गुरूमुखी विद्येच्या जोडीला ‘ऑनलाईन’ ज्ञानभांडार

Photo by Roman Mager on Unsplash

गुरू-शिष्य परंपरेत गुरूमुखी विद्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कालौघात ज्ञानसंपादनाची साधनं वाढली, तशी ज्ञान देवाणघेवाण करण्याची पद्धत बदलताना दिसते. अलीकडे गुरूमुखी विद्येबरोबरच ‘ऑनलाईन’ ज्ञानाचं भांडार खुलं झाल्याचं दिसतं. जागा आणि वेळेनुसार ते सोयीचं ठरतं. एखाद्या गोष्टीबद्दल माहिती मिळवायची असेल तर ऑनलाईन माहितीचा आधार घेता येतो. 

शिक्षणाची सुरुवात एखाद्या गुरूकडे होते. काही काळाने त्या शिकवण्याच्या शैलीची सवय होते. अशावेळी शिक्षण किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात, देशात जावं लागलं की त्या गुरूकडून शिकण्यात खंड पडतो. 

मात्र, गायक पंडीत सुरेश बापट आपल्या दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या शिष्याला स्काइपच्या माध्यमातून गाणं शिकवत आहेत. याबद्दल ते म्हणतात, “आजपर्यंत परदेशातून ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी विचारणा झाली. पण ऑनलाईन शिकवणी घ्यायची तर वेळ जुळणं आणि आवाज स्पष्ट ऐकू येण्यासाठी उत्तम नेटवर्क असणं आवश्यक आहे. काही वर्ष माझ्याकडे शिकणारा माझा विद्यार्थी कामानिमित्त हैद्राबादला शिफ्ट झाल्यामुळे त्याचा एकट्याचीच ऑनलाईन शिकवणी घेतो. गरजेच्या वेळी ऑनलाईन शिकणं चांगलंच. पण शिकवणीत प्रत्यक्ष शिकणं हे जास्त फायदेशीर ठरतं. बारकावे समजण्यासाठी हे जास्त उपयोगी पडतं. तसंच उच्चारातून निघणारी कंपनं मिळतात. त्याचा फायदा शिष्याला होतो.”

डोंबिवलीचे तबलावादक प्रविण करकरे म्हणतात, “इतर गोष्टींच्या तुलनेत ऑनलाईन तबलावादन शिकवणं थोडं कठीण आहे. कारण ज्यांना अगदी बेसिक गोष्टी शिकवायच्या आहेच, त्या हात धरून शिकवायला लागतात. शिवाय स्काइप/ व्हिडिओ कॉलवर शिकवताना नेटवर्कमुळे काही सेकंदांचा फरक पडतो. तालाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे ऑनलाईन तबला शिकायचा असेल, तर बेसिक गोष्टींची माहिती असणं उपयोगी ठरतं”

ते सध्या पुणे आणि अमेरिकेतल्या एकूण पाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवतात. ऑनलाईन शिकवणी झाल्यावर ते विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिडिओ शेअर करायला सांगतात. अशाप्रकारे ते विद्यार्थ्यांचं शंकानिरसन करतात. ऑनलाईन शिकवणीमुळे ठराविक वेळ पूर्णपणे एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित होत असल्याचं ते सांगतात. अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी ते पहाटे किंवा रात्री उशिरा शिकवणी घेतात.

व्यावसायिक कोर्सेसपैकी एक कोर्स म्हणजे सीए अर्थात् चार्टर्ड अकाऊंटंट. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तशी सीए शिकवण्यांची संख्याही वाढली आहे. सिक्कीममध्ये राहणारी आंचल झुनझुनवाला ही सीए आणि सीएसचे ऑनलाईन वर्ग घेते. आंचल जून २०१७ मध्ये सीए झाली. डिसेंबर २०१७ मध्ये तिने काही इतर सीएंच्या मदतीने शिकवणी सुरु केली. तिने ‘एज्युबीड्स इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग’ नावाचा ऑनलाईन वर्ग सुरू केला आहे. मुंबई, पुणे याठिकाणी प्रत्यक्ष शिकवणी घेतली जाते, तर तिचा तास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिक्कीममधून घेते. भारताबाहेरील काही लोकांच्या मदतीने प्रॅक्टिस पेपर काढलेजातात. ते विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातात. आंचल सांगते, “सीए, सीएस करणाऱ्यांना भारतभरातून कुठल्याही तज्ज्ञाशी संपर्क करायचा असेल तर तो या माध्यमातून करता येतो.”

ऑनलाईन वर्गांप्रमाणेच युट्यूबवर व्हिडिओ स्वरूपात बरीच माहिती उपलब्ध आहे. युट्यूबर्स ऑनलाईन गुरू नसले, तरी एखाद्या गोष्टीचं कुतूहल शमवण्यासाठी, माहिती देण्या-घेण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. 

वाद्य वाजवायची इच्छा बहुतेकांना असते. पण वेळेअभावी वर्गाला जाणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. अशावेळी प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी युट्यूब उपयोगी ठरतं. बासरी वाजवायची इच्छा असणारे खूप आहेत. गाणी ऐकली की, आपल्याला वाजवता आलं तर बरं होईल असंही वाटून जातं. 

बासरीच्या मुलभूत माहितीबरोबर गाणी वाजवण्याबद्दलची माहिती देणारा हर्ष दवे याचा युट्यूब चॅनल आहे. सुमारे १०० व्हिडिओ त्याने अपलोड केले आहेत. हर्ष सांगतो, “एका हिंदी चॅनलच्या महाभारत मालिकेसाठी काम करत असताना हर्षने कृष्णा थीम, महाभारत थीम धूनचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. काही दिवसातच ९२ हजारापेक्षा जास्तवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला. तेव्हापासून त्याने आपल्या फॉलोअर्सच्या फर्माईशीनुसार नोटेशनसकट व्हिडिओ अपलोड करायला सुरूवात केली.” वर्ष २०१३ मध्ये सुरू केलेल्या चॅनलचे सध्या २३ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

उत्तम गाता येणं, स्वरांचं ज्ञान असणं या गोष्टीला खूप रियाजाची आवश्यकता असते. गाणी ऐकताना एखादी फ्रेज ओळखीची वाटते, अगदी आधी कधीतरी ऐकल्यासारखी. बॉलीवूड, लोकनृत्यासाठी योग्य असणारी गाणी रागावर आधारित आहेत, हे समजल्यावर आश्चर्य वाटू शकतं. 

अनुजा कामतच्या युट्यूब चॅनलवर अशाच काही रागांवर आधारित गाण्यांची माहिती मिळते. चार वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीतासंदर्भात काहीतरी करावं, या हेतूने अनुजाने हा चॅनल सुरू केला. संगीत विषयात डिप्लोमा करत असताना तिला ही कल्पना सुचली. पुढे संगीतात बीए होऊन एमए करत असताना तिने चॅनल सुरू केला. तिचे ९७ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. ती सांगते, “ऑनलाईन कितीही माहिती मिळाली, तरी गुरूसमोर प्रत्यक्ष बसूनच शिकणं गरजेचं आहे. गुरू- शिष्य परंपरेतून झालेलं शिक्षण चिरकाल टिकतं.”

Deepshree Apte

Deepshree Apte is a HR by profession. She earlier did freelancing for Zee Marathi Disha and worked with Maharashtra Times as College Club Reporter.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *