आता शिका मेंदूतील मायक्रोचिपमार्फत!

जगभरात विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा, प्रामुख्याने माहिती व संवाद (ICT) तंत्रज्ञानाचा प्रसार होत असताना अब्जावधी लोकांच्या दैनंदिन आयुष्यात होणाऱ्या वेगवान बदलांचे आपण साक्षीदार आहोत. 

संगणक, इंटरनेट व स्मार्टफोन या त्रिकूटामुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वच लोकांच्या जीवनात विलक्षण फरक पडला! संपूर्ण जग तंत्रज्ञानाने जोडले जाऊनग्लोबल खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला आता फक्त संगणकावर अवलंबून राहायची गरज लागत नाही. खरेतर भ्रमणध्वनी हाच आजचा फिरता संगणक झाला आहे, ज्याद्वारे कित्येक गोष्टी अगदी सहजपणे, हव्या त्या ठिकाणाहून आणि कमी पैशात करु शकतो.  

भारतात माहिती व संवाद क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. सध्या आपल्या देशात सुमारे ३० कोटी नागरिक भ्रमणध्वनी वापरतात आणि त्यांच्या संख्येत दरमहा ५० ते ६० लाखांची वाढ होत आहे. संगणकांच्या किंमती दिवसेंदिवस कमी होत असल्याने याही क्षेत्रातील मागणीत वाढ दिसून येईल. 

माहिती आणि परस्परसंवादाच्या देवाणघेवाणीत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या संगणक आणि भ्रमणध्वनी, या दोन साधनांच्या वापरामुळे येत्या काळात एक नवीनच इ-जीवनशैली निर्माण होईल. कोणत्याही विषयाची माहिती घरबसल्या मिळेलच, परंतू याबरोबरच इतर अनेक सेवासुविधा इलेक्ट्रॉनिकस्वरुपात जगभरात कधीही, कोठेही उपलब्ध होऊ लागतील. दुकानात न जाता खरेदी किंवा बँकेत न जाता पैशाचे व्यवहार करणे यामध्ये विशेष असे काहीच राहणार नाही.

संगणकीय क्रांतीचा शिक्षण आणि ते देण्या – घेण्याच्या संकल्पनांवर फार मोठा परिणाम होईल. शैक्षणिक विद्यापीठांच्या विचार आणि व्यवस्थापन पद्धतीत बदल घडतील आणि सायबर विद्यापीठेही निर्माण होतील. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत न जाता शिक्षण घेणे सोपे होईल आणि मुख्य म्हणजे ते साचेबंद,कंटाळवाणे न वाटता हसतखेळत घेता येईल (याला एज्युटेनमेंट म्हणतात). 

स्वयंसेवी संस्थांनादेखील या तंत्रक्रांतीचा मोठा लाभ होईल. एकविसाव्या शतकातील शिक्षणाची प्रक्रिया अत्याधुनिक होत असून कदाचित २०४० सालानंतर कदाचित महाविद्यालयेही अस्तित्वात नसतील.

शिक्षण म्हटले की, अगदी पहिल्या दुसऱ्या इयत्तेतील अक्षरओळखीपासून उच्चशिक्षणापर्यंतचा वीस-पंचवीस वर्षांचा प्रवास प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभा राहतो. शाळा दूर असणे, शिक्षणावरील खर्चासाठी पैसे नसणे, शिक्षक चांगले नसणे, विषय न समजणे किंवा न आवडणे या आणि अशा इतरही खडतर पायऱ्याओलांडून चिकाटीने शिक्षण पूर्ण करणे सोपे नाही. यामुळे अनेक लोक शिक्षणापासून वंचित राहण्याचे किंवा दूर जाण्याचे प्रमाण मोठे आहे. 

परंतू आता येत्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदलण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ‘संगणकीय बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI)विषयी आता बहुतेक वाचकांना मूलभूत माहिती असेल. पुढील १५ ते २० वर्षांनी या तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या अक्षरशः प्रत्येक पैलूमध्ये शिरकाव केलेला असेल!

संरक्षण, कायदा, संशोधन, उत्पादनप्रक्रिया, वैद्यकशास्त्रानंतर शिक्षणक्षेत्रातही संगणकीय बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल होतील. आणखी २०वर्षांनी आपल्या मेंदूत खास असे तंत्रज्ञान (मायक्रोचिप) बसवले जाईल जेणेकरून काहीही लक्षात ठेवण्याची गरज उरणार नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चटकन मिळेल. 

कोणालाही कोणत्याही प्रकारचे शिक्षण अगदी काही वेळातच पूर्ण करता येईल. कॉलेज काय, शाळेतही जाण्याची गरज लागणार नाही. रात्ररात्र जागून अभ्यास आणि पाठांतर करण्याची तर मुळीच आवश्यकता नाही! 

एखादी शंका किंवा प्रश्न विचारण्यासाठी गूगल किंवा इंटरनेटवर इतरत्र टाइप करावे लागणार नाही. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूतील तंत्रज्ञानच त्याचे लगेच उत्तर देईल. शिवाय पाठ्यपुस्तके व परीक्षा या बाबी कदाचित अस्तित्वातही राहणार नाहीत.

मेंदूतील मायक्रोचिपमुळे आठ ते ८० वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला, हवा तो विषय आपापल्या सोयीच्या गतीने व पद्धतीने, हव्या त्या वेळी आणि कोठेही बसून शिकता येईल. हे शिक्षण अर्थातच अधिक उपयुक्त, फलदायी आणि आनंददायी असेल. मानवी मेंदूतील संगणकीय बुद्धिमत्तेवर चालणारे तंत्रज्ञान हे शिक्षकविरहित शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ आहे, असे म्हणता येईल.

शिक्षणासाठी का होईना जर माणसाच्या मेंदूत संगणकीय बुद्धिमत्तेवर चालणारे तंत्रज्ञान बसवले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी शंका काहींच्या मनात येत असेल. यात काही चुकीचे नाही. या क्षणी ज्ञान हे सर्व लक्षात ठेवण्याबद्दल आणि शिकण्याबद्दल आहे. पण ही प्रक्रिया जर निरुपयोगी असेल तर मग काय?

संगणकीय बुद्धिमत्तेच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीही शोधल्या जातीलंच. तसे पाहिले तर स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचाही गैरवापर होतोच;म्हणून त्याचा वापर करणे कोणी सोडलेले नाही! 

थोडक्यात, मानवी मेंदूमध्ये मायक्रोचिप बसवण्याचा अर्थ असा की, कोणत्याही प्रश्नांची उत्तरे थेट आपल्या डोक्यात येतील. गुगलवर काहीही शोधायची गरज नाही कारण गुगलंच आपल्या डोक्यात बसवलेले असेल. हे तंत्रज्ञान म्हणजे आपल्याप्रमाणे विचार करणारा एक हुशार मदतनीस असेल. म्हणजेच, सध्याच्याअँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असणारा गुगल सहाय्यक आपल्या मेंदूत बसवला आहे अशी स्थिति निर्माण होईल असे म्हणायला हरकत नाही. 

आपला विद्यार्थी कोणत्या विषयात हुशार तर कोठे जरा मंद आहे, कोणत्या पद्धतीने सांगितले की त्याला जास्त चांगले समजते हे त्याच्या मेंदूतील संगणकालाअनुभवाने (म्हणजेच काही महिन्यांच्या संवादानंतर) कळू लागेल. अगदी शिक्षकाच्या आवाजात व बोलण्याच्या पद्धतीमध्येही गरजेनुसार सुधारणा होईल.  परिणामी प्रत्येकाला मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल. 

डॉ. दीपक शिकारपूर

डॉ. दीपक शिकारपूर उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.

The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *