“कुठल्याही अभिनेत्याने स्वतःला एका माध्यमापुरतं मर्यादित ठेवू नये…”

Amey Wagh - Theatre and television actor. Source: Author

‘फास्टर फेणे’ चा नवा अविष्कार असो किंवा ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सारखी लोकप्रिय मालिका, आपल्या अभिनयातून अमेय वाघ नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन आलाय. पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीवरून आता अंतर्राष्ट्रीय दर्जाच्या वेब मालिका करणाऱ्या अमेय वाघशी The Tilak Chronicle नी मारलेल्या गप्पा:

अमेय, तू वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या माध्यमांवर करत आला आहेस. एक अभिनेता म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांशी तू कसं जुळवून घेतोस? त्यासाठी तुला स्वतः मध्ये काही बदल घडवावे लागतात का?

हो नक्कीच! टीव्हीवर मी “दिल दोस्ती दुनियादारी” मुळे आलो. त्यानंतर काही चित्रपट केले, “कास्टिंग काउच” मुळे वेब आशयाशी संबंध आला. एकीकडे प्रायोगिक नाटक तर चालूच आहे. इंग्रजी प्रायोगिक नाटकांतसुद्धा मी कामं केली. एक व्यावसायिक नाटक केलं, “अमर फोटो स्टुडिओ” नावाचं. त्याचे जवळपास साडेतीनशे प्रयोग झाले. मी एक रेडिओ कार्यक्रम पण करत होतो जो नुकताच संपला आहे. 

हे सगळं करण्यामागचं कारण असं की मला “कम्फर्ट झोन” मध्ये काम करायला आवडत नाही. तसं बघायला गेलं तर मी नाटकात फार सहजपणे वावरतो. लहान असल्यापासून नाटकात काम करतोय म्हणून असेल कदाचित. पण कॅमेऱ्यासमोर मात्र अजून तसं वाटत नाही. माहेरी आणि सासरी वावरण्यात जो फरक असतो तसं आहे ते. 

पण मला माहितीये की हा सरावाचा विषय आहे. मी जितकं त्यात काम करत जाईन तितकं मला ते माध्यम सोपं वाटत जाईल. या सगळ्यात मी सतत स्वतःवर मात्र प्रयोग करत असतो. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना माझ्यात खूप फरक पडतो. 

रेडिओ तर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. मी अभिनेता असल्यामुळे मला चेहऱ्यातून आणि शरीरातून व्यक्त व्हायची सवय आहे. यावेळी ते काही न करता मला फक्त माझ्या आवाजातून लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवायचं होतं. या सगळ्या नवीन आणि आव्हानात्मक गोष्टी करताना अभिनेता म्हणून मला खूपच मजा येते. 

मुख्य म्हणजे, आपण अशा काळात जगतोय जिथे इतकी माध्यमं आणि त्याबरोबर एवढ्या संधी उपलब्ध आहेत की कुठल्याही अभिनेत्याने स्वतःला एका माध्यमापुरतं मर्यादित ठेवू नये. त्याने तुमची वाढ खुंटू शकते.

“सेक्रेड गेम्स”चा पहिला भाग अंतर्राष्ट्रीय पातळीवर एक यशस्वी कलाविष्कार ठरला. दुसऱ्या भागात काम करताना तुला त्याचं काही दडपण जाणवलं का? 

सेक्रेड गेम्समधली माझी भूमिका खूप छोटी होती. अशी भूमिका मला दुसऱ्या कुठल्या वेबमालिकेत मिळाली असती तर मी नक्कीच केली नसती. पण सेक्रेड गेम्सचा पहिला भाग मला प्रचंड आवडला होता. आपण “नार्कोस”, “ब्रेकिंग बॅड” सारखे कार्यक्रम बघतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे कधी असं काहीतरी केलं जाणार? त्यामुळे माझ्यासाठी हा खूप भावनिक मुद्दा होता.

जेव्हा मी कामं करतो तेव्हा बऱ्याचदा अनेक गोष्टी मोजून मापून करतो. पण मला सेक्रेड गेम्सच्या बाबतीत असं वाटलं की याबाबतीत आपण असं नको करायला. तरी मी सुरुवातीला साशंक होतो. मात्र, नीरज घायवानने मला समोर बसवून सांगितलं की जरी ही भूमिका छोटी असली तरी संहितेसाठी खूप महत्वाची आहे. 

खरंतर लोकांना दुसरा भाग पहिल्या भागाएवढा आवडला नाही. परंतू, सेक्रेड गेम्समधील भूमिकेमुळे एका मोठ्या पातळीवर माझी नोंद घेतली गेली. 

मी काही दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियात गेलो होतो. तिथे मेलबर्न क्रिकेट मैदानावर असलेल्या सहल समन्वयकाला माझ्याबरोबर सेल्फी काढायचा होता. 

मी त्याला विचारलं की माझं काम तुम्ही पाहिलंय का? तर तो म्हणाला, “I have seen you in Sacred Games”. मला फार आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला की एवढ्या लांब आपलं काम पोहोचलं आहे. लोकांनी मला नकारात्मक भूमिकेत पाहिलं नव्हतं. त्यामुळेच मला हे काम करताना खुप मजा आली. 

तुला मराठी मनोरंजन क्षेत्राचं भवितव्य काय आहे असं वाटतं? चित्रपट, नाटक अश्या पारंपरिक माध्यमांमध्ये की आता फक्त ‘डिजिटल’चेच दिवस आहेत?

दुर्दैवाने, मराठी चित्रपटसृष्टीची परिस्थिती सध्या चांगली नाही. मराठी चित्रपटांना हॉलिवूड, हिंदी तसंच दक्षिणेकडील चित्रपट चित्रपटांशी स्पर्धा करावी लागते. ह्या स्पर्धेत मराठी चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये याचं मला फार वाईट वाटतं. मराठी टीव्ही क्षेत्र मात्र जोरात चालू आहे. दिल दोस्ती दुनियादारीमुळे मला हा अनुभव आला. आठवड्याभरापूर्वी कोणी तुम्हाला ओळखत नसतं आणि अचानक तुम्ही एक घरगुती नाव होऊन जाता. लोकांना सवय लागते तुम्हाला बघायची.

मराठी वेब म्हणशील तर तशी खूप व्यासपीठं आहेत. परंतू, त्याला अधिक संशोधित आशयाची गरज आहे. भा.डि.पा चे संस्थापक सारंग, पॉला आणि अनुषा या माझ्या मित्रांचं मला कौतुक वाटतं की त्यांना हे जमलंय. एवढंच नाही तर त्यामागे असलेलं आर्थिक गणित पण ते जमवतात. अजूनही भा.डि.पा वर कसलीही अश्लीलता, अनावश्यक शिवीगाळ किंवा अतिरंजितता नाही. सगळ्या वयोगटांना आवडेल असा आशय आहे. आपल्याला भा.डि.पा सारख्या आणखी व्यासपीठांची गरज आहे. मराठी मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यात अशा व्यासपीठांचं योगदान मोठं ठरेल.

वाढत्या प्रसिद्धीमुळे फक्त प्रेक्षकच नाही तर नवीन दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदललाय?

पुर्वी “आम्ही कशी तुला संधी देतोय” असा एक दृष्टिकोन मला जाणवायचा. आता “Ball is in my court”. मी आठवड्याला तीन-चार चित्रपटांची संहिता तर सहज वाचतो. पण वर्षाला त्यातले एक किंवा दोनच करतो. पर्याय असणं ही चांगली गोष्ट आहे. 

प्रेक्षकांचं म्हणशील तर मी कायमच त्यांच्या संपर्कात असतो. मला असं वाटतंच नाही की मी या समाजापेक्षा वेगळा आहे. 

मी अभिनेता आहे म्हणून रोज टीव्हीवर दिसतो किंवा दर चार-पाच दिवसांनी वर्तमानपत्रामध्ये माझा फोटो येतो, यापलीकडे मी फार काही गांभीर्याने घेत नाही. लोकांमध्ये राहिलं की त्यांना काय आवडतंय काय नाही हे आपोआपच तुम्हाला कळत जातं.

Amey Wagh is a popular actor from Marathi theatre, films and television. Source: Author

यापुढे सुद्धा वेगवेगळी कामं, वेगवेगळी माध्यमं आजमावून पाहायला आवडतील का, की आता एकाच प्रकारच्या कामावर लक्ष केंद्रीत करायला आवडेल?

माझ्यासाठी काही लोक असे आहेत ज्यांच्याबरोबर मी डोळे झाकून काम करू शकतो. मी आता सलग चार मराठी चित्रपट केले. मुरांबा, फास्टर फेणे, गर्लफ्रेंड आणि धुराळा नावाचा चित्रपट केलाय जो जानेवारीत प्रदर्शित होईल. मी या चारही चित्रपटांना संहिता वाचायच्या आधीच हो म्हटलं होतं. 

ज्या लोकांना मी ओळखत नाही त्यांच्याबाबतीत मी खूप शहानिशा करतो. या क्षेत्रात तुमच्या कामाच्या यश-अपयशाचा अंदाज कोणीच लावू शकत नाही त्यामुळेे ज्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल अशा कोणाहीबरोबर काम करायला मला आवडेल.

मला जे काही यश मिळालंय ते सहज मिळालेलं नाही. मी बघतो की कोणीतरी कॉलेजमध्ये एखादी एकांकिका करतात आणि मग त्यामुळे त्यांना टीव्ही मालिका मिळते. माझ्याबाबतीत असा काही चमत्कार घडलेला नाही. मी लहान असल्यापासून काम करतोय आणि हळूहळू माझा जम बसू लागलाय. म्हणून मी काहीच गृहीत धरत नाही. 

मी पुनरुक्ती असलेल्या कामापासून मात्र दूर राहतो. कारण मला फक्त नायक व्हायचं नाहीये. मी प्रेरणादायी नसलो तरी लोक स्वतःला माझ्यामध्ये पाहू शकतात हीच माझी खरी ताकद आहे. 

मी सध्या तीन हिंदी वेबमालिका करतोय. स्टॅन्डअप कॉमेडीचे कार्यक्रम बहुदा सुरु करेन. माझ्या डोक्यात एक-दोन नाटकं आहेत जी मला करायची आहेत, तीन-चार चित्रपट आहेत, असं खूप विविध प्रकारचं काम आहे जे मला आवडतंय. पण हे करत असताना, माझ्यातील जोखीम पत्करण्याची क्षमता गमवली जाऊ नये असं मला वाटतं.

आणि फास्टर फेणे २?

आम्ही सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होतो पण पुढच्या वर्षी कदाचित आम्ही चित्रीकरणाला सुरवात करु. आम्हाला सुद्धा तो करायचाच आहे, नाहीतर त्याचा एवढा छान पाया रचलाय तो वाया जाईल. असं खूप क्वचित होतं की लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांना एखादा चित्रपट आवडतो. लहान मुलांचा प्रेक्षकवर्ग तयार होणं फार गरजेचं असतं कारण एका अर्थी ती तुमची गुंतवणूक असते. हे लहान प्रेक्षक मोठे होत राहिले आणि त्यांना तुमचं काम, तुमचे चित्रपट आवडत राहिले तर त्यातून काहीतरी मोठं घडू शकतं. त्यामुळे भाग दोन नक्कीच येईल.

अमेय वाघ

अमेय वाघ रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही वरील एक लोकप्रिय नट आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *