आमची वाडासंस्कृती

Source: https://punetourism.co.in

काळानुरूप पुढे जाणे हा मनुष्याचा स्थायीभाव आहे आणि त्यात  चूकही नाही. बहुप्रतिक्षित पुण्याचा विकास आराखडा जाहीर झाला तेव्हा मध्य पुण्याचा चेहरामोहरा बदलणार हे जवळपास निश्चित झाले. वाडे हीच ज्या शहराची ओळख होती, तिथे आता टोलेजंग इमारती उभारल्या जातील. 

१९७६ साली आमचा तुळशीबागेजवळचा पेशवेकालीन वाडा विकून आम्ही १९९० साली आम्ही आमचा मुक्काम नारायणपेठेत हलवला. मधली १४ वर्षेंआम्ही वनवास भोगला; बांधकाम व्यावसायिक इमारत निवांत बांधत होता, ‘पझेशन’ देत नाही तोवर आम्हीही जागा सोडत नव्हतो. (नारायण पेठेतलेघर ताब्यात घेण्याचे पूर्ण श्रेय माझ्या आईला आहे; ती अक्षरशः रोज पझेशन बद्दल विचारण्याकरिता त्या बांधकाम व्यावसायिकाला भेटायची.)

तेव्हा माझे वय होते ६ वर्ष, त्यामुळे मला वाड्याबद्दल फारशी ओढ नव्हती. मला वाडा मात्र चांगला आठवतो; एक हौद होता, ज्यात थेट कात्रजचे पाणी यायचे, आणि एक तगरीचे झाड होते, जे नेहमी फुलांनी लगडलेले असायचे. पुढे मोठे अंगण होते, आणि मागील बाजूला आळूचे वाफे होते.

वाड्याविषयी दोन आठवणी  कायम ताज्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, की आम्ही दहा चक्रदेव, आत्या आली असली तर आत्या, अशी अकरा जण पत्ते खेळायचो. सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे  झब्बू, तो पण गड्डेरी! आजोबा पत्ते खेळायचे नाहीत, पण येऊन बसायचे. जसा खेळ  सपंत यायचा, तसे आजोबा शेजारच्या कावरेच्या दुकानात दहा कप (काचेचे) पायनॅपल संडे ची ऑर्डर द्यायचे. एक अख्खा ट्रे भरून दहा पायनॅपल संडे आले,की सुट्टी सार्थकी लागल्यासारखी वाटायची. आता हवे तेव्हा, हवे तेवढे आईस्क्रीम आणू शकतो, पण ती मे महिन्याची सुट्टी, तो रंगलेला झब्बू चा डाव,आणि आजोबांनी दिलेली पायनॅपल संडे ची ऑर्डर…. सगळ्या गोष्टी फक्त आठवणी मध्येच शिल्लक राहिल्या आहेत.

दुसरी आठवण – तुळशीबाग आणि तिथले राम मंदिर, या दोन्ही गोष्टी माझ्या हृदयाच्या फार जवळ आहेत. माझे लहानपण तुळशीबाग राममंदिराच्यापरिसरात गेले. अंघोळ झाल्या झाल्या आजोबा, आणि रात्री जेवण झाले, की आई असे दररोज मला तुळशीबागेच्या राम मंदिरात घेवून जात. तिथे मी खूप रांगायचो. रात्री तिथेच झोप लागली तर आईला मला कडेवरून आणणे अवघड जायचे. बरोबर मोठी बहीण गौरीही असायची. खुपदा डॉक्टर परांजपे दवाखाना बंद करून रामाच्या दर्शनाला यायचे, मग तेच मला कडेवर घ्यायचे आणि आमची वरात घरी पोहचायची. 

जोवर आमचा वाडा तुळशीबागेजवळ होता, तोवर आजी रामजन्माचे कीर्तन ऐकायला घेवून जाई. ते कीर्तन ऐकता ऐकता मला झोप यायची. तसा मी लहानपणीही शरीराने जड होतो, पण आजी कधीही कुरकुर न करता मला उचलून घेवून यायची. आजीचा श्रीराम नवमीचा पूर्ण दिवसाचा उपवास असे. संध्याकाळी याच मंदिरात डॉ कल्याणीताई नामजोशी यांचा रामायणावर प्रवचन असे. त्यात पहिल्यांदा “श्रीरामनाम नौका भवसागरी तराया” ऐकले. खूपच सुंदर काव्य आहे. “प्रभू तुझी हीच मूर्ती हृदयी सदा वसू दे, मम मानसी पुजेची वृत्ती सदा असू दे, जगतात सौख्य नाही, आलो तुझाच पाया” याओळी ऐकल्यावर त्या केवळ रामाकरिताच रचल्या आहेत, याची खात्री पटते.

तुळशीबागेची भव्य वास्तू आजही तेवढीच आश्वासक आहे जेवढी २९ वर्षापूर्वी होती. 

तिथली राममूर्ती नजर हलू नये एवढी सुबक आणि मनाला शांतता देणारी आहे. आता आजी नाही. आजीने धरलेला रामनवमीचा उपवास तिची आठवण म्हणून मी सुरु ठेवला आहे. आजी न चुकता पाडवा ते रामनवमी तुळशीबागेत जायची. ती परंपरा अजूनही सुरु आहे. पुढेही राहील. कुठेतरी त्या तुळशीबाग राममंदिरात माझ्या आजी आजोबांच्या स्मृती अजून आहेत, अशी एक भाबडी आशा असल्याने, त्या वास्तुत आजही विलक्षण शांतता वाटते …जय श्रीराम.

वाडा सोडताना मला तसा त्रास झाला नाही. आजी, आजोबा, बाबा यांना मात्र झाला. आजीचा संपूर्ण संसार वाड्यात झालेला. १९९० साली आम्ही नारायण पेठेत आलो तेव्हा ती अत्यंत शांत, हवेशीर आणि तरी “हार्ट ऑफ द सिटी” अशी जागा होती. माझा वयाचा ६ ते ३२ हा काळ मी इथे घालवला. तब्बल २ तपे या घराने मला सावली दिली. नूमवीचा विद्यार्थी असल्याने शाळा अगदी चालत, १० मिनिटांवर. हुजूरपागा मध्ये असल्यामुळेतिलाही जवळ. नंतर कॉलेज स.प. महाविद्यालय. सर्वच घराजवळ.

काळ बदलत गेला, आणि वर्दळ वाढली. माझ्या खोलीमधून रस्ता दिसायचा; अचानक तिथे इमारत उभी राहिली. रहदारी चा त्रास सुरु झाला. मध्येमध्ये आईला वाटायचे, कोथरूड अथवा सिंहगड रोडला रहायला जावे. त्यात माझी भर घालायची – खूप मोठे ‘ग्राउंड’ आहेत  तिकडे, खाली चालता येईल. आई आणि बहीण जागा बघूनही यायच्या. पण माझा कडवा विरोध आणि त्याला आजी आजोबांची साथ. त्यांचीही गात्र थकत चालली होती आणि त्यांचे निर्धारही ठाम होते – मध्य पुणे आणि नारायण पेठ सोडून जातील ते आता आमचे देह. घर बदलायचे नाही.

एके सकाळी आई हे आठवून म्हणाली, तुम्ही लोकांनी हाणून पाडले म्हणून आपण २८ वर्षें इथे आहोत. अनेक ऊन-पाऊस-वादळे या घराने बघितली, पण ही वास्तू आणि हा वास्तूपुरुष आमच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. अनेक चांगल्या गोष्टी या वास्तूत घडल्या. कधीही भिती, अस्वस्थतताजाणवली नाही. उलट कायम, कधी एकदा घरी जातोय असेच प्रेम वाटत आले. घर हे फक्त विटा, माती, सिमेंट ने बनत नाही, त्यात भावना ओताव्या लागतात. माझ्या आजी आजोबांच्या अनेक आठवणी या घरात आहेत. त्यांचे आणि आईबाबांचे कष्ट आणि धावपळ यामुळे ही वास्तू होऊ शकली. या वास्तूत जीव अडकल्यासारखा आहे. वास्तूची सेवा करावी, म्हणजे ती कायम प्रसन्न राहून येणाऱ्या पिढ्यांनाही सावली देते .पुढे नव्या वास्तू होतीलही पण ही विकावी हे कधी मनात ही येणार नाही…

आज मध्य पुण्याला, पेठांना 4 FSI मिळाला आहे. पुण्याचे पुणेरीपण टिकण्याचे खरे श्रेय जाते ते या पुण्यात जन्म घेतलेल्या, वटवृक्षाच्या सावलीप्रमाणे असलेल्या, आणि चंदनाप्रमणे झिजलेल्या त्या माझ्या आजी-आजोबांच्या पिढीला. वाडा संस्कृती त्यांनी पाळली. वाड्यामध्ये आपपरभाव नसायचा. कोणाकोणाची नातलग मंडळीही हक्काने यायची. गप्पा व्हायच्या. वाड्यामध्ये मांडव टाकून लग्ने ही झाली आणि पंक्तीहीउठल्या. त्यांनी (आजी-आजोबांच्या पिढीने) पुणेरीपण टिकवले, आणि संस्कारांनी आमच्या पिढीकडे हस्तांतरित केले.

वाडे पाडून इमारती उभारल्या जातील, तरी पेठेत लहानाचे मोठे झालेले सर्व पुणेकर पुण्याचे पुणेरीपण कधीही संपू देणार नाहीत. वाडा फक्त एक वास्तू नसून तो एखाद्या मूळपुरुषासारखा धीरगंभीरपणे कायम पाठीशी उभा आहे हाच भाव आहे. वास्तू आज आहेत, उद्या पाडल्या जातील, उद्या नव्या उभारल्या जातील, पण संस्कार कायम आहेत आणि त्याचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या, दुसऱ्या कडून तिसऱ्या पिढीकडे होतच राहील…

मंदार चक्रदेव

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *