कोरोना! खरंच चक्रावून गेल्यासारखं झालंय. विचार करुन डोकं थकलंय. तरीही कोरोनातून वाचायला तर हवंच. मग रोजचे व्यवहार आलेच. लहान मुलं, म्हातारी माणसं सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. हे काम आणि जबाबदारी तरुणांवर जास्त आहे. सगळ्यांना सुदृढ ठेवून सर्व नियम पाळायला लावायचे. कसरत आहे खरी!

रोजच्याप्रमाणे उठून मी नाश्त्याची तयारी सुरु केली. फ्रीज उघडला तर मिरची, कोथिंबीर नाही. पोहे नाहीत, दुकान बंद. सामानच नाही, मग वाणी तरी देणार कसा? परंतु घरातली स्त्री म्हटलं की काहीतरी बनवून वेळ निभावून न्यायला हवी.

वा! रवा आहे. पण उपम्याला कांदा नाही, मिरची नाही. परवाच गोड शिरा झालाय. साखरही जपून वापरायला हवी. किमान चहा तरी पिता येईल.

आयडिया! मला एकदम आईच्या हातचा सांजा आठवला. कांदा, लसूण नको, हिरवी मिरचीही नको. मी पटकन फोडणी केली, लाल सुक्या मिरच्या दोन तुकडे करुन घातल्या. रवा छान भाजला नि कडकडीत पाणी ओतलं. दहाव्या मिनिटाला सांजा तयार!

परमेश्वर कृपेने दारात नारळ, कडुलिंब आहे. नारळ खरवडून घातला नि सर्व सांज्यावर दोन चमचे साजुक तूप घातले. सर्वांनी मिटक्या मारत खाल्ला. नावालाही उरला नाही. शिवाय, एकदम फक्कड झाल्याचा शेराही ऐकायला मिळाला.

तेव्हा आईचे शब्द आठवले, “अगं, असेल त्यात चविष्ट स्वयंपाक करेल ती सुगरण! सगळेच जिन्नस असल्यावर कोणीही छान करेल. एखादी वस्तू नसली की आपलं डोकं अधिक वेगाने काम करायला लागतं बघ.”

मला माझ्या वडिलांची खूप छान कविता आठवली, ‘उणीवेतील पूर्तता’. तेव्हा मी लहान होते, आता अर्थ चांगलाच कळतोय. ते म्हणायचे, अगं कसली तरी उणीव असण्यातच मजा आहे. ती उणीव भरुन काढण्यासाठी कष्ट घेताना एक वेगळीच मजा असते.

सगळंच ओतप्रोत भरलं असेल तर माणूस आळशी बनेल. जगण्यातली मजाच संपेल. आजकाल ज्याला आपण नैराश्य म्हणतो, याला ‘सुख बोचतंय हो!’ असंच म्हणत असत.

खरंतर कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलंय. कामाला बाई असते. काही जणांकडे तर चार चार कामवाल्या. मग काय, टाका वाटेल ते! कप, वाटी, चमचा, पाणी पिण्याची भांडी, काचेची भांडी, सुरी नि काय नाही.


बिचारी कामवाली! पैसे देतो परंतु ती माणूस आहे हेच आपण विसरतो. शिवाय तिच्याच हातचं बाहुलं बनतो. आता मात्र लाद्या पुसताना, केर काढताना, भांडी घासताना तिची उणीव भासायला लागलीय. कधी कधी वाटतंय, कशाला बाई? आपण छान निभावून नेतोय. पण “तेरडयाचा रंग तीन दिवस.”

माझा लायटर बिघडलाय आणि नवीन मिळत नाहीये. जुना दुरुस्त करता येत नाहीये. अर्थात आता काडेपेटी. एकदा बहिणीकडे गेले होते (लायटर नसताना), तेव्हा तिच्या सासूबाई जुन्या पोस्टकार्डाच्या पट्ट्या करुन गॅसच्या वरती ग्लासात ठेवायच्या. मी विचारलं, “आजी हे काय गं?”

“सारखी नवीन काडी वाया घालवण्यापेक्षा या गॅसवरुन शेजारचा गॅस पेटवायचा. दरवेळी काडीवाचून काडेपेटी वाचते”, हेही सांगताना किती आनंदी असायच्या त्या. आज मलाही अशा पट्ट्या करायची वेळ आलीये. या पट्ट्या लायटरची उणीव भरुन काढतायत.

