उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र का ?

Source: Press Information Bureau

२७ मार्च २०१९ या दिवशी भारताने नुकताच उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र (Anti-Satellite ‘A-Sa’ मिसाईल) वापरून पृथ्वीपासून ३०० किमी अंतरावर स्वतःचाच एक Low Earth Orbit (LEO) सॅटेलाईट पाडून त्याची यशस्वी चाचणी केली. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र हे कोणत्याही प्रकारच्या उपग्रहांना लक्ष करण्याकरिता वापरता येते. याला कारण असे की बहुतांश लष्करी व गुप्तचर उपग्रह पृथ्वीपासून ३०० ते १२०० किमी अंतराच्या टप्प्यात असतात. 

यापूर्वी अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांनी याप्रकारची चाचणी केली आहे. हे तंत्रज्ञान शांततेचे उद्धिष्ट लक्षात ठेऊनच केले गेले आहे असे भारताने स्पष्टपणे म्हणले आहे. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र करिता बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स इंटरसेप्टरचा वापर केला गेला, जो चालू बॅलिस्टिक मिसाइल संरक्षण कार्यक्रमाचा भाग आहे. चाचणीचे महत्त्व म्हणजे भारताने पूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर बाह्य स्पेसमध्ये उपग्रह थांबविण्याची आणि त्यात हस्तक्षेप करण्याची क्षमता यशस्वीरित्या दाखवून दिली.

मुळात LEO सॅटेलाइट कशासाठी वापरले जाते हे समजून घेणे महत्वाचे ठरेल. दूर संवेदनां (Remote Sensing) करिता दोन प्रकारचे उपग्रह वापरले जातात, त्यात भूस्थिर (Geo-Stationary) व सूर्यगामी (Sun Synchronous) असे प्रकारचे उपग्रह आहेत. भूस्थिरउपग्रह हे ३६००० किमी उंचावर असतात, त्या उंचीवर हा सॅटेलाइट एके जागी थांबल्यासारखा भासतो व त्याच्या दृष्टीक्षेपात नेहमी एकच भूभाग असतो.

LEO सॅटेलाइट हे सुर्यगामी उपग्रह प्रकारात आढळतात. सूर्यगामी उपग्रह हे कमी उंचीवर म्हणजे १००० किमी उंचीवर असतात. त्याची वियोजन क्षमता खूपच चांगली असून सूर्यगामी कक्षेमुळे एखाद्या विशिष्ट अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणे एकाच स्थानिक वेळी, व एकाच प्रकाशपातळीसह चित्रित केली जातात. शिवाय ठराविक कालांतराने, त्याच ठिकाणाचे चित्रीकरण याद्वारे होते. सूर्यगामी उपग्रह प्रामुख्याने दूरसंचार माहिती प्रसारित करण्यासाठी वापरले जातात. यांच्या कमी उंचीमुळे हे सॅटेलाइट त्यांच्या कक्षेत असताना पृथ्वीच्या विविध भागांवरून मार्गक्रमण करत राहतात. भारताचे Cartosat १ आणि Cartosat २ असे सूर्यगामी उपग्रह आहेत. 

उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र का बनविण्याची वेळ आली हा मुद्दा समजून घेणे योग्य ठरेल.

जेव्हा एखाद्या प्रदेशावरून उपग्रह जात असतो तेव्हा त्या प्रदेशाची दृश्य पटलावर दिसेल अशा संपूर्ण माहितीचे निरीक्षण केले जाते. प्रत्येक उपग्रहाची कक्षा ठरवूनच उपग्रह योग्य कक्षेत सोडला जातो. उपग्रह प्रदेशावरून जात असताना नेमक्या कोणत्या प्रदेशाचे निरीक्षण करेल व नेमकी किती प्रदेशाची प्रतिमा देईल त्याची संदर्भ प्रणाली तयार केली जाते. प्रत्येक Orbit Calendar हे त्या उपग्रहाचा मार्ग व ओळी मध्ये आखले जाते, त्यानुसारच उपग्रह त्या कक्षेत मार्गक्रमण करतो. आवश्यकतेनुसार उपग्रह जवळच्या कक्षेत एखाद्या स्थानाचे चित्रीकरण करण्यासही वापरू शकतो, असे गुप्तचर उपग्रह पृथ्वीपासून ३०० ते १२०० किमी अंतराच्या टप्प्यात फिरत असतात.

भविष्यात एखाद्या देशाने असेच उपग्रह वापरून भारताची संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिउत्तर म्हणून उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र उपयोगास येऊ शकते. भारताचा एवढा मोठा अवकाश कार्यक्रम सुरु असताना अवकाशातील आपल्या संपत्तीचे रक्षण करण्याची आपली क्षमता भारताने या चाचणीमध्ये सिद्ध केली. अवकाशात भारताच्या हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी हीआपलीच आहे. 

अंतरिक्ष क्षेत्रात पाठवले जाणारे उपग्रह व त्यावरून भविष्यातील अंतरिक्ष मधील धोके टाळण्याकरिता विविध पावले उचलली गेली. त्यामध्ये १९६७ साली अंतरिक्ष क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शंभरहून जास्त देशांत झालेल्या Outer Space Treaty नुसार, कुठल्याही देशाला पृथ्वीच्या संलग्न अंतरिक्षात कुठलीही मानवी संहारक शस्त्रास्त्रे ठेवता येणार नाहीत म्हणजेच कुठल्याही सॅटेलाईटवर बॉम्ब, अणुबाँब वगैरे गोष्टी ठेवता येणार नाहीत याची सक्ती केली गेली. भारताने १९८२ साली या करारावर स्वाक्षरी केली.  

१९९१ मध्ये स्पेस कंट्रोल एंड एंटी सॅटेलाईट व्हेपन नुसार स्पेस कंट्रोल पॉलीसी जगासमोर मांडली गेली. १९७९ साली काही देशांनी ‘मूनट्रीटी’ नावाचा करार केला. त्यानुसार, अंतरिक्षाततल्या कुठल्याही ग्रहगोलावर कुठलाही देश कसलीही मालकी सांगणार नाही आणि Military activity करणार नाही असे नमूद केले गेले. मात्र, यामध्ये फक्त १८ देशांनी सहभाग दर्शविला असून त्याच्या उद्देश पुरती संदर्भात शंका आहे.

प्रत्येक देशाला स्व-रक्षणाचा हक्क असून त्याकरिता आवश्यक तयारी व उपाय तयार ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र आहे म्हणून आपण दुसऱ्या देशाच्या कुठल्याही LEO उपग्रहाला आपल्या देशाच्या वरून चालला होता म्हणून पाडू शकत नाही, कारण तसे आपलेही बरेच सॅटेलाइट दुसऱ्या देशांवरून जात असतात. युद्धाकरिता उपग्रह विरोधी क्षेपणास्त्रचा उपयोग केला जात नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे. कोणत्याही उपग्रहावर स्फोटके ठेऊन त्याचा एखाद्या देशावर हल्ला करण्याचा उद्देश नसतो, त्यामुळे घाबरून जाऊन अथवा उतावळेपणा करून चालणार नाही.अवकाशात शस्त्रे ठेवण्यापासून रोखण्यासाठी, आंतराळातील शस्त्रांच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मसुदा तयार करण्यामध्ये भविष्यात भूमिका बजावण्याची अपेक्षा भारताने केली आहे, भारताने केलेल्या चाचणीमधून कोणताही नियम मोडला नाही याची नोंद घेण आवश्यक आहे.

श्रीकांत गबाले

डॉ श्रीकांत गबाले हे भौगोलीक माहिती प्रणाली (GIS), दूर संवेदन (Remote Sensing), ड्रोन (UAV) या विषयांमध्ये तज्ञ आहेत. ते युनिटी जिओस्पेशाल एलएलपी या कंपनी मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *