(हे मनोगत माझ्यासारख्या मुलांचे आहे ज्यांची आई वर्किंग होती)
40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज संध्याकाळी आई बँक ऑफ महाराष्ट्रामधील सर्विसमधून निवृत्त होत आहे.जवळपास तीन तपांची ही तपश्चर्या आजसंपेल. आईची पूर्ण कारकीर्द धवल राहिली असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 40 वर्षांचा कालखंड खूप मोठा आहे. तो उलगडून दाखवायचा आज एक अल्प प्रयत्न करतोय. आई तुझी नोकरी तशी माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे.काही गोष्टींचे मी आणि गौरी साक्षीदार आहोत. काही गोष्टी या उषा आजी,सुधा आजी, स्वतः तू सांगितल्या आहेस.आजपासून 40 वर्षांपूर्वी जेव्हा तू फक्त 20 वर्षांची होतीस.
बँकेची नवी इमारत शिवाजीनगर येथे आकार घेत होती. तुझे लग्नझालेले होते. त्यामुळे बँकेची रुजू व्हा अशी ऑर्डर घेऊन अधिकारी नानांच्या घरी गेले तेव्हा पहिली बातमी त्यांनाच मिळाली होती. त्या काळात बँकेची नोकरीम्हणजे खूप मोठी गोष्ट होती. नाना, आजी ,आबा,आजी, बाबा सर्वांनाच खूप आनंद झाला. तिथून तुझी सुरवात झाली आणि जवळपास 35 वर्ष तू लोकमंगल (बँक of महाराष्ट्राचे मुख्यालय .नंतरची 5 वर्षे केसरी वाडा जिथून आज तू निवृत्त होशील) ला कार्यरत होतीस. तू त्यावेळेचे बँकेचे चेयरमन डॉक्टर वसंतराव पटवर्धन यांची pa आणि मराठी स्टेनो म्हणून रुजू झालीस( मराठी स्टेनो ही डॉक्टर पटवर्धनांनी पोस्ट निर्माण केली होती अन्यथा इंग्रजी स्टेनो हीच पोस्ट होती) पण तुला मराठी इंग्रजी आणि हिंदी तिन्ही भाषेतून dictation घेता यायचे. मराठी स्टेनोग्राफीच्या परीक्षेत तू महाराष्ट्रा राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालीस.
जेष्ठ साहित्यिक गो. नी दांडेकरांच्या हस्ते तुझा सत्कार झाला होता.लहान वयामध्ये थेट बँकेच्या चेयरमन बरोबर काम करत असताना तुला कधी कसली भीती वाटली नाही त्याचे कारण तुझी कामाप्रती असलेली निष्ठा. बँकेच्या 2 चेयरमन बरोबर काम करायची संधी तुला मिळाली. डॉक्टर पटवर्धन यांच्या विषयी एक आठवण येथे सांगण्यासारखी आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमात डॉक्टर साहेब आले होते. आई आणि घरातील बाकी मंडळी ही त्या ठिकाणी होती. आमच्या वडिलांच्याकडील नात्यात तो कार्यक्रम होता. डॉक्टर पटवर्धन आल्यानंतर, त्यांची ओळख करून देत असता आईपाशी थांबून rp सोवनी (बाबांच्या आत्ये बहिणीचे यजमान) डॉक्टरांना म्हणाले ही तुमच्याच बँकेत आहे. त्यावर डॉक्टर पटवर्धनांनी तत्काळ उत्तर दिले we are colleagues. मोठ्या व्यक्तीचे वर्तन त्यांच्या आचरणात दिसते. अनेक मंडळींनी तुला सांभाळून घेतले. वेंगुर्लेकर ,C.N कुलकर्णी, बोडांळे यांच्यासारखे सज्जन वरिष्ठ तुला लाभले. रोजचे आठ तास ज्या ठिकाणी आपण घालवतो, जे कि आपले दुसरे घरच असते.
घरातील अडचणी आपण तिकडे बोलतो. साधना मावशी, मंजिरी मावशी, धाकरस मावशी अशा तुझ्या जीवा भावाच्या मैत्रिणी झाल्या. या अगदी सुरवातीपासूनच्या मैत्रिणी नंतर तुमच्या दहा जणींचा ग्रुप आजही आहे. या ठिकाणी साधना मावशीचे नाव आवर्जून लिहितो ती तुझ्या सावलीसारखी तुझ्याबरोबर या पूर्ण कालखंडात होती. साधना मावशी आणि आईची 35 वर्षांची मैत्री आहे. दोघींना एकमेकींच्या विषयी काही माहिती नाही अशी गोष्ट नाही. जनरली ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यावर एक बेछुट आरोप केला जातो त्यांचे घरात लक्ष नसते अथवा सर्व सासूवर टाकून जातात. आईकडून हे कधीही घडले नाही आणि हे माझ्या आजीने अनेकदा मान्य केले आहे. माझ्या 5 वी ते 10 च्या प्रत्येक सहामाही आणि वार्षिक परीक्षेच्या आधी आई एक आठवडा सुट्टी घेऊन माझा अभ्यास घ्यायची. सकाळी आजी स्वैपाक करायची संध्याकाळी आई. आईने कधी नोकरी करते म्हणून घरात स्वयंपाक केला नाही असे झाले नाही अथवा स्वैपाकाला बाई पण लावली नाही. नोकरी सांभाळून घरातील चैत्रगौरीची सवाष्ण, गौरीची सवाष्ण, नवरात्रीची सवाष्ण असे सर्व कुळाचार ती आजही चोख करते.
मी अडीच महिन्यांच्या असताना ती परत कामावर रुजू झाली. तेव्हा आजच्या सारख्या 6 महिने पगारी रजा नसायच्या. मी आणिगौरी लहान असताना, आजी आणि आजोबांच्या भरोसे ती आम्हाला ठेवून नोकरीवर जाऊ शकली आणि याबाबत तीच्या मनात आजी आणि नानांच्या बरोबरीने, आजी आणि आबांच्या विषयी कृतज्ञता आहे. आज सकाळी गप्पा मारत असताना ती आज परत म्हणाली नोकरी झाली ती आई आणि तात्यांच्यामुळे. 40 वर्षे वादळी होती, आम्ही बहीण भावंडा ही या कालखंडाचा भाग आहोत. बँक आणि घर या दोन्ही दरडींवर ती खंबीरपणे आजही उभी आहे. कुठलीही गोष्ट तीने आणि बाबांनी कमी पडू दिली नाही. तीच्यातील खंबीरपणा, बेडरपणा, आणि स्पष्टपणे बोलायची ताकद मला आणि बहिणीला तीच्याकडून मिळाली. तीने आम्हाला स्वाभिमान शिकवला. आई बँकेत जायची माझं वय फार लहान होता.
आजी आबा होतेच पण मला आईची खूप आठवण यायची. मग मी तीचा गाऊन घेऊन पलंगावर लोळायचो, त्या गाऊन ला आईचा वास असायचा. संध्याकाळी आई आली की मला जो काही आनंद व्हायचा. अडसर असायचा दरवाज्याला, मी तो दणदण आपटायचो. घेते रे मंदार पाय धुते आणि घेते. मग मी तीच्याकडे बघत बसायचो. हे सर्व मोठं झाल्यावर आजीकडून ऐकलं. त्यानंतर ती रोज न चुकता, कितीही दमली असली तरीही जेवण आटपून रात्री तुळशीबागेत रामाच्या मंदिरात घेऊन जायची. तिकडे मी भरपूर रांगायचो. तिकडेच झोप लागली तर तीला कडेवरून आणणे अवघड जायचे. बरोबर गौरीही असायची. खुपदा डॉक्टर परांजपे दवाखाना बंद करून रामाच्या दर्शनाला यायचे मग ते मला कडेवर घ्यायचे आणि आमची वरात घरी पोहचायची. बँकेत तीला भरपूर काम असयाचे पण त्याचा ताण तीने कधीच आमच्यावर काढला नाही. ती म्हणते आम्ही (मी आणि गौरी) तीचा आनंद आहोत पण प्रत्यक्षात आई हा आमचा आनंद तेव्हाही होता आजही आहे.
नंतर शालेय जीवनात,एकदा तीला बाबांच्याबरोबर एका पार्टीहून यायला उशीर झाला, मी आणि गौरी तोवर जागे होतो. आई आली मग आम्ही झोपलो, त्या दिवसापासून तीने रात्रीचे बाहेर जाणेच बंद केला. आम्ही मोठे होईपर्यंत तीने ते पाळले. तीने प्रत्येक गोष्टीत कंपनी दिली, हॉटेलिंग, सिनेमा, तीने मी गौरी, सायली, ताई(माझी सख्खी आणि चुलत बहिणी) यांना बरीच वर्षे गणपतीही दाखवून आणले. चांगली नाटका, वाचन हे पण तीच्याकडून माझ्याकडे आले. प्रामाणिकपणे वागणे, कोणाचं काही फुकट नको हे संस्कार तीने आमच्यात पूर्णपणे उतरवले. ती गौरी आणि माझी मैत्रीण झाली. त्यामुळे कधी तिच्यापासून काही लपवू नये हेच वाटला. नानांना जेव्हा कर्करोग झाला तेव्हा आई रोज बँकेतून त्याना भेटायला शिवाजीनगर पासून सांगावीला गाडीवर जायची, तिच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक काळ होता. नानांना रक्त द्याची वेळ आली तेव्हा खरे काकांनी खूप मदत केली. खरे काका,विद्वांस काका ही बँकेमुळेच कुटुंबात आलेली मंडळी होती. आज तुझ्या हितचिंतकांच्या पैकी सुधाआजी, नाना, उषाआजी, आबा, बाळासाहेब सोहनी ही मंडळी आज जिवंत नाहीत. पण यांचे सर्वांचे आशीर्वाद आजही तुझ्या पाठीशी आहेत.
आज ही मंडळी जरी नसली तरी आजच्या टप्यावर तुलापोहचलेली बघून त्यांचे आत्मे ही आनंदून जातील. तू कधीही नवी साडी नेसलीस कि उषा आजी तुला म्हणायची अश्विनी आधी माझ्या समोर ये मला बघू दे कशी दिसत आहेस. हे तुमचे सासू सुनेचे नाते न राहता आई मुलीचे नाते मी बघितले आहे. नानांना आज तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे झाले असते. तुझे त्यांच्यावर खरे प्रेम, त्यांच्या तत्वनिष्ठ स्वभावावर आबांना ही भारी कौतुक वाटले असते. तुझ्या आणि बाबांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा आबांना बाबा म्हणाले होते “तात्या 25 वर्ष संसार झाला, ”त्यावर आबांचे उत्तर होता “संसार झाला नाही अश्विनीने संसार केला”, ही एका सासऱ्याकडून मिळालेली कौतुकाची पावतीच होती. खुपदा आबा तुला बँकेत सोडायलाही यायचे जोवर ते गाडी चालवायचे. सुधा आजी बोलली काही नसती फक्त म्हणाली असती पार पाडलास. सोहनीआजोबांना तुझ्याविषयी आकृतीम लोभ कायम होता. स्वताच्या मुलीप्रमाणे त्यांना तुझ्याविषयी ममत्व होते.
लौकिक अर्थाने तुझ्या तीन माता होत्या, एक सुधा आजी जीने तुला जन्म दिला, दुसरी उषा आजी जी तुमच्यातील नातेसंबंधामुळे सासू न राहता आई बनली आणि तिसरी तुझी मातृसंस्था बँक ऑफ महाराष्ट्रा जीने तुला ओळख दिली. तुझ्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी बँक उभी होती. मग ते गौरीचे लग्न असो, उषा आजीचे ऑपरेशन असो बँकने भक्कम मदत केली. त्याच बरोबरीने तू निष्ठापूर्वक काम केलेस. अथर्वच्या वेळेस गौरी घरी आली होती पण तुला election duty आली तू नाही म्हणाली नाहीस गेलीस. तू गौरी आणि बँक दोन्ही जवाबदाऱ्या पार पडल्यास. गार्गीच्या वेळेस स्वाईन फ्लू ने पुण्यात थैमान घातलेले, तेव्हा माझी tv 9 लाइंटर्नशीप सुरु होती आणि मला नायडू हॉस्पिटलला (पुण्यातील स्वाईन फ्लू चे रुग्ण या ठिकाणी उपचाराला यायचे)2 आठवडे जावे लागले होते. घरी लहान बाळ तुला 1 महिनाच सुट्टी मिळाली होती पण तू सर्व म्यानेज केलेस. नोटाबंदीच्या वेळेस जवळपास महिनाभर हडपसरला जाऊन काम केलेस. याचे एकमेव कारण तुझी बँकेविषयी निष्ठा. कधी गंमत म्हणून बँकेविषयी बोललो तर तू चवताळून अंगावर येतेस. बहुदा निष्ठापूर्वक आपल्या संस्थेसाठी काम करणाऱ्या पिढीची तू शेवटची प्रतिनिधी असशील.
आत्ता २६ एप्रिलला तुला वयाची 60 वर्षे पूर्ण झाली आणि आज हा 40 वर्षांचा बँकेतील टप्पाही तू पार पाडलास. दुग्धशर्करा योग आहे.आज संध्याकाळी जेव्हा तू बँकेतून परत घरी येशील, तेव्हा तुला 1 मे पासून दहा वाजता मरमर करून बँक गाठायची नाहीये. भरपूर कष्ट झाले. आता या नंतरची 45 वर्ष ही तुझी आहेत. तुला हवे ते कर. हवे तेव्हा उठ. भारत बघून ये. निवांत गप्पा मार. दुपारी झोप. तुझ्या आयुष्यात शांतता येऊ दे आणि अडीच महिन्यांचा मंदार आणि अडीच वर्षांची गौरीआज 35 आणि 38 वर्षांचे जरी झाले असले तरी त्यांना त्यांची आई कायम लागणार आहे आणि माझा तुझ्यावर क्लेम जास्त आहे मला तू खूप लहान असताना घरी सोडून बँकेत जात होतीस.
सरतेशेवटी आई मी तुला सुख, आनंद, समाधान आणि निरामय सुदृढ आयुष्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी चिंतीतो आणि तुला 40 वर्ष बँकेत पूर्ण करण्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांचे तुझ्या वतीने आभार मानतो आणि थांबतो….

मंदार चक्रदेव
The views and opinions expressed in the article are those of the authors and do not necessarily reflect the official policy or position of The Tilak Chronicle and TTC Media Pvt Ltd.