विपूल प्रमाणात असलं की, त्याची किंमत नसते. शिळं राहीलं की कामवालीला देऊन मोकळं होता येतं. आता रस्त्यावरुन उपाशी चालणारी माणसं बघितली की, चांगला घासही घशात अडकल्यासारखा होतोय. ती ना आपल्या नात्याची ना गोत्याची. मग असं का होतंय? कारण आज कोरोनामुळे आपण सगळेच एकाच पातळीवर आलोय. नियती आणि कठीण परिस्थिती सगळं शिकवते.

आता फोडणीची पोळी, फोडणीचा भात, दडपे पोहे, आंबोळी, थालीपीठ चवदार वाटायला लागलेत. शेव, पाणीपुरी, फरसाण या गोष्टी धारावी झोपडपट्टीसारख्या ठिकाणाहून येतायत अशी क्लिप बघितली की, रेड झोन डोळ्यासमोर येतो आणि तीच चवदार पाणीपुरी घशात घोळायला लागते कोरोनाच्या भीतीने. पण तिची उणीव कोण भरुन काढणार? अर्थात आई. तिच्या हातची प्रत्येक गोष्ट आता छान लागायला लागलीये.

फक्त झोपायला नि बाहेरचं खाल्ल्यावर थोडीशी भूक भागवायला घरी येणाऱ्यांना कोरोनाने दिवसरात्र घरात कोंडून ठेवलंय. आता स्वच्छंदपणे फिरायची उणीव प्रकर्षाने जाणवायला लागलीये.

चोवीस तास सगळ्यांची कामं करून स्वतःला जास्तीतजास्त वेळ घरात व्यस्त ठेवणाऱ्या आईची व्यथा कळते. असंख्य कपडे, चपला, साड्या, सौंदर्य प्रसाधनांचा खजिना कशाला एवढा भरुन ठेवलाय, असं वाटायची वेळ आलीये.

चेहरा, डोकं कपड्यात गुंडाळून बाहेर पडायला लागल्यावर बुरख्यात राहणाऱ्या बाईची व्यथा नि आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळत आहे.

ठाण्यापासून अगदी वीस मिनिटांवर आमचं घर. पण तरीही खेडं. परमेश्वर कृपेने, खरंतर माझ्या पुर्वजांच्या पुण्याईने माझ्या घरी सुंदर पण छोटंसं आंगण आहे. त्यात शेवगा, केळी, फणस, चिकू, आंबा, नारळ, अळू, रामफळ, पपई अशी थोडीशी झाडं आहेत. यामुळे बंद असलेल्या भाजी बाजाराची उणीव कधी अळूची भाजी तर कधी शिकरण, परसातल्या फणसाची भाजी, नारळाची चटणी, तर कधी शेवग्याची आमटी, आणि अळूवडी करुन भरुन काढता येतेय.

केळीचं पान ताटांची किंवा पेपरडिशची उणीव भरुन काढतंय. कोरोना असूनही माझी नातवंडं मागच्या अंगणात स्वछंदपणे खेळतायत बागडतायत. शहरातल्या बंद जीवनाची उणीव भरुन काढतायत.

दारात एक गाय आहे. ती दोनदा दूध देते म्हणून घरात दूधदुभतं आहे. भातावर, पोळीवर तुपाची धार घेता येतीये. म्हणूनच गाईला आई म्हटलंय हो!

घरचांची लाडकी अनुसया. Source: Author

देवाचा धावा परत ऐकायला मिळतोय. सगळी जण कामं करतायत. त्यामुळे शरीरातील मेद नाहीसा झालाय. कालच झाडावरचा मध काढून घेतला. मुलं आनंदाने मध खाताना बघितलं की कोणी म्हटलेलं खरं वाटतं, “अमृत घट भरले तुझ्या घरी, कां वणवण फिरशी त्यांच्या बाजारी?”

घरातली बेलाची दोन पानं, जास्वंदीचं फूल, एक दुर्वाची जुडी, तगरीची किंवा पारिजातकाची चार फुलं. मिळालीच चार बकुळीची फुलं. या फुलं, पत्रींमुळे आमचा देवही खुश असतो. फुलपुडी नाही आता काय, असा प्रश्न येत नाही.

परिपुर्ण असलेला मोठ्ठा फ्लॅट, पैशांची रेलचेल आणि घरात दोन माणसं. बोलायचं कुणाशी? अर्थात मोबाईल. दुधाची तहान ताकावर भागवायची. या सगळ्यांशिवाय आज जगणं कठीण. पण किती?

घर कुठलं, जिथं आजोबांचा खोकला, आजीची स्तोत्रं ऐकू येतायत. आईची नि सुनेची स्वयंपाकातली गडबड नि लुटुपुटुची भांडणं. एखादी लाडकी नणंद. तरुण मुलामुलींची ये जा. बाळाचं रडणं नि खेळण्याचा भरपूर पसारा.

खेड्यात राहुनही शिकता येतं. माझा एक मुलगा डॉक्टर, दुसऱ्याचा पाणी शुद्धीकरणाचा कारखाना. खेड्यात राहुनही आमच्याकडे आजीपासून नातीपर्यंत सर्व बायका वाहन चालवतात. वाडयातच छोटंसं दुकान. सतत पाण्याने भरलेल्या दोन विहिरी, त्यात मासे कासवं आहेत, मुलांना त्याचं केवढं अपरूप. हे पुर्वजांचे उपकार नव्हेत का? पण हे टिकवणं पुढच्या पिढीचं काम आहे.

टीव्हीवर पायपीट करत मुलंबाळं घेऊन उपाशीपोटी माणसं चालतायत. म्हणतात गावी जाऊन मरुया. मुंबईसारख्या श्रीमंत शहरापेक्षा त्यांना जन्मभुमीची आठवण यायला लागलीये.

लहानसं का असेना अगदी छोट्याशा खेड्याच्या कुशीत, एक घर असावं. जिथं परसदारात आनंदानं बसता यावं. उत्शृंखल जगापासून लांब. उंच इमारतींमधून कधीही न दिसणारे तारे बघत. पक्षांची किलबिल ऐकत. चला जाऊ अमेरिकेला म्हणण्या परीस चला जाऊ खेड्याकडे म्हणूया.

मी काय लिहित बसलीये, मागच्या दारी माझ्या नावाचा शंख चाललाय. सगळे मिळून केळ्यांचा घड कढतायत नि फणसाच्या भाजीची जबाबदारी माझ्यावर आहे. सून नारळाची चटणी करणार आहे.

आजचा आमचा जेवणाचा बेत ऐकायचाय? परसातल्या अळूच्या वड्या, नारळाची चटणी, फणसाची भाजी, पोळ्या, दारातल्या आंब्याचा रस. आधी तूप भात मेतकूट नि शेवटी गुरगुरीत दहीभात. वाटीभर ताक. आहे ना मजा?

कोरोना असताना कशाला घराबाहेर जायचं? प्रधानमंत्री मोदी म्हणतात तसं आमचं आत्मनिर्भर जीवन त्यांच्यामुळेच कोरोना सुसह्य होई!

आरती अनिल सोहोनी

आरती अनिल सोहोनी या ३३ वर्षें शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांना पाककला, बागकाम, आणि लेखनाची आवड आहे. त्या सध्या रा.से.सं समिती येथे पौरोहित्य शिकत आहेत. 

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.

Tagged:

9 comments

 1. Namskar Madam,
  Tumchi Lekhan nehmich kahitari shikun jate, vachtana Pratyakshita cha
  bhaas hoto… atahi zala kharo kharch aapan ek gaav cha ghari ahot ani he sarv anubhavtoy ase Bhasale… Lahanpan aathavle,te gaav aathavle..
  junya aathavanina ujala milala..
  khuoach chaaan.

 2. भिवंडी मधील एक वर्ष डोळ्यासमोर येऊन गेले….. विलक्षण !!!!!
  सर्वांना नमस्कार……
  संदीप म्हात्रे

 3. फारच सुंदर लेख… खरंच माहेरी बेळगावला गेल्यासारखे वाटले

Leave a Reply to Darshana Ingle(Nutan) Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *