आत्ताच्या परिस्थितीचे यथायोग्य वर्णन करायचे असेल, तर ‘काळ तर मोठा कठीण आला’ असेच करता येईल. आत्तापर्यंत आपण सर्वांनी अनेकदा वैयक्तिक अथवा कौटुंबिक पातळीवरील संकटाना तोंड दिले असेल. पण आत्ताच्या या कोरोनाने तर सगळ्या विश्वालाच ग्रासले आहे, त्रस्त केले आहे. 

आकस्मिकता, अपरिचितता आणि अनिश्चितता ही या संकटाची लक्षणीय वैशिष्ट्ये. म्हणूनच आपण सगळे गोंधळून गेलो आहोत. परंतु म्हणतात ना, मन चंगा तो कठोती में गंगा… यामुळे प्राप्त परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मन आणि मनगट दोन्ही बळकट करण्याची आज नितांत गरज आहे. 

मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की माणसाचे मन आणि त्याचे शरीर या त्याच्या अस्तित्वाच्या दोन अभिन्न बाजू आहेत. दोहोंमधील युती कोणत्याही राजकीय पक्षाच्या युतीपेक्षाही अधिक भक्कम असते. दोघांचा परस्परांवर परिणाम होत असल्याने संपूर्णतया निरामय स्थितीत राहण्यासाठी, शरीर व मन दोन्ही आरोग्यपूर्ण स्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. 

सुदृढ शरीर हे सुदृढ मन निर्माण करते व सुदृढ मन हे सुदृढ शरीर. याखेरीज मानसशास्त्र असेही सांगते की भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या पाशात अडकणे मनःस्वास्थ्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. म्हणजेच भूतकाळाबद्दल खंत नको व भविष्यकाळाबद्दल चिंता नको. 

उदाहरणार्थ, मी मागच्याच महिन्यात जास्तीचे वाणसामान भरून ठेवायला हवे होते, लॉकडाऊन सुरू होण्या आधीच मी बंगळुरला मुलांकडे जायला हवे होते; किंवा पुढच्या महिन्यात किराणा मिळाला नाही तर…मी बंगळुरुला पोहचू शकलो नाही तर…

मित्रांनो, असे विचार तुमच्यातील आजच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता कमकुवत करु शकतात आणि तुम्हाला हतबल बनवू शकतात. पुढे हीच हतबलता तुम्हाला निराशेच्या गर्तेत लोटू शकते. याचाच अर्थ, तुम्ही वर्तमानकाळात जगायला शिकलात तरच सद्य परिस्थितीतील आव्हानांना योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकाल.

म्हणूनच सध्याच्या आणीबाणीच्या काळात आपले विचार आणि आपल्या भावना सकारात्मक ठेवण्याची खूप गरज आहे. आपले विचार संपूर्णतया तर्काधिष्ठित, विवेकपूर्ण व वास्तवाधिष्ठित असायला हवेत. अविवेकी, अवास्तव, नकारात्मक आणि अतिशयोक्तिपूर्ण विचारांमुळे चिंता, दडपण, काळज्या यांचे ओझे वाढून माणूस खिन्नतेकडे ओढला जाऊ शकतो. 

विवेकाधिष्ठित भावना व वर्तनवादी चिकित्सापद्धती (REBT- Rational Emotive Behaviour Therapy) ही आज सर्वाधिक लोकप्रिय असून याचा वापर जगभर केला जातो. या चिकित्सापद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंतांच्या म्हणण्यानुसार, आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक अविवेकी विचाराला विवेकपूर्ण विचारांचा पर्याय असतो. 

उदाहरणार्थ, बाप रे! करोनाचे हे सत्र असेच चालू राहिले तर पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न कसे होणार, असा नकारात्मक विचार तुमच्यातली परिस्थितीशी लढण्याची ताकद कमी करतो. किंवा हे असेच चालू राहिले तर उद्या भिका मागायची वेळ येईल, हा अतिशयोक्तिपुर्ण विचार तुम्हाला अधिकाधिक हतबल व असहाय्य बनवू शकतो. तुमच्यातील क्रियाशीलता कमी करून भविष्यासंबंधीचे नियोजन करण्याची तुमच्यातील प्रेरणा निकामी करू शकतो. 

याऐवजी ही परिस्थिती चालू राहणे, हे दुर्दैवी असले तरी कोणताही थाटमाट न करता सामाजिक अंतराविषयीचे नियम पाळून वर-वधू एकमेकांना वरमाला घालू शकतील असा विचार करावा. दुर्दैवाने हे असेच चालू राहिले तर आत्तापर्यंत मुलांसाठी साठवलेली पुंजी वापरावी लागेल, मुलांना शिक्षणासाठीचे दुसरे अभ्यासक्रम शोधूया किंवा सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यानंतर पुन्हा काटकसर करून रक्कम उभी करणे शक्य आहे; तसेही आता चैनीने जगण्याचे सर्व मार्ग आपोआपच बाद झाल्यामुळे काटकसर करणे फारसे अवघड जाणार नाही. यासारखे सकारात्मक विचार तुम्हाला उत्साही, चैतन्यमय व कृतिशील बनवतात. 

सकारात्मक विचारांमुळे आपल्यातील निर्णयक्षमता, समस्या परिहार क्षमता कायम रहाण्यास मदत होते. परंतु त्यासाठी आपले दृष्टिकोन बदलण्याची, आपल्या विचारांमधले व वृत्तीमधले अनावश्यक ‘च’ काढून टाकण्याची, नवनवीन पर्यायांचा स्वीकार करण्याची आवश्यकता असते. 

उदाहरणार्थ, परिस्थिती कोणतीही असो, मला माझे पूर्ण वेतन मिळायलाच पाहिजे. दुपारी दीड वाजता मला चारीठाव जेवण मिळायलाच पाहिजे, मी बायकांची कामे करणे शक्यच नाही, मुलाला हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालाच पाहिजे, असे विचार. आपले विचार सकारात्मक असायला हवेत हे खरे. पण मुळात आपल्यातले नकारात्मक विचार कसे ओळखायचे? त्याजागी सकारात्मक विचार कसे पेरायचे? 

मित्रांनो, यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल. नैराश्यपूर्ण मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या मनात सकारात्मक विचारांची रुजवण करण्याची प्रेरणा निर्माण व्हायला हवी. त्यानंतर जेव्हा जेव्हा उदास वाटेल, तेव्हा तेव्हा आपल्याच विचारांवर लक्ष ठेवायला हवे. ज्यावेळी विचार नकारात्मकतेकडे झुकताहेत असे तुम्हाला वाटेल, त्यावेळी जोरात स्वतःलाच उद्देशून ‘थांब/स्टॉप’ असे म्हणावे.

त्यामुळे नकारात्मक विचारांची शृंखला मोडून तुम्ही भानावर याल आणि जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांकडे वळाल. त्यासाठी गरज पडल्यास सकारात्मक विचार काही विधानांच्या अथवा वाक्यांच्या स्वरूपात आपण एका वहीत लिहून काढू शकता. मित्रांनो, अशा रितीने नकारात्मक विचारांचा ओघ अथवा प्रवाह खंडित करून तो सकारात्मक मार्गाकडे वळण्यासाठी आपण हे तंत्र ( Thought Stopping ) वापरू शकता. 

सकारात्मक विचार आपल्या मनात अनुकूल भावना निर्माण करतात. सकारात्मक विचारांमुळे आपल्या मनातले औदासिन्य नाहीसे होऊन आपल्याला प्रसन्न, उल्हसित व तरतरीत वाटते. ही भावस्थिती आपल्याला अनुकूल, विधायक व बरेचदा सर्जनशील कृतींसाठी प्रोत्साहित करते.

मग रिकामपण कसे घालवायचे, ही समस्या न राहता आपण निरनिराळ्या छंदांमध्ये आपले मन रमावतो. वेळेअभावी स्वतःला आवडणाऱ्या ज्या गोष्टींसाठी आत्तापर्यंत वेळ देणे जमले नव्हते, अशा गोष्टींमध्ये प्राविण्य मिळवता येईल. 

या गोष्टी आपल्यातील ऊर्जा, चैतन्य, आनंद कायम राखण्यास निश्चितपणे मदत करू शकतात. सकारात्मक विचार, भावना आणि वर्तन यांमुळे व्यक्तीचे मन सुदृढ राहू शकते. पण शरीर सुदृढ राखण्यासाठी मात्र संतुलित आहार, उत्तम निद्रा, आपल्याला झेपेल असा व्यायाम, योग आणि अर्थातच प्राणायाम, या सर्वांमुळे आपले शरीर निरोगी राहू शकते.

सकारात्मक मानसशास्त्र (Positive Psychology) या मानसशास्त्राच्या अद्ययावत शाखेतील तत्वज्ञ हे व्यक्तीतील दोषांऐवजी तिच्यातील सामर्थ्यावर भर देतात. व्यक्तीतील बलस्थाने तिला संकटातून बाहेर काढून पूर्वस्थितीत आणण्यास मदत करतात, यावर त्यांचा विश्वास असतो. 

आपणही अशा प्रकारची मानसिक लवचिकता प्राप्त करायला हवी. अर्थात हे करताना कोणत्या गोष्टी आपल्या आवाक्यातल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत हे ओळखण्याची गरज असते. त्याचबरोबर आवाक्याबाहेरच्या गोष्टींनी खचून न जाता त्यांचा खुलेपणाने स्वीकार करण्याची आवश्यकता असते. 

दीर्घकालीन संकटांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारची मानसिक लवचिकता आपल्या कामी येते. तसेच प्रसंगानुरूप आपल्यात बदल घडवून आणण्याची आपली क्षमताही आपल्याला संकटाला तोंड देण्यासाठी मदत करते. 

जुने विचार, जुन्या धारणा, जुनी मूल्ये बदलून त्याजागी नवीन धारणांची रुजवण करणे शहाणपणाचे ठरते. वैवाहिक-कौटुंबिक नातेसंबंध, बालसंगोपन, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक नियोजन आदी क्षेत्रांबद्दलच्या जुन्यापुराण्या विचारांचा त्याग करून त्याऐवजी नवीन विचारांचा अंगिकार करणेही भविष्यकालीन स्वास्थ्यासाठी श्रेयस्कर ठरते.

मित्रांनो, हे सगळं विवरण कमकुवत लोकांसाठी बरं का… आपण पुरेसे खंबीर असाल तर या सूचनांची आपल्याला आवश्यकता नाही. परंतु, बरेचदा खंबीर व्यक्तीही एखाद्या बलाढ्य संकटापुढे नामोहरम होऊ शकते. अशावेळी या मार्गदर्शक सूचनांचे पालन आपल्यातील खंबीरपणा राखण्यासाठी नक्कीच सहाय्यीभूत ठरू शकेल. तेव्हा व्हा स्वतःच स्वतःचे मानसोपचारतज्ज्ञ…

डॉ उज्ज्वला करंडे

डॉ उज्ज्वला करंडे ह्या मानसशास्त्रच्या प्राध्यापिका आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *