टोकियो २०२० ऑलिम्पिक्स आणि नवतंत्रज्ञान

Tokyo Olympics 2020. Source: VDZE Media

टोकियो २०२० ऑलिम्पिक्स स्पर्धा आता अगदी दाराशीच येऊन ठेपल्या आहेत. त्या संबंधीच्या विविध प्रकारच्या बातम्यादेखील प्रत्येक वृत्तपत्रातून दिसू लागल्या आहेत. आवश्यक त्या इमारतींचे बांधकाम, रस्ते आणि वाहतूक नियंत्रण, तिकिटविक्री, प्रायोजकांची धोरणे आणि मागण्या इत्यादीबाबत दररोज काहीतरी लिहून येत आहे. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेला जपान देश अनेक अभिनव, क्रांतिकारी चमत्कार जगाला यानिमित्ताने दाखवणार आहे. उर्जेच्या पुनर्वापराचे अनेक प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या जीवनाचे काही पैलु व्यापणाऱ्या सेलफोन, संगणक आणि इंटरनेटमुळे २०२० मधील ऑलिम्पिक्स स्पर्धा नवतंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही अनुभवण्याजोगी ठरणार आहे! 

यापुर्वीच्या कोणत्याही क्रीडास्पर्धेत न दिसलेले तंत्रज्ञानाचे अविष्कार तसेच त्यांचे काही व्यावहारिक उपयोग केलेले येथे पाहायला मिळणार आहेत. 

या ऑलिम्पिक्स स्पर्धांशी संबंधित संगणक-तंत्राची काही वैशिष्ट्ये आपण अगदी थोडक्यात पाहू. 

गुगलचे  चालकविरहित वाहन जगभर कुतुहलाचा विषय आहे. अशा हजारो वाहनांचा आपल्याला इथे वापर होताना दिसेल. सध्या त्याची युद्ध पातळीवर चाचणी सुरु आहे. त्याचप्रमाणे, येथे अत्याधुनिक यंत्रमानव अनेक कामे करताना दिसेल. अगदी सामान उचलण्यापासून ते भाषांतर करून दुभाषकाचे काम करणारा हा हरहुन्नरी सवंगडी यंदाच्या स्पर्धांमध्ये हजारोंच्या संख्येने आढळून येईल. 

सध्या ऑलिम्पिक्स स्पर्धांवर सावट आहे अतिरेक्यांच्या हल्ल्याचे! संगणकीय आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींवर ‘सायबर-हॅकर्स’चा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. संकेतस्थळे ‘हॅक’ झाल्यामुळे संपूर्ण नेटवर्कमध्येच केवढा गोंधळ निर्माण होऊ शकतो हे आपणांस माहीतच आहे! परंतू यादरम्यान “असे काहीही होणार नाही”, असे आश्वासन ऑलिम्पिक्स स्पर्धांची तांत्रिक बाजू सांभाळणार्‍या कंपनीने दिले आहे. यासाठी त्या कंपनीने स्वतःच शेकडो हॅकर्सना कामावर ठेवले आहे. 

सर्वसंमतीने हॅकिंग करणार्‍या अशा तंत्रज्ञांना ‘एथिकल हॅकर्स’ म्हणतात. ते खरे चोर नसतात तर हॅकर्सचा हल्ला कशाप्रकारे होऊ शकेल यासंबंधी विविध कल्पना लढवून आणि तशा शक्यता स्वतःच निर्माण करून त्यादृष्टीने यंत्रणा सुरक्षित बनवणे हे त्यांचे काम असते. 

स्पर्धेच्या ठिकाणचे निकाल दाखवणारे गुणफलक, खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना पुरवली जाणारी सामन्यांची वेळापत्रके, ऑलिम्पिक समितीद्वारे इंटरनेटवर प्रसिद्ध केली जाणारी अधिकृत परिपत्रके अशांसारख्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाणार आहे! संशयास्पद संगणकीय हालचाली दर्शवणारा दुवा एक-सहस्त्रांश सेकंदात थोपवत त्याबाबत पोलिसांना कळवण्यासाठी ही यंत्रणा सज्ज आहे. हे काम अतिशय अवाढव्य, विस्तृत क्षेत्रावर पसरलेले असल्याने अतिशय जिकिरीचे आहे यात शंकाच नाही!! 

प्रत्येक विभागाच्या कामाचे कंत्राट बाहेरच्या संस्था किंवा कंपन्यांना देण्यात आले आहे. अशा स्पर्धांच्या काळात इंटरनेटवर खूपच जास्तीचे ओझे पडते. जाताजाता चटकन गुण पाहणार्‍यांची संख्या तर वाढतेच परंतू सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने त्यावरुन ‘लाइव्ह स्ट्रीमिंग व्हीडिओ’ म्हणजे थेट प्रक्षेपण पाहणार्‍यांची संख्या विलक्षण वाढणार आहे! 

अर्थात, हे ध्यानात घेऊन तेथील सरकारने इंटरनेटची क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. प्रथम विशिष्ट मर्यादेपलीकडे ‘डेटा डाउनलोडिंग’वर बंधने लावण्याचा (डेटा कॅपिंग) विचार झाला होता. परंतू व्यावहारिक अडचणी आणि ग्राहकांच्या भावनात्मक प्रतिक्रियांचा विचार करून नंतर तो सोडून देण्यात आला. 

अर्थात कोणत्याही सामन्याच्या शेवटच्या दोन-पाच उत्कंठावर्धक मिनिटांत खेळ पाहणार्‍यांची संख्या अचानक हजारो-लाखोंनी वाढत असल्याने थोडाफार घोटाळा अपेक्षितच आहे म्हणा! परंतू मुळात इंटरनेटची क्षमताच वाढवण्याबाबत तसेच शहरामध्ये तब्बल ४,७५,००० ‘वाय-फाय हॉटस्पॉट’ उभारण्यासाठी ब्रॉडबँड आणि मोबाइल फोन नेटवर्कच्या पुरवठादारांनी सहकार्य केल्यामुळे नेट ‘स्लो’ होण्याची परिस्थिती निदान हाताबाहेर जाणार नाही असे दिसते. 

Facial Recognition Technology to be used for Tokyo Olympics 2020. Source: Kyodo News

जगातील प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात काहीतरी वैशिष्ट्य राखण्याचे प्रयत्न संयोजक करतातच. स्वतःची खाजगी रेडिओ प्रक्षेपण केंद्रे आणि यंत्रणा असणारी ही स्पर्धा असणार आहे! सर्वसाधारण संवादमाध्यम म्हणून हवेच्या लहरींवर चालवलेलीच रेडिओ यंत्रणा वापरली जाईल. परंतू संयोजक समितीचे स्वतंत्र नेटवर्क असेल. 

संगणकीय आणि त्यासंबंधित संवादमाध्यमांबाबत थोडीफार माहिती असणार्‍यांनी ‘क्लाउड कॉम्प्यूटिंग’ हा शब्दप्रयोग ऐकला असेल. इंटरनेटसंबंधीच्या विविध सोयीसुविधा आणि त्यासंबंधीची उपकरणे स्वतः विकत न घेता सर्व माहिती आपल्या मालकीच्या एका आभासी ‘स्टोअररूम’मध्ये ठेवायची आणि हवी तेव्हा वापरायची किंवा इतरांसाठी उपलब्ध करायची, असे या संकल्पनेचे अगदी ढोबळमानाने वर्णन करता येईल. सध्या संगणकविश्वात क्लाउड कॉम्प्यूटिंगची जबरदस्त हवा आहे!

एवढ्या मोठ्या प्रमाणात पाच आठवडे चालणार्‍या या क्रीडामहोत्सवासाठी (आणि त्यानंतर लगेचच होणार्‍या ‘पॅरालिंपिक’ म्हणजे अपंग खेळाडूंच्या स्पर्धांसाठी) दहा लाखांपेक्षा अधिक पर्यटक येणार, त्यांच्या दिमतीला त्याप्रमाणात अधिक वाहने असणार (३० लाख जास्तीच्या फेर्‍या होतील असा अंदाज आहे!) तसेच असलेली वाहतूक व्यवस्था देखील पूर्ण क्षमतेने वापरली जाणार….

या सगळ्याचा ताण पर्यावरणावर येऊन परिसरातले प्रदूषण वाढणार हे नक्कीच! परंतू हे ऑलिम्पिक्स सर्वाधिक ‘ग्रीन’ म्हणजे ‘पर्यावरण संतुलन-संवेदी’ असणार आहे असा क्रीडासमितीचा दावा आहे! टोकियो महानगर परिसरातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी ‘सिटी-स्कॅन’ या नवीन यंत्रप्रणालीचे ‘सेन्सर्स’ उंच इमारतींवर बसवले जात आहेत. असे काही सेन्सर्स एकत्रितपणे संपूर्ण क्षेत्राचे त्रिमिती प्रदूषण चित्र ठराविक वेळाने पुरवतील. यामुळे कोणत्या भागात प्रदूषण वाढत आहे, हे लगेचच समजून त्यावर उपाय करता येतील. 

वायू व सौरउर्जेचा पुरेपूर वापर वाहतूक व्यवस्थेत केला जाणार आहे. यासाठी शहरभर व ऑलिंपिक नगरात (निवासी व क्रीडा ) लाखोंच्या संख्येने सौर उपकरणे (पॅनल्स) उभारणे सुरु आहे . विजेत्या, सहभागी खेळाडू  व पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या भेटवस्तू  व पदकात वापरल्या जाणाऱ्या धातूत जुन्या मोबाइल  उपकरणांचा पुनर्वापर केला जाणार आहे.

एकंदरीत काय तर कोणताही मोठा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे नवतंत्रज्ञानाचा (आणि त्याचा योग्य वापर करून घेणार्‍या तंत्रज्ञांचा तसेच प्रशासकांचाही!) फार मोठा वाटा असतो. तंत्रज्ञान पडद्याआडून काम करीत असल्याने आपणांस जाणवत तर नाहीच पण बरेचदा त्याद्वारे पुरवलेल्या सुविधा गृहीत धरल्या जातात. 

हिमनगाचे टोक पाहून “हॅ, यात काय मोठेसे!” असे मत व्यक्त करण्याआधी त्याचा पाण्यात दडलेला भाग लक्षात घ्यावा म्हणून हा लेख.

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *