अर्थशास्त्रामध्ये ‘दुहेरी अर्थव्यवस्था’ ही संकल्पना वापरली जाते. या संकल्पनेत एक अत्यंत मागासलेली प्राथमिक स्वरुपाची तर दुसरी तेवढीच आधुनिक आणि प्रगत स्वरुपाची अर्थव्यवस्था यांचं साहचर्य अभिप्रेत असतं.

आजदेखील माझ्या मते कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही बाबतीत असं दुहेरी चित्र बघायला मिळत आहे. माझ्या पुरतं हे चित्र मी सध्या स्त्री जीवनात आलेलं दुहेरीपण आणि मजुरांच्या स्थलांतरामुळे अर्थव्यवस्थेत आलेलं दुहेरीपण यापुरतचं मर्यादित ठेवलं आहे.

आजची स्त्री आणि दुहेरीपण

आज बहुतेक स्त्रिया घरी आहेत. परंतु घरकाम करणारी बाईही घरीच असल्याने या सर्व स्त्रियांचा वेळ नाश्ता, दोन्हीवेळचा स्वयंपाक, केर – लादी आणि इतर साफसफाई यातच जातो. यामुळे स्त्रीची ६० -७० वर्षांपूर्वींची रांधा, वाढा,  उष्टी काढा यातच अडकलेली प्रतिमा पुन्हा एकदा नव्याने समोर आली आहे. 

फक्त फरक एवढाच आहे की, तेव्हाच्या स्त्रीचं जग हे घराच्या चार भिंतींपुरतचं सीमित असल्याने ती त्यातच समाधानी होती. पण आजच्या स्त्रीचं घरात अडकून पडणं हे तिच्यावर लादलं गेलं आहे. आज तिनं घराच्या उंबरठ्या बाहेर नुसतं पाऊलच ठेवलं नाही, तर उंच भरारीही घेतली आहे. 

एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पूर्वीच्या बायकांचा घरातल्या रामरगाड्यातच वेळ जायचा. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे स्त्रीला घराबाहेर जाऊन कुठले व्यवहार करण्याची, सामाजिक प्रसंगांमध्ये धीटपणे सामील व्हायची फारशी मुभा नव्हती. यामुळेच बहुधा आपल्या काही सणांचं स्वरूप सामाजिक झालं असावं. 

सणांच्या निमित्ताने का होईना बायकांना बाहेर जाऊन इतरांमध्ये मिसळण्याची संधी मिळायची. संक्रांतीचं वाण, होलिका पूजन, वटसावित्री सण, मंगळागौर या सणांच्या निमित्ताने स्त्रियांना ठेवणीतल्या साड्या, दागदागिने घालायची संधी मिळायची. 

ही संधी नुसतीच नटण्या-मुरडण्याची नसायची तर मनाच्या तळाशी जपलेली गुपितं, खुपणारी शल्य सख्यांसमोर उघड करायचीही असायची. मंगळागौरीच्या सणाच्या निमित्ताने तर त्या मनसोक्त बागडायच्या, हसायच्या. आपल्यातलं नैपुण्य दाखवायच्या. अशा सामाजिक भेटीगाठींना घरच्यांचा विरोध नसायचा.

आज मात्र घराबाहेर पडून स्वतःच्या कार्यक्षेत्रात भरारी मारण्याच्या निमित्तानं स्त्रियांचं सामाजिक जीवन इतकं समृद्ध झालं आहे की, त्यांना आता अशा सणांच्या निमित्ताने मौजमजा करण्याची गरज भासत नाही. 

सुशिक्षित आणि विज्ञानाधिष्ठित विचारसरणी असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना तर आपल्या जुन्या परंपरा आणि चालीरीतीं मधला फोलपणा जाणवल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी फारकत घेतलेली दिसते. तर काहीजणी पूर्वजांनी सुरु केलेल्या परंपरा सोडून कशा द्यायच्या या पापभिरु  विचारातून घर, करिअर सांभाळून सोयीस्करपणे  काही चालीरीती नव्या आणि सोप्या पद्धतीने पाळत रहातात.

त्यामुळे सध्या लॉकडाउन आहे म्हणून परंपरागत पद्धतीने एखादा सण साजरा करता आला नाही, तरी आजच्या स्त्रीची कुरकुर नसते. तसेच लॉकडाउनमुळे  घराबाहेर जाता येत नाही याबद्दलही तक्रार नसते. कारण कायम बाहेरच्या विश्वात रमणाऱ्या स्त्रीला उलट घराला आणि घरातल्यांना वेळ देता येण्याची संधी मिळाली म्हणून समाधानच वाटत आहे.

आज  बाहेर पडण्याच्या धोक्यामुळे घरात अडकलेली स्त्री ही बरीचशी पूर्वीच्या स्त्रीचं आयुष्य, जे कष्टाधारित आहे ते जगते आहे. पण तिचे आजचे कष्ट पूर्वीच्या स्त्रियांच्या कष्टापेक्षा थोडे वेगळे आणि जास्त प्रमाणात आहेत. 

नीटनेटकेपणा, कामाची शिस्तबद्ध आखणी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीने ज्ञानाच्या रुंदावलेल्या कक्षा यामुळे सध्या स्त्रियांच्या कष्टात भर पडली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी तिला दैनंदिन कामाबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तू,भाज्या यांचं जास्तीतजास्त  निर्जंतुकीकरण कसं करता येईल, कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढवायला काय करता येईल या गोष्टींचा सतत विचार करावा लागतो. 

त्यामुळे एकीकडे भांड्यांचा साठलेला ढीग घासून हातावेगळा करतानाच तिला मोबाईल, संगणक खुणावत असतात. गुगलवरुन अद्ययावत ज्ञान मिळवून आजच्या कठीण प्रसंगात शारीरिक, मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं,आपल्या कुटुंबाची काळजी घेतानाच मिळवलेली माहिती आप्त-स्वकीयां पर्यंत कशी पोहचवता येईल याबद्दलही आता स्त्री जास्त सजग झाली आहे. 

घरातील केर – लादी, धुणी – भांडी करतानाच एकीकडे तिच्या डोक्यात वेगवेगळी देणी ऑनलाईन कशी देता येतील याचा विचार सुरु असतो. त्यामुळे केरसुणी ठेवली की, ती मोबाईल घेऊन गुगल पे, पेटीएम किंवा तत्सम ऍप्सचा वापर करून लीलया आर्थिक व्यवहार पार पाडत असते.

एकीकडे चूल आणि मूल या जबाबदाऱ्यांमध्ये नाईलाजाने अडकलेली स्त्री दुसरीकडे वेळात वेळ काढून अत्यंत आधुनिक पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहे, ऑनलाईन चर्चासत्रांना (वेबिनार) हजेरी लावून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहे. आपल्याकडच्या विशेष ज्ञानाचा इतरांना फायदा करुन देत आहे.

स्थलांतरित मजूर,उद्योगधंदे आणि दुहेरीपण

आज मुंबई, पूणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमधून लाखो मजूर आपल्या मूळ गावी जायला निघाले आहेत. या शहरांमध्ये पसरत चाललेल्या कोरोना संसर्गाची भयावह स्थिती, त्यामुळे बंद पडलेले उद्योग आणि लहानमोठे व्यवसायामुळे हातावर पोट असणारे मजूर आपल्या गावी जाणेच पसंत करत आहेत.

आता तरी त्यांना आपल्या मूळ गावी जाऊन आपण शेती व्यवसाय करु असं वाटतंय. पण याचवेळी आज देशातील शेतीची स्थिती पाहिली, तर शेतमालाला उठाव नाही, वाहतुकीची साधने नाहीत आणि शेतमालाला अपेक्षित भाव नाही. म्हणून आहे त्याच ठिकाणी नाशवंत शेतमालाची नासाडी होत आहे किंवा मुद्दाम हा शेतमाल नष्ट करावा लागत आहे. 

शेतीवर अवलंबून असलेले शेतकरीच सध्या एवढ्या हालअपेष्टांना तोंड देत आहेत की, जर हे आपल्या गावी परतलेले मजूर त्यांना सामील झाले तर शेतीवर नको एवढा भार पडेल. मजूरांना सामावून घेण्याची शेतीची क्षमता संपलेली असतानाही जर मजूर शेतीकडे वळत राहिले, तर त्यांना प्रचंड बेकारीचा सामना करावा लागेल.

म्हणजे जरी ते शेतात काम करताना दिसले तरी शेतीलात्यांची खऱ्या अर्थाने गरज नसेल.ते शेती उत्पादनात भर टाकू शकणार नाहीत. उत्पादकता शून्य किंवा ऋण झालेले हे शेतकरी किंवा शेतमजूर उघडपणे बेकार दिसणार नाहीत. पण ही छुप्या स्वरूपाची बेकारीच असेल. शेतीवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे शेतीची आणि मजूरांचीही उत्पादकताधोक्यात येईल.

मोठ्या शहरांकडून मजूरांचा लोंढा आपापल्या राज्यातल्या गावांमध्ये किंवा खेड्यांमध्ये जाऊन शेतीकडे वळला, तर ब्रिटीश काळातल्यासारखी भारतामध्ये पुन्हा एकदा निर्औद्योगिकरण(Deindustrialization) प्रक्रिया सुरु होईल. 

आज मुंबई, पूणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमधून लाखो मजूर आपल्या मूळ गावी जायला निघाले आहेत. PC: Indian Express

उद्योगांमध्ये गुंतलेली कर्ती लोकसंख्या शेतीकडे वळाल्याने पुन्हा एकदा प्राथमिक स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचे प्राबल्य लहान लहान गावांमध्ये वाढेल तर त्याच वेळी शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योग अबाधित राहतील. या उद्योगांमधले बहुसंख्य तंत्रज्ञ, अभियंते घरी बसून काम करु शकत असल्यामुळे या उद्योगांना कोरोनाच्या संकटाची तितकीशी झळ पोहोचणार नाही. 

तंत्रज्ञ काम करत असल्यामुळे त्यांचं उत्पन्न, राहणीमानाचा दर्जा अबाधित राहील. पण कारखान्यांमधलं प्रत्यक्ष उत्पादन बंद झाल्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही,  रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना, फेरीवाले आणि लहानसहान उद्योग करणाऱ्या असंघटितांना उत्पन्नाचं साधन नाही. म्हणून या सर्वांना उपासमारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील संपन्नावस्थेतील उच्चशिक्षित आणि उपासमारीने गावाकडे स्थलांतर करणारे विपन्नावस्थेतील मजूर, असं आज दुहेरी चित्र अर्थव्यवस्थेत दिसण्यास सुरुवात झाली आहे.

आज पुन्हा एकदा शहरातील आधुनिक, प्रगत अर्थव्यवस्था आणि विकासाची फळे चाखायला न मिळालेली फोफावणारी आजची ग्रामीण अर्थव्यवस्था असं विदारक दृश्य  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बघायला मिळेल. दुहेरी व्यक्तिमत्वासारखं हे कोरोनामुळे सर्वत्र आलेलं दुहेरीपण थोडं सुखकारक तर थोडं क्लेशकारक असेल.

डॉ नंदिनी वेल्हणकर

डॉ नंदिनी वेल्हणकर ह्या अर्थशास्त्र विषयात PhD असून मुंबई विश्वविद्यालयाशी संलग्न एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *