली. 

चिरतरुण राहिलेले देव आनंद खऱ्या अर्थाने चित्रपट जगले. त्यांच्या रक्तात सिनेमाचं प्रेम वाहत राहिलं. त्यांच्या देखणेपणाची आणि विशेष शैलीची प्रेक्षकांना पडलेली भुरळ शेवटपर्यंत टिकून राहिली. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते चित्रपट बनवत राहिले. 

ते कधीही पुण्यात आले तरी एक गोष्ट नेहमी आवर्जून सांगायचे की, लढत राहण्याची कला त्यांना या शहराने शिकवली आहे. त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी काही वर्षांपुर्वी एका व्यक्तीने डेक्कन भागात सदाबहार देव आनंद नावाची छोटीशी बाग देखील फुलवली आहे. उत्साहाने डोलणाऱ्या फुलासारख्या देव आनंदला यापेक्षा वेगळी श्रद्धांजली काय असेल?

भूषण टारे

भूषण टारे हे 'बोल भिडू' या वेब पोर्टलवर सिनेमा विषयक लेखन करतात.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *