‘कविकुलगुरू’ अशी यथार्थ पदवी मिळवणा-या कालिदासाने केवळ संस्कृत ललित साहित्यालाच शोभा आणली आहे असे नव्हे, तर जागतिक वाङ्मयामध्येही स्वतःसाठी मानाचे स्थान संपादन केले आहे.
संस्कृत कवी स्वतःविषयी मौन पाळतात या नियमाला कालिदासही अपवाद नाही. त्यामुळे त्याचा जन्मकाळ, जन्मस्थळ, चरित्र याविषयी अभ्यासकांमध्ये फारच मतभेद आहेत. दंतकथाही आहेत. त्यामुळे त्याच्या साहित्याच्या आधारे त्याच्याविषयी विश्वसनीय माहिती गोळा करावी लागते.
कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्र’ नाटकाचा नायक अग्निमित्र ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा असून तो शृंग घराण्यात इ. पू. दुस-या शतकात होऊन गेला. त्यामुळे तो एक अंदाजे काळ, त्या काळातील उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याच्या पदरी कालिदास असावा. किंवा इ. स. च्या चौथ्या शतकाच्या अखेरीस द्वितीय चंद्रगुप्ताच्या दरबारी कालिदास होऊन गेला असावा. त्या राजवटीतील वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब कालिदासाच्या साहित्यात आहे.
मेघदूतातील ११ श्लोकांमध्ये कालिदासाने केलेल्या उज्जयिनीच्या वर्णनात कमालीची आत्मीयता व अभिमान व्यक्त होतात. त्यावरून कालिदास उज्जयिनीचा रहिवासी असावा असे अनुमान. कालिदासाने आपल्या साहित्यात ऋषी, विद्वान, ब्राह्मण यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. त्यावरून त्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला असावा. कण्व ऋषींच्या आश्रमाचे त्याने केलेल्या वर्णनावरून त्याचे गुरुकुलात अध्ययन झालेले असावे.
कालिदासाला हिमालयाचेही बरेच आकर्षण दिसते. कुमारसंभव, मेघदूत, रघुवंश, शाकुंतल, विक्रमोर्वशीय यातही अनेक ठिकाणी हिमालयाचे वर्णन आहे, म्हणून तो काश्मीरचा असावा असे मानतात. तेथून तो मध्यप्रदेशात स्थायिक झाला असावा. कालिदासाचा श्रुती, स्मृती, पुराणे, इतिहास, योग, वेदान्त, वैद्यक, सांख्य, संगीत, चित्रकला इ. शास्त्रांचा-कला यांच्याशी परिचय असावा. कालिदासाला राजदरबार, श्रीमंत लोक यांची सुक्ष्म माहिती असावी. त्याचे अवलोकन सूक्ष्म होते. तो विनोदी, विनयसंपन्न, निरलस, वत्सल असावा.
भावकवी, महाकवी व नाटककार या तीनही भूमिका कालिदासाने सारख्याच यशस्वीतेने वठविल्या आहेत. ‘ऋतुसंहार’ निसर्गवर्णनपर काव्य, ‘मेघदूत’ खंडकाव्य, ‘कुमारसंभव’ व ‘रघुवंश’ ही दोन महाकाव्य आणि ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वाशीय’ व ‘शाकुंतल’ ही नाटके या त्याच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत.
ऋतुसंहार
संहार म्हणजे यात्रा. सहा ऋतुंची शोभायात्रा. ऋतुसंहार म्हणजे ६ ऋतुंचे सहा सोहोळे सांगणा-या ऋतुवर्णनांचा संग्रह. १४४ श्लोकांचे हे काव्य ६ सर्गांत विभागलेले आहे. संपूर्ण काव्य प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेले आहे.
ग्रीष्म ऋतूच्या वर्णनाने काव्याला सुरवात होते. त्यानंतर क्रमाने वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूची वर्णने येतात. ऋतुबदलानुसार निसर्गातील वृक्षवेलींवर, पशुपक्ष्यांवर कसा परिणाम होत जातो याचे प्रत्ययकारी वर्णन या काव्यात आहे. त्याचबरोबर मानवी भाव-भावनांचे ही हृद्य-रेखाटन केले आहे.
मेघदूत
संस्कृत खंडकाव्यांमध्ये मेघदूत हा शिरपेचातील कोहिनूरप्रमाणे लखलखणारा हिरा आहे. १२० श्लोकांचे हे चिमुकले काव्य, पण महाकाव्याच्या दर्जाचे आहे. पूर्वमेघ व उत्तरमेघ अशा दोन भागात विभागलेले हे दूतकाव्य, संदेशकाव्य आहे.
कुबेराचा सेवक यक्ष, त्याच्या हातून अजाणता एक आगळीक घडते आणि त्यासाठी त्याला पत्नीवियोगाचा शाप मिळतो. ही मूळ कथा कालिदासाने स्वीकारली आणि तिला एक प्रतिभासंपन्न वळण मिळाले.
यक्ष शापाच्या मुदतीचे वर्ष पूर्ण करण्यासाठी दूर रामगिरीवर येऊन राहिला असताना रामगिरीच्या उतुंग शिखराला ओठंगून राहिलेला मदमत्त हत्तीसारखा काळाकभिन्न मेघ त्याला दिसला. त्याच्याबरोबर स्वतःचे कुशल प्रिय पत्नीला कळवावे, तिची विरहव्यथा थोडी कमी करावी या हेतूने यक्षाने त्या मेघाबरोबर संदेश पाठविला, ते खंडकाव्य म्हणजे मेघदूत. ‘मंदाक्रान्ता’ या वृत्तात हे काव्य रचले आहे. या एका काव्यावर ४० हून अधिक संस्कृत टीका आहेत. यातील पूर्वमेघात यक्षाचा संदेश घेऊन अलकानगरीत कसे जायचे या विषयीचा तपशील आहे. तर उत्तरमेघात यक्षाने स्वतःच्या घराचे, विरहव्याकुळ पत्नीचे वर्णन केले आहे.
यातील मार्गाचे वर्णन अत्यंत रमणीय व मनोहर असून निसर्गचित्रेही छान रेखाटली आहेत. ते वर्णन शब्दरूप न उरता चित्रमय होते. व वाचकांच्या मनःचक्षूंसमोर जिवंत होते. उपमा, उत्प्रेक्षा, अर्थान्तरन्यास इ. अलंकारांनी म्हटलेले काव्य आहे. मेघदूताची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. तर मराठीत बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, वसंत बापट इ.नी भाषांतर केले आहे.
कुमारसंभव – महाकाव्य
कुमार म्हणजे कुमार कार्तिकेय. त्याच्या जन्माची कथा म्हणजेच कुमारसंभव हे महाकाव्य. शिवपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, कलिकापुराण या ग्रंथाचा आधार घेऊन शिव-पार्वतीच्या पुत्राचा पराक्रम यामध्ये वर्णिला आहे. याचे २२ सर्ग असून पहिले आठ सर्गच कालिदासाने लिहिले असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. यामधील हिमालय वर्णन, निसर्गचित्रे, विविध मनोहर दृश्ये, देखावे साक्षात नजरेपुढे उभे राहतील असे वर्णिले आहेत.
रघुवंश – महाकाव्य
रघुणां वंशः (अन्वयः) रघुवंशः।
रघुवंशातील राजांचे चरित्रचित्रण करणारे हे काव्य महाकाव्याच्या तोडीचे आहे. वंशकाव्याचा सर्वश्रेष्ठ नमुना आहे. १९ सर्गाच्या या काव्यात रघुकुलातील २८ राजांच्या चरित्राचे वर्णन आहे. १५६९ श्लोकसंख्या आहे. राजा दिलिप, त्याचा पुत्र रघुराजा, त्याचा पुत्र अज, आणि अज राजाचा पुत्र दशरथ व पुढे रामकथेचे वर्णन करून रामानंतरच्या एकूण बावीस राजांचे वर्णन केले आहे.
रघुराजाच्या दिग्विजयाच्या अनुषंगाने कालिदासाने तत्कालीन भारताचा भूगोल वाचकांसमोर उभा केला आहे. हिमालय पर्वतापासून सह्याद्री पर्वत, केरळपर्यंतचे वर्णन आले आहे.
मालविकाग्निमित्र – नाटक
हे कालिदासाचे पहिले नाटक. वाकाटक या माळवा प्रांताच्या राजांचा व कालिदासाचा स्नेह होता. त्यांच्या प्रेमाखातर राजपुत्राच्या विवाहप्रसंगी या नाटकाचा प्रयोग झाला. हे नाटक पाच अंकी असून प्रणयप्रधान व रंजक नाटक आहे. नायक अग्निमित्र आणि नायिका मालविका यांच्या या प्रणयकथेमध्ये अद्भूत असे काही नसले तरी कालिदासाने आपल्या प्रतिभेने, कौशल्याने नाट्य फुलविले आहे. या नाटकात शृंगार हा प्रमुख रस असला तरी ईर्ष्या, मत्सर, आशा, निराशा, अनुनय, वंचना या भावनांचे चित्रणही उत्तम केले आहे.
विक्रमोर्वशीयम् – नाटक
उत्कट प्रणयाचे काव्यमय चित्रण करणारी ही दुसरी कलाकृती. ही प्रणयकथाच आहे. विक्रमोर्वशीयचा नायक पुरूरवा हा देवांप्रमाणे प्रभाव असलेला, देवांच्या मदतीसाठी स्वर्गाला ये-जा करणारा राजा, आणि नायिका उर्वशी ही तर स्वर्गातली अप्सराच. त्यामुळे या प्रणयकथेला अलौकिक, स्वर्गीय झळाळी आपोआपच प्राप्त झाली आहे. ऋग्वेदातील हे कथाबीज कालिदासाने आपल्या प्रतिभास्पर्शाने रमणीय केले आहे.
अभिज्ञान शाकुन्तलम् – नाटक
काव्येषु नाटकं रम्यम्। तत्र रम्या शकुंतला ॥
तत्रापिच चतुर्थोऽड़्.। तत्र श्लोकक चतुष्टयम् ॥
सर्व साहित्य प्रकारात नाटक रमणीय, तर नाटकांत शाकुंतल. शाकुंतलमध्ये चौथा अंक रसपूर्ण, तर चौथ्या अंकातील चार श्लोक – शकुंतलेला सासरी पाठवणी करतांना कण्वांनी तिला उद्देशून म्हटलेले – हे श्लोक अत्यंत सुंदर आहेत.
शाकुंतल नाटकात कालिदासाच्या दिव्य प्रतिभेचे दर्शन आहे. महाभारताच्या आदिपर्वात असलेल्या शकुंतलेच्या कथेला कालिदासाचा परिसस्पर्श झाला आहे. निरागस शकुंतला, राजा दुष्यन्त, त्यांच्यामध्ये अंतराय होण्यास कारणीभूत झालेला दुर्वासांचा शाप, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या शाश्वत मीलनाला उपयोगी पडलेले अंगठी हे ‘अभिज्ञान’ हे सर्वस्वी कविप्रतिभेचे उन्मेष आहेत. नाट्यकथेत अभिज्ञानाला (ओळखीच्या खुणेला) असलेले महत्त्व लक्षात घेऊनच या नाटकाला ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ हे सुयोग्य शीर्षक आहे.
शकुंतला-दुष्यंत यांची प्रथम भेट, त्यांचे निस्सीम प्रेम, गांधर्वविवाह, दुर्वासांचा शाप, राजासमोर उभी राहिलेली गर्भवती शकुंतला आणि शापामुळे तिला पूर्ण विसरून गेलेला राजा, दुष्यंताला आठवण करून देण्याची शकुंतलेची केविलवाणी धडपड, आणि हतबुद्ध झालेल्या दुष्यंताची अवस्था, कालिदासाने समर्थपणे व्यक्त केली आहे.
रूढार्थाने शाकुंतल हे शृंगारप्रधान नाटक असले तरी कवीने त्याचा संयमित वापर केला आहे. दुर्वास शापातील थरारक रौद्ररस, धीवर प्रसंगातील फुलणारे हास्य, सर्वदमन प्रसंगातील वात्सल्य, या सर्वांवर कळस चढवणारे चौथ्या अंकातील उदात्त कारूण्य हे ‘शाकुन्तल’चे रसवैभव आहे.
अशा या लोकोत्तर साहित्य निर्मिती करणा-या कालिदासाच्या गुणांवर लुब्ध होऊन जयदेव कवीने कालिदासाला ‘कविता कामिनीचा विलास’ असे म्हटले आहे. बाणभट्टाने त्याच्या काव्याला ‘मधुररसान्द्रमंजिरी’ ही उपमा दिली आहे. राजशेखर याने त्याला ‘रससिद्ध’ ‘सत्कवी’ अशी उपाधी दिली आहे.
असा हा रससिद्ध कवीश्वर आजही रसिकांच्या हृदयात अजरामर झाला आहे.

धनश्री साने
डॉ. धनश्री साने संत साहित्य अभ्यासक असून, त्या मराठी भाषा व योगशास्त्र याचे पदव्युत्तर स्तरावर अध्यापन करतात.
The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.